अमेरिकेचे ‘मोटार सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले, मिशिगन राज्यातील सर्वांत मोठे शहर व डिट्रॉइट नदीवरील बंदर. लोकसंख्या १५,१४,०६३ (१९७०); उपनगरांसह ४४,४६,८०० (१९७३).
फ्रेंचमध्ये डिट्रॉइट म्हणजे सामुद्रधुनी. फ्रेंच वसाहतकऱ्यांना १७०१ मध्ये ही नदी सामुद्रधुनी वाटली म्हणून त्यांनी शहराला व नदीला डिट्रॉइट हे नाव दिले.
१७६० मध्ये शहर ब्रिटिशांक़डे गेले व नंतर ब्रिटिशांक़डे आणि अमेरिकनांकडे आलटून-पालटून जात राहिले.
१८०५ मध्ये मिशिगनला राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर डिट्रॉइट १८४७ पर्यंत राजधानीचे ठिकाण होते. १८०५ च्या प्रचंड वणव्यात येथील फक्त एक इमारत वाचली आणि केवळ दोन लोक जखमी झाले. नंतर शहराची पुनर्रचना झाली.
१८५० नंतर लोहमार्ग व जलमार्ग विकसित होऊन डिट्रॉइट प्रक्रिया उद्योग, लाकूड उद्योग, जहाज बांधणी, अवजड यंत्र निर्मिती यांचे केंद्र बनले. शतकाच्या अखेरीपर्यंत लोखंड व पोलाद, आगगाड्यांचे रूळ, डबे, चाके व आस, पादत्राणे, रंग, रसायने, औषधे इ. उद्योग भरभराटीस आले. चार्ल्स बी. किंग या उद्योगपतीने १८९६ मध्ये व नंतर हेन्री फोर्डने गावातून बिनघोड्याची गाडी चालवून दाखविली आणि डिट्रॉइटचे स्वरूपच बदलले. रॅन्झम ओल्ड्स, हेन्री फोर्ड, जॉन व हॅरिस डॉज, हेन्री लेलँड इ. धाडसी उद्योजकांमुळे १९०४ च्या सुमारास देशातील वीस टक्के मोटार उत्पादन डिट्रॉइटमध्ये होऊ लागले.
अभिनव उत्पादनपद्धती व रोजी पाच डॉलरचे किमान वेतन असलेल्या फोर्डच्या कारखान्यामुळे मोटारनिर्मितीची जागतिक राजधानी म्हणून डिट्रॉइट विख्यात झाले. येथील सर्व उद्योगांवर व जीवनावर मोटार उद्योगाचा प्रभाव पडलेला दिसतो. युनायटेड ऑटोमोबाइल वर्कर्स युनियन ही मोटारकामगारांची प्रचंड जागतिक संघटना येथेच उदयास आली. दुसऱ्या महायुद्धात येथील मोटारकारखान्यांनी युद्धसाहित्य निर्माण करून डिट्रॉइटला ‘लोकशाहीचे शस्त्रागार’ हे बिरूद मिळवून दिले.
परिगणनयंत्रे, ओतकाम, विजेची उपकरणे, लोखंडी तारा, रबरी धावा इ. उद्योगांची भर पडून डिट्रॉइट एक मोठे औद्योगिक केंद्र बनले आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, विमानमार्ग इ. वाहतुकीचे सर्व प्रकार येथे उपलब्ध आहेत. येथील भुयारी रेल्वेने शेकडो गुलाम पूर्वी कॅनडात पळून गेले होते.
कृष्ण व श्वेतवर्णियांच्या दंगली ही येथील कायमची डोकेदुखी आहे. शहरात १९७० मध्ये ४३·७ टक्के कृष्णवर्णीय होते. शहरात व्यावसायिक व माध्यमिक तीनशे शाळा, तीन विद्यापीठे व तीन लाखावर विद्यार्थी आहेत. येथे हजारांवर चर्च असून त्यांत १७०१ मधील सेंट ॲनीचे कॅथलिक चर्च आहे.
पेनॉब्जकॉट बिल्डिंग ही ४७ मजली इमारत, जनरल मोटर्सचे सर्वांत मोठे कार्यालय, फोर्ड प्रेक्षागृह, कोबो हॉल प्रदर्शनगृह, बारा हजार प्रेक्षक सामावणारे कोबो सभागृह इ. वास्तू; ऐतिहासिक संग्रहालय, रॅकहॅम शैक्षणिक स्मारकगृह, बालवस्तुसंग्रहालय, कला अकादमी, अश्मयुगापासून आजतागायतच्या कलेतिहासाचे दर्शन घडविणारी कलासंस्था, वीस लाखांवर ग्रंथांचे सार्वजनिक ग्रंथालय इ. संस्था; अनेकविध संग्रहालये असलेले बेल आइल उद्यान, विविध क्रीडाप्रकारांच्या सोयी असलेले पामर उद्यान व इतर अनेक उद्याने, उपवने, क्रीडांगणे ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. नामवंत व्यावसायिक क्रीडापटुसंघांचे डिट्रॉइट हे माहेरघरच मानले जाते.
गद्रे, वि. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ईअरी : उत्तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे सरोवर. ...