लार्स पीटर हॅन्सेन : अर्थ-व्यवस्थेतील वित्तीय व्यवहार व वास्तव क्षेत्रे यांमधील परस्परसंबंधांचे विश्लेषण करणारा स्थूल अर्थ-शास्त्राचा ख्यातकीर्त अमेरिकन अर्थतज्ज्ञ. जोखमीच्या मालमत्ते-पासून मिळणाऱ्या फायद्यासंबंधीचे भाकित करण्यासंदर्भातील संशो-धनाबद्दल अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबर्ट शिलर व युजीन फॅमा यांसोबत त्याला २०१३ चे अर्थशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. अमेरिकेतील उटा स्टेट युनिव्हर्सिटीतून गणित विषयातील बी.एस्. ही पदवी (१९७४) प्राप्तकेल्यानंतर मिनेसोटा विद्यापीठातून हॅन्सेनने अर्थशास्त्र विषयातील पीएच्.डी. मिळविली (१९७८). डॉक्टरेटनंतर त्याने काही काळ कार्नेगी मेलॉन विद्यापीठात साहाय्यक व सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे १९८१ मध्ये त्याची शिकागो विद्यापीठात प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. तेथेच तो अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयांचा डेव्हिड रॉकफेलर डिस्टिंगविश्ड प्रोफेसर म्हणून अद्यापही अध्यापन व संशोधन करीत आहे.
हॅन्सेननेजर्नलाइज्ड मेथड ऑफ मूव्हमेन्ट्स (जीएम्एम्) हे अर्थसांख्यिकीय तंत्र विकसित केले असून त्याच्या साहाय्याने कामगार अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्था, वित्त व स्थूल अर्थशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांचे विश्लेषण केले आहे. बदलत्या अर्थ-पर्यावरणातील क्लिष्ट अशा आर्थिक समस्यांसंबंधी अंदाज वर्तविणे जेव्हा कठीण होऊन जाते, तेव्हा हॅन्सेनने विकसित केलेली वरील पद्धतसमस्या निश्चित व निर्देशित करून त्या सोडविण्यासाठी विस्तारानेवापरली जाते. आर्थिक समस्यांसंबंधी अचूक व वास्तव भाकिते करण्यासंदर्भातील अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक कोणते व ते कसे परिणामकारक ठरतात, याबाबतच्या संशोधनावर त्याचा भर आहे. त्याने अर्थव्यवस्थेसंबंधीची भाकिते करताना ती अधिक वास्तववादी व्हावीत यासाठीची प्रतिमाने (मॉडेल्स) विकसित केली आहेत. होसे शिइंकमन याच्याबरोबर विद्यमान गतिमान अर्थव्यवस्थेतील समभाग आणि रोख्यांच्या किंमतींतील चढउतार व त्यांतील गुंतवणुकीतील जोखीम यांवर हॅन्सेनकाम करीत आहे.
ब्रेकर फ्राइडमन इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन संचालक म्हणून हॅन्सेन कार्यरत आहे. तसेच अमेरिकेतील २००८ च्या वित्तीय संकटामागील कारणांची मीमांसा करणाऱ्या मॅक्रो फाइनॅन्शियल मॉडेलिंग ग्रुपचा सह-संचालक म्हणूनही त्याचे योगदान लक्षणीय आहे. नॅशनल अकॅडेमीऑफ सायन्सचा तो सदस्य असून इकॉनॉमेट्रिक सोसायटीचाही तो अध्यक्ष होता (२००७). अॅडव्हान्सेस् इन इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स या वृत्तपत्राचा तो सहसंपादक आहे. शिवाय त्याला फ्रीच्च मेडल (१९८४),एखीन प्लेन इकॉनॉमिक प्राइझ (२००६), सी. एम्. ई. ग्रुप–एम्. एस्. आर्. आय्. प्राइझ इन इनोव्हेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अॅप्लिकेशन्स (२००८), बीबीव्हीए फाउंडेशन फ्रंटीयर्स ऑफ नॉलेज अवॉर्ड इन इकॉनॉमिक्स, फाइनॅन्स अँड मॅनेजमेन्ट (२०११) असे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. त्याने स्वतंत्रपणे तसेच थॉमस सार्जंट, प्रा. हिटन, रवी जगन्नाथन तसेचहोसे शिइंकमन यांच्या सहकार्याने अर्थशास्त्रीय समस्या व त्यांचेसांख्यिकीय विश्लेषण यांबाबत विपुल लेखन केलेले आहे.
लेखक - जयवंत चौधरी
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
डिजिटल देयकेचा प्रचार आणि प्रसारासाठी वापरण्यात आल...
MPOS म्हणजे Mobile Point of Sale मशीन. हि मशीन आपण...
सुव्यवस्थित व कार्यक्षम प्रशासनासाठी निर्माण केले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी...