टॉमस पेन : (२९ जानेवारी १७३७ — ८ जून १८०९). एक मानवतावादी लेखक व अमेरिकन क्रांतीच्या सशस्त्र आंदोलनाचा तत्त्वज्ञ. त्याने लोकमत जागविण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडली. त्याचे लेखन प्रक्षोभक होते. तो जन्मभर लेखनद्वारा जनजागृती करीत राहिला. काही दिवस हालअपेष्टात काढल्यानंतर १७७४ मध्ये तो अमेरिकेत आला. पेनसिल्व्हेनिया मॅगेझिनच्या संपादनाची जबाबदारी त्याने यशस्वीपणे हाताळली. १७ जानेवारी १७७६ मध्ये त्याची कॉमनसेन्स ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. त्यात त्याने अमेरिकेच्या म्हणजे वसाहतीच्या स्वातंत्र्याची आवश्यकता प्रतिपादन केली. ह्या लिखाणाने जनमतात अपूर्व बदल घडला. पब्लिक गुड (१७८०) मध्ये त्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढण्यासाठी बळकट संघराज्य निर्मिण्याचे आवाहन केले. डिझर्टेशन ऑन द अफेअर्स ऑफ द बँक हा त्याचा अर्थकारणावरील ग्रंथ. त्यात त्याने सर्व प्रकारच्या मक्तेदारीला विरोध केला आहे. अमेरिकेत क्रांती झाल्यावर पुन्हा त्याला गरिबीने घेरले.
तो इंग्लंड व फ्रान्समध्ये १७८७ ते १८०२ ह्या कालावधीत प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा प्रचार करीत होता. विसंगती हेरून त्यावर बोचऱ्या उपहासगर्भ भाषेत प्रहार करण्याचे त्याचे तंत्र होते. बुद्धीप्रमाणेच भावनेला आवाहन करून साध्या सोप्या भाषेत तो योग्य तो परिणाम साधत असे. द राइट्स ऑफ मॅन (१७९१) मध्ये एडमंड बर्कच्या फ्रेंच राज्यक्रांतीवरील आरोपांना त्याने प्रत्युत्तर दिले. ह्या ग्रंथाच्या प्रती सामान्य लोकांमध्ये वाटण्यात आल्या. प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवत त्याने मानवी हक्कांची तरफदारी केली. तो विवेकवादाचा व बुद्धिवादाचा महान समर्थक होता. त्यासंबंधी त्याचे द एज ऑफ रीझन हे पुस्तक फार गाजले. सनातनी विचारवंतांनी नास्तिक ठरवून त्याला अटक करण्याचा घाट घातला; पण तो फ्रान्सला पळून गेला. तेथेही त्याने आपले विचार प्रभावीपणे मांडले. अमेरिकेतील निग्रो लोकांच्या गुलामगिरीला त्याने तीव्र विरोध केला.
राज्यसत्तेची पकड माफक असावी व तिचा उपयोग सर्वसामान्यांच्या हिताकरिता व्हावा, हा विचार त्याने अग्रेरिअन जस्टीस (१७८७) मध्ये सांगितला. व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी हक्क यांचे उत्कृष्ट समर्थन करणाऱ्या त्याच्या मानवतावादी विचारांना अमेरिकन आणि फ्रेंच राज्यघटनांत मानाचे स्थान मिळाले. इतकेच काय इंग्लंडलासुद्धा १८३२ च्या सुधारणा कायद्यात त्याची दखल घेणे भाग पडले. त्याचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. हा प्रभावी लेखक न्यूयॉर्क येथे मरण पावला.
लेखक - दिलीप जगताप
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झाल...
एक ग्रीक तत्त्वज्ञ.
इंग्रज मुत्सद्दी, मानवतावादी व जगप्रसिद्ध यूटोपिया...
एक सुप्रसिद्ध राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार...