एल्सी वर्दिंग्टन क्लूझ पार्सन्झ : (२७ नोव्हेंबर १८७५- १९ डिसेंबर १९४१). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म न्यूयॉर्क येथे. बर्नार्ड कॉलेजमधून बी.ए. (१८९५). नंतर कोलंबिया विद्यापीठात फ्रँकलिन गिडिंन्झ यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्राचा अभ्यास करून एम्.ए. (१८९७) व पीएच्.डी (१८९९) संपादन केली. कोलंबिया विद्यापीठातच सुरुवातीस अधिछात्र म्हणून (1899-1902) व नंतर समाजशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून काम केले (१९०२ – ०५). पुढे न्यूयॉर्क येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च’ (१९१९) या संस्थेत विभागप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. हर्बर्ट पार्सन्झ या वकिलाशी विवाह (१९००).
नैर्ऋत्य अमेरिकेचा दौरा करत असताना (१९१५) तेथील प्वेब्लो जमातीने त्यांचे लक्ष वेधून घेतले; त्यामुळे पार्सन्झ मानवशास्त्राकडे वळल्या. पुढे मानवशास्त्राचे आणि अमेरिकन इंडियन लोकांच्या संस्कृतीचे त्यांनी प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ फ्रँट्स बोअस व प्लिनी ई. गॉडर्ड यांच्याकडे सखोर अध्ययन केले. त्यानंतर सु. २५ वर्षे त्यांनी प्वेब्लो जमातीचा सर्वंकष अभ्यास केला. या परिशीलनातून व असंख्य काटेकोर तपशीलांच्या आधाराने त्यांनी लिहिलेल्या प्लेब्लो इंडियन रिलिजन (१९३९) या पुस्तकामुळे मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांना मान्यता लाभली. मानवशास्त्रातील त्यांची पुढील पुस्तकेही प्रसिद्ध आहेत : मिल्टा : टाउन ऑफ द सोल्स (१९३६), नोट्स ऑन झ्यूनी (२ खंड, १९१७) व पेगुची, कँटन ऑफ ओटाव्हालो (मरणोत्तर प्रसिद्ध, १९४५).
निग्रो लोकविद्येचाही त्यांचा दीर्घ व्यासंग होता. त्या दृष्टीने त्यांचा फोकलोअर ऑफ अँटिलिस : फ्रेंच अँड इंग्लिश हा तीन खंडांतील (१९३३ – ४३) ग्रंथ उल्लेखनीय आहे. जर्नल ऑफ अमेरिकन फोकलोअरच्या त्या १९१८ पासून अखेरपर्यंत सहसंपादिका होत्या.
न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ जर्नल ऑफ अमेरिकन फोकलोअरने खास अंक काढला होता (१९४३).
लेखक - नरेश परळीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/30/2020
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ.
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधी...
भारतीय मानवशास्त्रज्ञ. भारतीय सामाजिक- सांस्कृतिक...
कॅरिबियन समुद्र : अटलांटिक महासागराचा दक्षिण व मध्...