त्या काळात सामाजिक शास्त्रांत विकसित होत असलेल्या रचना कार्यवादाच्या क्षेत्रात त्यांनी विशेष संशोधन केले आणि त्यातील अनेक उणिवा दूर करून त्याला सैद्धांतिक स्वरूप देण्यामध्ये मोठा हातभार लावला. प्रकट व अप्रकट कार्य, कार्य व अपकार्य, भूमिकासंच (रोलसेट) या संकल्पना तसेच संदर्भसमूह, आचारनियमशून्यता (ॲनॉमी), नोकरशाही इ. विषयांवरील त्यांचे मध्यम पायरीचे (मिड्लरेंज) सिद्धांत हे त्यांचे समाजशास्त्रास महत्वपूर्ण योगदान आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासपद्धतींमध्ये सैद्धांतिक विचार आणि अनुभवाधिष्ठित संशोधन या दोहोंना सारखेच महत्व असून, समाजशास्त्राला विज्ञान म्हणून प्रतिष्ठा लाभावयाची असेल, तर मर्यादित स्वरूपाच्या, प्रत्यक्ष अभ्यासावर आधारित पण सार्वत्रिक स्वरूपाच्या सैद्धांतिक सूत्रात गोवण्यास उपयुक्त ठरू शकतील असे मध्यम पायरीवरील सिद्धांत मांडणे व त्यांच्या आधारे संशोधन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. स्वतःच्या संशोधनातही त्यांनी या प्रतिपादनाचा अवलंब करून त्याआधारे रचना-कार्यवादी विश्लेषण पद्धतीचा पथदर्शक नमुना तयार केला. विज्ञानाचे समाजशास्त्र याही क्षेत्रात त्यांनी संशोधन करून ‘पारंपरिक कर्मठ विचार आणि विज्ञानाचा विकास’ या विषयावरील आपली मते मांडली.
त्यांच्या विद्वत्तेचा व समाजशास्त्रातील नेत्रदीपक कामगिरीचा गौरव करण्यासाठी अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली. शिवाय अनेक संस्थांनी पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला. त्यामध्ये अमेरिकन कौन्सिल ऑफ लर्नेड सोसायटी, गग्गेन्हाईम फेलोशिप (१९६२), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसची फेलोशिप (१९७९), कॉमनवेल्थ ट्रस्ट अवॉर्ड (१९७९) इ. विशेष उल्लेखनीय आहेत. याशिवाय अमेरिकेतील तसेच परदेशातील व आंतरराष्ट्रीय सामाजिक शास्त्रासंबंधीच्या संस्था, समित्या आणि विद्वत्सभांचे ते सदस्य होते. अमेरिकन सोशियॉलॉजिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी १९५७ मध्ये त्यांची निवड झाली.
त्यांचे स्वतःचे, सहलेखकांबरोबरचे व संपादित केलेले ग्रंथ अनेक आहेत. त्यांपैकी महत्वाच्या ग्रंथांच्या आवृत्याही निघाल्या आणि इतर भाषांमध्येही भाषांतरे झाली. त्यांपैकी काही महत्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी इन सेवंटींथ सेंचरी इंग्लंड (१९३८, १९७१), मास पर्सुएशन (१९४६), सोशल थिअरी अँड सोशल स्ट्रक्चर (१९४९, १९६८), रीडर इनब्युराक्रॅसी (१९५२), सोशिऑलॉजी टुडे (१९५९), काँर्टेपोररी सोशल प्रॉब्लेम्स ( १९६१,१९७१,१९७६), ऑन शोल्डर्स ऑफ जायंट (१९६५), सोशल थिअरी अँड फंक्शनल अँनॅलिसिस (१९६९), सोशिऑलॉजी ऑफ सायन्स (१९७३), टोवर्ड ए मेट्रिक ऑफ सायन्स (१९७८), कंटिन्यूइटिज इन स्ट्रक्चरल एन्क्वायरीज (१९८१) इत्यादी.
लेखक - त्रि. ना. वाळुंजकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/8/2020
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, ज...
जर्मन तत्त्ववेत्ता आणि समाजशास्त्रज्ञ. बर्लिन येथे...
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजश...
फिनिश समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. फिनलंडमधी...