অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तेहरान

तेहरान

तेहरान

इराणची व तेहरान प्रांताची राजधानी. क्षेत्रफळ २८२ चौ.किमी, लोकसंख्या ३१,५०,००० (१९७२) कॅस्पियन समुद्र व शहर यांमध्ये एल्बर्झ पर्वत आहे. कॅस्पियनपासून तेहरान १०० किमी. अंतरावर दक्षिणेस जाज्रूद व काराज नद्यांमध्ये समुद्रसपाटीपासून, १२०० मी. उंचीवर असून हवा स्वच्छ असताना उत्तरेस एल्बर्झ पर्वताच्या रांगा व त्याचे ५,६७८ मी. उंचीचे मौंट डेमॅव्हेंड हे सदा हिमाच्छादित असणारे शिखर दिसते.

हे शिखर मृत ज्वालामुखीशंकूच आहे. तेहरान म्हणजे (तेह–उबदार व रान–स्थळ) ‘उबदार स्थळ’ असा अर्थ जुन्या पर्शियन भाषेप्रमाणे होतो. येथील उन्हाळे उष्ण (२९° से.) व हिवाळे थंड (४° से.) असून पाऊस वार्षिक २० सेमी. नोव्हेंबर ते मे या काळात पडतो.

डिसेंबर–फेब्रुवारी महिन्यांत हिमवृष्टी होते. उन्हाळ्यात उष्मा फार असल्याने बरेच लोक उत्तरेस १६ किमी. दूर पर्वतात असलेल्या शेमीरान या थंड हवेच्या ठिकाणी जातात. आज मोटारी व कारखाने यामुळे हवेचे प्रदूषण फारच वाढले आहे. लोक इराणी वंशाचे असून मुस्लिम हाच प्रमुख धर्म आहे. ख्रिश्चन लोकांत अ‍ॅसिरियन व आर्मेनियन गट महत्वाचे असून थोडे यहुदी व पारशी धर्माचे लोक आहेत.

पर्शियन ही प्रमुख भाषा असून अल्पसंख्यांकांचे गट त्यांच्या वेगळ्या भाषा वापरतात. शहरातील लोकसंख्येची घनता १५,८०० दर चौ.किमी. आहे. हे अत्यंत जुने गाव आहे. इ. स. पू. ३३१ मध्ये डरायस तिसरा याचा पाठलाग करताना अलेक्झांडर द ग्रेट याने येथे मुक्काम केला होता. त्या काळात हे गाव ‘रे’ या जवळच्या राजधानीचे छोटे उपनगर होते. इ. स. १२२० मध्ये मंगोल लोकांनी रे शहराचा विध्वंस केला.

तेव्हा तेथील बरेच लोक तेहरानमध्ये आश्रयासाठी आले. सोळाव्या शतकात सफाविद राजवंशाचा शाह तहमास्प पहिला याने शहरास तटबंदी केली. १७८५ मध्ये आगा मुहंमदखान या कजार राजवंश संस्थापकाने हे शहर जिंकले व १७८८ मध्ये येथे राजधानी स्थापन केली. तेव्हापासून हे शहर इराणची राजधानी आहे.

१९२५ नंतर रेझाशाह पहलवी याच्या काळात शहराचा मोठा विकास घडून आला. एकोणिसाव्या शतकात वस्ती १,२०,००० व विस्तार केवळ ५ चौ. कि. मी. होता, तर या शतकाअखेर वस्ती ५० लाख व विस्तार ६०० चौ. कि. मी. पेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नगररचना व घरबांधणी ही महत्त्वाची बाब इराणच्या महाराणी फाराह या स्वतःच पाहत आहेत.

शहराची जुनी तटबंदी नष्ट करण्यात आली आहे. शहरात १२ वेशी व १२ प्रमुख रस्ते केंद्रित झाले आहेत. फिर्दोसी चौक, शाह रेझा अ‍ॅव्हेन्यू, फिर्दौसी मार्ग हे प्रमुख रस्ते असून उत्तरेस नवे श्रीमंत शहर व दक्षिणेस जुने बाजाराचे शहर ‘सेपाह’ चौकाभोवती आहे.

देशाची राजधानी असल्याने येथील कारभार सरकार पाहते. तीस निवडलेल्या सभासदांची नगरपालिकीय परिषद असून त्यांची निवड दर चार वर्षांनी होते. परिषद महापौरची निवड करते. महापौर व त्यांचे सहकारी नागरी सेवा पुरविण्यास जबाबदार असतात. तेहरान हे दळणवळणाचे केंद्र आहे. तीन प्रमुख पक्के रस्ते येथून पूर्वेस, दक्षिणेस व पश्चिमेस निघतात. रेल्वेमार्ग कॅस्पियनकडे व इराककडे जातात.

तुर्कस्तानमधून ते ट्रान्स–यूरोपियन रेल्वेशी जोडले आहेत. परदेशाशी व देशातील प्रमुख शहरांशी विमानमार्गांनी हे शहर जोडले आहे. पश्चिमेस १० कि. मी. अंतरावर मेहराबाद येथे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कालेमोर्घी आणि दौशन–तापेह येथे छोटे विमानतळ असून आधुनिक महाकाय विमाने वापरू शकतील अशा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम १९७६ अखेर पूर्ण व्हावयाचे होते.

शहरात कापड, सिमेंट, साखर, सिगारेट, चर्मोद्योग, काचसामान, नैमित्तिक वापराच्या वस्तू तसेच औषधे, सौंदर्य प्रसाधने, मोटारगाड्या, खेळणी आणि रे येथे तेलशुद्धीकरण हे प्रमुख उद्योग असून देशातील ५१% औद्योगिक उत्पादन येथे होते. देशातील ३०% उद्योग या एका शहरात आहेत. शहर शैक्षणिक केंद्र असून १७५ शिशुशाळा, १,२०० प्राथमिक शाळा, ५०० माध्यमिक शाळा, युनिव्हर्सिटी ऑफ तेहरान, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इराण व आर्च मिहिर इंडस्ट्रिअल युनिव्हर्सिटी ही तीन विद्यापीठे आहेत. सर्व विद्यापीठांत २५,००० विद्यार्थी होते (१९७०).

इस्फाहानच्या तुलनेने तेहरानमध्ये प्राचीन कलाकौशल्याच्या काहीच खुणा नाहीत. सेपाह सालार मशीद, बहारस्तान राजवाडा व गुलिस्तान राजवाडा या प्रेक्षणीय इमारती आहेत. शहरात ११ वस्तुसंग्रहालये असून पुरातत्त्व संग्रहालयात स्यूसा व पर्सेपलिस येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. गुलिस्तान व राजवाड्यातील संग्रहालय रत्नांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रसिद्ध ‘मयुरासन’ व ‘नादीरासन’ ही सिंहासने आहेत. अनेक ग्रंथालये असून मेली, मालेक ही प्रसिद्ध आहेत.

शहरात १२ दैनिके, ४० साप्ताहिके, ३ रेडिओ व ४ दूरचित्रवाणी केंद्रे तसेच अनेक शोभिवंत बागा व एक प्राणिसंग्रहालय आहे. १९७४ सालचे आशियाई सामने येथे झाले होते आणि त्यासाठी अनेक क्रीडागृहे बांधण्यात आली. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर १९४३ या काळात येथे प्र. रूझवेल्ट, पंतप्रधान चर्चिल व मार्शल स्टालिन यांची महत्त्वाची बैठक होऊन त्यांनी त्रिराष्ट्र जाहीरनामा प्रसृत केला.

 

डिसूझा, आ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate