অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्मेनिया

आर्मेनिया

सोव्हिएट संघराज्यांपैकी एक घटक राज्य.  क्षेत्रफळ २९,८०० चौ.किमी.; लोकसंख्या २५,४५,००० (१९७१).  कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र यांच्या दरम्यान कॉकेशसच्या डोंगराळ प्रदेशात हे राज्य पसरले असून याच्या उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस आझरबैजान, दक्षिणेस इराण आणि आझरबैजानचा नाथिचेव्हान हा स्वायत्तप्रांत व पश्चिमेस तुर्कस्तान आहे.  येरेव्हान ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन

प्राचीन लाव्हारसाने बनलेला हा पाषाणमय प्रदेश डोंगराळ व पठारी असून त्याच्याभोवती उंच पर्वतरांगा आहेत. राज्यातील निम्म्याहून अधिक प्रदेश १,२०० मीटरहून जास्त उंच आहे व तीन टक्के प्रदेश सहाशे मीटरहून कमी उंच आहे.  कॉकेशसच्या दुय्यम रांगा या देशात आग्नेय-वायव्य दिशेने गेलेल्या असून हा प्रदेश उत्तरेस जॉर्जियातील कुरा व रिऑन नदीखोर्‍यांकडे व दक्षिणेस आरास (अ‍ॅ‍राक्स)  नदीखोऱ्यांकडे  उतरता होत गेलेला आहे.  आरास ही येथील प्रमुख नदी असून ती काही अंतरापर्यंत  एकीकडे तुर्कस्तान व इराण आणि दुसरीकडे आर्मेनिया यांमधील सरहद्द आहे.  राज्यात अधूनमधून मृत ज्वालामुखी आढळतात.  आलागझ हे सर्वोच्च शिखर ४,०९५ मी.  उंच आहे.  १,९१४ मी. उंचीवरील सेव्हान सरोवर कॉकेशसमधील सर्वात मोठे व जगातील अतिउंचावरील सरोवरांपैकी एक आहे.  त्याचे पाणी झांगा (रझदान) नदी आरास नदीत वाहून नेते. झांगाच्या शंभर किमी. प्रवाहात ती हजार मीटर खाली  उतरते.  सरोवरातून मोठा पाणीपुरवठा आणि बऱ्याच ठिकाणी खोल उतार यांमुळे हा भाग जलविद्युत्‌केंद्रांना उपयुक्त बनला आहे.  काळ्या व कॅस्पियन समुद्रांपासून फार दूर नसूनही या प्रदेशाचे हवामान खंडांतर्गत स्वरूपाचे आहे; कारण भोवतीच्या पर्वतांमुळे समुद्राकडून येणारे वारे अडतात.  जानेवारीचे सरासरी तपमान शून्याखाली ६ते १० से. असते, तर जुलैचे १६ ते २५असते. येथे ऋतुमानाप्रमाणे तपमान व उंचीप्रमाणे पर्जन्यमान बदलत जाते.  सर्वात उंच पर्वतरांगांवर ७५ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो.  इतर डोंगराळ प्रदेशात तो २४ ते ३० सेंमी. पडतो.  आरास नदीच्या खालच्या टप्प्यात २० ते ३० सेंमी. पाऊस पडतो.  येथील वनस्पतिजीवन साधारणतः कोरड्या हवामानाला अनुकूल आहे.  प्रदेश बराचसा तृणप्रधान, स्टेपसारखा आहे.  नैसर्गिक वनस्पती गवत हीच आहे.  झाडे वाढण्याइतकी आर्द्रता  हवेत नसते.  जळणापुरतेही लाकूड मिळत नाही.  येथील मृदा बहुतांशी ज्वालामुखीजन्य व सुपीक आहे.  तथापि कमी पावसाच्या  भागात पाणीपुरवठ्याखेरीज ती उपयोगी येत नाही.  येथील प्रमुख खनिजे म्हणजे तांबे, जस्त, मॉलिब्‌डिनम, बॉक्साइट, मँगॅनीज, लोखंड धातुक, नेफेलीन, संगमरवर, पमीस दगड, गुलाबी रंगाचा, शोभेच्या बांधकामाचा टुफा दगड ही होत.

इतिहास

आर्मेनियाच्या सीमा प्राचीन काळापासून अनेक वेळा बदललेल्या आहेत. पूर्व तुर्कस्तानातील वान सरोवर, त्याभोवतीचा अ‍ॅनातोलियाच्या पठाराचा प्रदेश, तुर्कस्तानचा पूर्वेकडील अ‍ॅरारात पर्वत हे पूर्वी आर्मेनियात होते. दंतकथेनुसार आर्मेनिया हा आदम रहात असलेली ईडनची बाग होय आणि जागतिक प्रलयानंतर नोहाची नाव अ‍ॅरारातला लागली, असा समज आहे.  नोहाचा वंशज  हाइक याने वान सरोवराभोवती राज्य स्थापिले.  येथील राज्याला ऊरार्तू म्हणत.  हे इ.स.पू. १३ ते ७ शतकांत भरभराटलेले होते.  अनेक शतकांनंतर अ‍ॅसिरियनांनी या प्रदेशावर स्वाऱ्या केल्या.  त्यांच्या शिलालेखांत अ‍ॅरारातचा उल्लेख ऊरार्तू असा आहे.  अ‍ॅसिरियन, मीड व पर्शियन लोकांच्या लढायांनंतर इ.स.पू.६ व्या शतकात पर्शियाची सत्ता येथे आली.  अलेक्झांडरने ते इ.स.पू. ४ थ्या शतकात जिंकले.  त्याच्यानंतर इ.स.पू. १८९च्या सुमारास आर्ताशेडिस घराण्याने आर्मेनियाला स्वातंत्र्य मिळवून दिले; परंतु लवकरच रोमनांनी त्यांचा पराभव केला.  तिसऱ्या शतकातील सॅसॅनिडी वंशानंतर चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ते रोमन व पर्शियन यांनी आपसात वाटून घेतले. नंतर  आर्मेनियात पर्शियन, बायझंटिन, हूण व अरब यांच्या लढाया झाल्या. ८८६ ते १०४६ या काळात हा प्रदेश बेग्राटॉइड या तद्देशीय राजांच्या ताब्यात होता.  नंतर पुन्हा बायझंटिनांनी व सेल्जुक तुर्कांनी तो घेतला.  पश्चिमेकडे गेलेल्या आर्मेनियनांनी लिटल आर्मेनिया हे स्वतंत्र राज्य स्थापिले; परंतु ते १३७५ मध्ये मामलूकांनी नष्ट केले.  १३८६ ते १४०२ या काळात तैमूरलंगने युफ्रेटीसच्या पूर्वेचे ग्रेटर आर्मेनिया जिंकून पुष्कळ लोकांची कत्तल केली.  सोळाव्या शतकात येथे ऑटोमन तुर्कांची सत्ता होती. पूर्व आर्मेनियावरून तुर्कस्तान व पर्शिया यांची वारंवार भांडणे होत. हल्लीचा सोव्हिएट आर्मेनियाचा प्रदेश रशियाने पर्शियाकडून १८२८ मध्ये मिळविला. १८७७ - ७८ च्या रूसो-तुर्की युद्धात रशियाने राहिलेल्या आर्मेनियाचा भाग मिळविण्याचा प्रयत्‍न केला. १८७८ च्या बर्लिन काँग्रेसने कार्स, आर्दाहान व बाटुमी विभाग रशियाला दिले. १८८५ मध्ये तुर्की आर्मेनियातील राष्ट्रवाद्यांनी उठाव केला. परंतु १८९४ ते १९१५ या काळात तुर्कांनी आर्मेनियनांच्या अमानुष कत्तली केल्या. १९१८ च्या करारान्वये रशियाने कार्स व बाटुमी भाग तुर्कस्तानला परत केला. राहिलेल्या भागातील आर्मेनिया ट्रान्सकॉकेशस संघराज्याचा घटक बनला.  १९२० मध्ये सेअब्रच्या तहाने या राज्याला मान्यता मिळाली.  १९२१ मध्ये रूसो-तुर्की तहाने सध्याच्या सीमा ठरल्या.  १९२२ - १९३६ पर्यंत आर्मेनिया सोव्हिएट रशियान ट्रान्सकॉकेशियन संघराज्यात समाविष्ट होता. १९३६ मध्ये आर्मेनिया स्वतंत्रपणे सोव्हिएट संघराज्याचा घटन बनला.  सुप्रीम सोव्हिएटमध्ये १९७१ च्या निवडणुकीनुसार आर्मेनियाचे ३१० प्रतिनिधी होते; त्यांपैकी १०३ स्त्रिया होत्या.

आर्थिक स्थिती

डोंगराळ भागात गुरे व मेंढ्या पाळणे आणि सखल भागात शेती हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. उंच भागात उन्हाळ्यात शेजारच्या सोव्हिएट राज्यांतूनही गुरे चरावयास येतात. डोंगरी लोक स्विस पद्धतीचे चीज तयार करतात. एकूण क्षेत्रापैकी १९७० मध्ये १३.६ % क्षेत्र लागवडीखाली असून ८.५% क्षेत्र ओलीत आहे. २८% क्षेत्र कुरणांखाली आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याच्या योजना केलेल्या आहेत.  आरास नदीखोरे व येरेव्हान भोवतीचा  प्रदेश हे मुख्यतः  शेतीचे प्रदेश आहेत.  गहू, बार्ली, मका, तंबाखू, बीट, कापूस, बटाटे ही पिके व द्राक्षे, अंजीर, जर्दाळू, ऑलिव्ह, बदाम, डाळिंबे ही फळे होतात.  कापूस महत्वाचे पीक आहे. बहुतेक शेतकरी सामुदायिक शेती करतात.  १९७१ मध्ये लागवडीखालील जमिनीपैकी ९९.९% जमीन सामुदायिक आणि सरकारी होती. १९७१ मध्ये राज्यात ६.७ लक्ष गुरे, १,२१,००० डुकरे व १९.९९ लक्ष मेंढ्या होत्या.

झांगावरील धरणामुळे शेतीला पाणीपुरवठा व उद्योगधंद्यांना जलविद्युत्‌शक्ती उपलब्ध झाली आहे.  एकूण आठ केंद्रे असून १९७० मध्ये ६१० कोटी किवॉ. तास विद्युत् निर्मिती झाली होती.  या नदीवरील येरेव्हान शहरी डबाबंद मांस व फळे, मद्य, कृत्रिम रबर, नायट्रेट खते, टायर, केबल्स, विद्युत्‌जनित्र, काँप्रेसर, घड्याळे, टरबाइन, लोकरी, कापड, कातडीकाम, तंबाखू, अल्युमिनियम इत्यादींचे कारखाने आहेत.  लेनिनाखान येथे कापड, मांससंवेष्टन, साखरशुद्धीकरण होते. अ‍ॅरारात येथे सिमेंट, किरोबाखान येथे रासायनिक पदार्थ, आनीप्येम्झा येथे पमीस दगड, आलामीझ विभागात पमीस व टुफा दगड, झांगेझुर डोंगरफाट्यातील काफान येथे तांबे व मॉलिब्डिनम व अलावर्दी येथे तांबे शुद्ध करण्याचा व सुपर फॉस्फेटचा कारखाना आहे.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate