ताजिकिस्तान
सोव्हिएट संघराज्याच्या पंधरा घटक प्रजासत्ताकांपैकी एक. क्षेत्रफळ १,४३,१०० चौ. किमी. लोकसंख्या ३३ लक्ष (जानेवारी १९७४). विस्तार ३६° ४०' उ. ते ३९° ४०' उ. आणि ६०° २०' पू. ते ७५°पू. यांदरम्यान, सोव्हिएट मध्य आशियाच्या अगदी आग्नेयीस असलेल्या या प्रजासत्ताकाच्या उत्तरेस किरगीझिया प्रजासत्ताक, पूर्वेस चीन, दक्षिणेस अफगाणिस्तान आणि त्याच्या सोळा किमी. रुंदीच्या वाखान या चिंचोळ्या पट्टीपलीकडे भारत (काश्मीर) व पाकिस्तान आणि पश्चिमेस व वायव्येस उझबेकिस्तान प्रजासत्ताक आहे. दूशान्बे ही राजधानी आहे. आग्नेय भागातील ६३,७०० चौ. किमी. चा गोर्नों–बंदक्शान हा स्वायत्त विभाग आणि त्याची राजधानी खोरॉग यांचा समावेश ताजिकिस्तानातच होतो.
भूवर्णन
हा प्रदेश उंच उंच पर्वतश्रेणींनी व त्यांमधील दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. आग्नेय भागात भव्य, उत्तुंग, हिमाच्छादित पामीर–आलाय पर्वत संहतीमधील ‘जगाचे छप्पर’ या अर्थाचे स्थानिक नाव असलेले विख्यात पामीरचे पठार आणि पश्चिमेकडे गेलेल्या पीटर द फर्स्ट व दरवाझा या रांगा आहेत. पामीरच्या उत्तर भागात सोव्हिएट संघराज्यातील सर्वोच्च शिखरे मौंट कम्युनिझम (७,४९५ मी.) मौंट लेनिन (७,१३४ मी.) व मौंट कार्ल मार्क्स (६,७२६ मी.) आहेत. देशाच्या मध्य भागात दक्षिण तिएनशानच्या तुर्कस्तान, झेरफ्शान (५,५१० मी. पर्यंत उंच), गीसार (हिस्सार) व आलाय रांगा आहेत. पूर्वेकडे ट्रान्स–आलाय. अल्यीचूर व सरिकोल रांगा असून उत्तरेकडे पश्चिम तिएनशानच्या ३,७६८ मी. पर्यंत उंचीचा कूराम व मगॉलताऊ रांगा आहेत. पामीरमधील मौंट कम्युनिझमच्या दक्षिणेस विस्तीर्ण व लांब फेडचेंको हिमनदी आहे. वायव्येचे सिरदर्याचे खोरे, फरगाना खोऱ्याचा तोंडाजवळचा भाग व नैर्ऋत्येची काफिरनिगन, वाख्ष इ. नद्यांची खोरी हा देशाचा सखल प्रदेश आहे.
उत्तरेकडील सिरदर्या व दक्षिण सीमेवरील अमुदर्या या येथील प्रमुख नद्या आहेत. देशातील उत्तरेकडील प्रवाह सिरदर्याला आणि मध्य व दक्षिण भागांतील प्रवाह अमुदर्याला मिळतात. पश्चिमवाहिनी झेरफ्शान पुढे तुर्कमेन प्रजासत्ताकात अमुदर्याला मिळते. आग्नेय सीमेवरील पामीर नदी पुढे पांज नदी म्हणून ओळखली जाते व तिला वाख्ष मिळाल्यावर तीच पुढे अमुदर्या होऊन तिला अगदी नैर्ऋत्य भागात काफिरनिगन मिळते. काही प्रवाह पूर्वेकडे काराकल या येथील सर्वांत मोठ्या व खाऱ्या सरोवराला मिळतात. १९११ च्या भूकंपात मुरगाब नदीला प्रचंड भूमिपातामुळे बांध पडून अत्यंत खोल व नयनरम्य सऱ्येस सरोवर निर्माण झाले आहे. झेरफ्शान रांगेत इस्कंद्येरकुल हे सुंदर सरोवर आहे.
हवामान
ताजिकिस्तानचे हवामान अत्यंत विषम असून ते उंचीप्रमाणे बदलत जाते. नदीखोऱ्यांत उन्हाळा कडक आणि कोरडा असतो. लेनिनाबाद व कूल्याप येथे जुलैचे सरासरी तपमान अनुक्रमे २७·४° व ३०·३° से. आणि जानेवारीचे अनुक्रमे ०·९° से. व २·३° से. असते. वर्षातून २०० ते २४० दिवस बर्फयुक्त असतात. कडक हिवाळ्यात तपमान –२०° से. पर्यंतही उतरते. वार्षिक सरासरी पाऊस १५ ते २५ सेंमी. पडतो. उंचीप्रमाणे तपमान कमी होत जाते. पूर्व पामीरमध्ये मुरगाब येथे जानेवारीत ते –१९·६°से. असते. कधी कधी ते –४६° से. पर्यंत उतरते. –६३° से. पर्यंत उतरल्याची नोंद आहे. येथे पाऊस फक्त ६ ते ८ सेंमी. असतो. तिएनशान व पामीर–आलाय श्रेणीदरम्यानचा तूर्गे खोऱ्यात पश्चिमेकडील आर्द्र वाऱ्यांमुळे ८० ते १५० सेंमी. पाऊस हिमरूपाने पडतो.
वनस्पती
पर्वतपायथ्याचा सपाट प्रदेश मरुसदृशच आहे. तथापि जो जो उंच जावे तो तो गवत, जंगल, सूचिपर्णी व पानझडी वृक्षांची अरण्ये, विरळ अरण्ये, स्टेप गवत, अल्पाइन कुरणे व शेवटी वनस्पतिरहित, बर्फाच्छादित प्रदेश असा क्रम आढळतो. येथे झाडाझुडुपांचे सु. १५० व फुलांचे ५,००० पेक्षा अधिक प्रकार आढळतात.
प्राणी
प्राणिजीवनही विविध आणि विपुल आहे. करड्या रंगाचे मोठेमोठे सरडे, जर्बोआ, गोफर इ. मरुवासी;
हरिण, वाघ, कोल्हा, रानमांजर हे वनप्रदेशातील; तर पर्वतप्रदेशात तपकिरी अस्वल आणि त्याहीपेक्षा उंच भागात रानबोकड व सोनेरी गरुड दिसतात.
इतिहास व राज्यव्यवस्था
या डोंगराळ प्रदेशात राहणारे ताजिक लोक प्राचीन काळी हल्लीच्या उझबेकिस्तानमधील अमुदर्या व सिरदर्या यांदरम्यानच्या झेरफ्शानच्या सुपीक खोऱ्यातील प्राचीन सॉग्डियाना प्रदेशात राहत असत. अलेक्झांडर, शक, मंगोल इत्यादिकांच्या स्वाऱ्यांच्या दडपणामुळे ते या डोंगराळ प्रदेशात आले. प्राचीन काळी हा प्रदेश इराणच्या आणि अलेक्झांडरच्या राज्यात मोडत असे. आठव्या शतकात अरबांनी अमुदर्या ओलांडून ताजिकांचा सॉग्डियाना प्रदेश घेतला आणि त्यास माव्हे रा अन् नहर म्हणजे नदीपलीकडील प्रदेश असे नाव दिले. नवव्या शतकापर्यंत ते इस्लामी संस्कृतीचे पूर्वेकडील केंद्र होते. दहाव्या शतकात तुर्की लोकांनी आक्रमण केले. तेराव्या ते पंधराव्या शतकापर्यंत मंगोलांचे नियंत्रण होते, नंतर खिया, बुखारा आणि कोकंद येथील खानांचे वर्चस्व सुरू झाले. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ताजिक लोक बुखारा राज्याचा एक भाग म्हणून राहिले. नंतर अफगाणांनी अमुदर्या नदीच्या दक्षिण आणि आग्नेय भागापर्यंतचा प्रदेश जिंकला. १८९५ मध्ये इंग्रज व रशियन यांनी पांज नदी अफगाणिस्तानची उत्तर सरहद्द ठरविली. रशियन क्रांतीनंतर ताजिकिस्तान हा तुर्कमेन प्रजासत्ताकाचा एक भाग होता. १९२४ मध्ये तो उझबेकिस्तानात समाविष्ट झाला आणि १९२९ मध्ये ताजिकिस्तान हे सोव्हिएट संघराज्याचे एक घटक प्रजासत्ताक झाले.
ताजिकिस्तान हे १९३७ च्या संविधानाप्रमाणे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असून त्याला स्वतःचा ध्वज व राष्ट्रगीत आहे. तथापि खरी अंतिम सत्ता सोव्हिएट संघराज्याकडेच आहे. या देशाची सत्ता दर चार वर्षांनी निवडल्या जाणाऱ्या सुप्रीम सोव्हिएटकडे आहे. १९७१ च्या निवडणुकांत दर ५,००० लोकांस एक याप्रमाणे ३१५ डेप्युटी (प्रतिनिधी) निवडून आले. त्यांपैकी १०७ स्त्रिया व २१७ कम्युनिस्ट होते. जिल्हा, नागरी व ग्रामीण सोव्हिएटवर गोर्नो–बदक्शान स्वायत्त विभाग धरून दोन वर्षांसाठी निवडून आलेल्या २२,६६२ प्रतिनिधींपैकी ४६% स्त्रिया, २२·७% अपक्ष व ६८·३% औद्योगिक कामगार व सामुदायिक शेती करणारे होते. ताजिक सुप्रीम सोव्हिएटला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ ‘कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स’ म्हणजेच ताजिकी शासन हे देशातील सर्वोच्य कार्यकारी व शासकीय मंडळ आहे.
ताजिकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय, स्वायत्त विभागाचे न्यायालय, जिल्हा आणि नागरी न्यायालये दर पाच वर्षांनी निवडली जातात. नव्वद हजार सभासदांचा ताजिक कम्युनिस्ट पक्ष, दोन लाख सभासदांची यंग कम्युनिस्ट लीग व सु. पाच लाख सभासदांच्या व्यावसायिक संघटना आहेत. त्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांतही लक्ष घालतात.
स्त्रोत:
मराठी विश्वकोश