অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किरगीझिया

किरगीझिया

सोव्हिएट संघराज्याच्या पंधरा राज्यांपैकी मध्य आशियातील एक राज्य. क्षेत्रफळ १,९८,५०० चौ.किमी., लोकसंख्या ३१,००,००० (१९७२) राज्याच्या वायव्येस व उत्तरेस कझाकस्तान, पूर्वेकडे व आग्नेयीकडे चीन, दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे ताजिकिस्तान आणि पश्चिमेकडे उझबेकिस्तान संघराज्य असून फ्रुंझ (लोकसंख्या ४,५२,०००) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन

हा भाग डोंगराळ असून पुष्कळश्या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून १,६०० मी.च्या वर आहे. या प्रदेशात तिएनशान पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील भागाचा समावेश होतो. ह्या पर्वत रांगात रशिया व चिन यांच्या सरद्दीवर असलेल्या, पोबेडा (७,४३७ मी.) व खानतेंग्री (७,१९९ मी.) या शिखरांचा समावेश होतो.

या शिखरांपासून पुढे पश्चिमेकडे गेलेली डोंगरांची रांग कुंघाई-आला-तौ पश्चिमेकडे किरघीज पर्वतरांगेत गेलेली आहे; नैऋत्येकडे गेलेली कोलशाल-तौ ही रशिया व चीन यांमधील सरहद्द होय. पुवेंकडील उंच पठारी प्रदेशात तितिकीच्या खालोखाल जगातील सर्वात उंचावरील व ७०२ मी. खोल असलेल्या इसिककूल या सरोवराचा समावेश होतो.

हा पठारी प्रदेश पुर्व-पश्चिम पसरलेला असून त्याची रूंदी २०० किमी. आहे व उंची समुद्रसपाटीपासून सर्वसाधारणपणे ३,०४८ मी. वर आहे. या प्रदेशातून वाहणाऱ्या मुख्य नद्यात चू व नरिन यांचा समावेश होतो. चू नदी प्रथम उत्तरेस व नंतर ईशान्येस वळून किरगीझिया व कझाकस्तान यांच्या सरहद्दीवरून वाहते.

नरिन नदी फरगाना खोऱ्यातून पुढे सिरदर्याला मिळते. पश्चिम किरगीझियाचा प्रदेश पुर्वेकडील प्रदेशाच्या मानाने कमी उंच आहे. फराना खोरे येथूनच सुरू होते. नैर्ऋत्येकडून कारादर्याचा उगम होतो. हिलाच पुढे सिरदर्या म्हणतात. येथील हवामान उंचीप्रमाणे बदलत असते.

उत्तरेकडे व पश्चिमेकडे डांगरउतारावर बाष्पयुक्त वारे येतात पण त्याठिकाणी सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे ह्या उतारावर विशिष्ट वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याचप्रमाणे उंचीबरोबर पर्जन्यमानही बदलते. 3,048 मी.वर पर्जन्य हिमस्वरूपात आढळतो. जानेवारीतील सरासरी तपमान मात्र 180 से. ते 250 से. आढळते. येथे मुख्यत्वेकरून आल्पीय व उपाल्पीय कुरणे आढळून येतात.

दऱ्यात व उत्तर उतारांवर सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आढहून येतात. यांत मुख्यत्वेकरून फर, स्प्रूस, मॅपल, ऍश्स, ऍस्पेन हे वृक्ष आढळून येतात. काही दऱ्यात जंगली अक्रोड, जर्दाळू, पिस्ते इत्यादींची झाडे उगवतात. राज्यात प्राणीजीवन विरळ असले, तरी पक्षी विपुल आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था

किरगीझ लोक तुर्की गटात मोडतात बाराव्या शतकापर्यंत हे लोक बैकल सरोचर व येनिसे नदीच्या दरम्यान असलेल्या स्टेपच्या गवताळ प्रदेशात गुरांचे कळप पाळून उपजिविका करीत होते. तेराव्या शतकात चंगीझखनाने या प्रदेशावर हल्ला केल्यानंतर हे लोक नैर्ऋत्येकडे वळले व तिएनशान आणि पामिर येथील उंच पठारी प्रदेशात राहू लागले. मंगोलियन लोकांनी हिरवळीच्या प्रदेशांवर हल्ले करून तेथील मुख्य शहरे काबीज केली. त्यानंतर त्यांनी संबंध तुर्कस्तान आपल्या वर्चस्वाखाली आणला व स्वतःचे राज्य स्थापन केले. हे राज्य जवळजवळ तीन शतके टिकले.

अठराव्या शतकाच्या सुरूवातीस किरगीझ लोकांना काल्मुक लोकांशी लढावे लागले. काल्मुक लोकांतील कोकंदच्या खानाने किरगीझ लोकांवर वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न केला. पण किरगीझ लोकांनी आपले स्वातंष्य टिकवून धरले. एकोनिसाव्या शतकाच्या मध्यास मात्र ज्यावेळेस रशियाने तुर्कस्तान घेतला यावेळेस परिस्थिती बदलली. १ नोव्हेंबर १८६० मध्ये पिंकिंग येथे झालेल्या तहात चीन व रशिया यांच्यातील सरहद्द ठरवली गेली.

पहिल्या महायुध्दापूर्वी या भागातील उत्तरेकडे ६१ व दक्षिणेकडे ५० रशियन वसाहती होत्या. रशियन लोकांविरूद्ध किरगीझ लोकांनी १८९८ मध्ये पहिला उठाव केला पण तो मोडण्यात आला.  त्यानंतर १९१६ मध्ये दुसरा उठाव झाला पण या उठावात किरगीझ लोकांची फार नुकसानी झाली. १९१७ मध्ये रशियात क्रांती झाल्यावर किरगीझांवर थोडा काळ कोणतीही राजवट अस्तित्वात नव्हती.

१९२० पासून सखल प्रदेश सोडला, तर बाकी ठिकाणी रशियाविरूद्ध झालेल्या गनिमी युध्दात किरगीझ लोकांनी भाग घेतला. सोव्हिएट तुर्कस्तानचा भाग असलेला किरगीझीया १४ ऑक्टोंबर १९२४ रोजी सोव्हिएट संघराज्याचा एक ओब्लास्ट व १९२६ मध्ये स्वायत्त राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला.

५ डिसेंबर १९३६ रोजी आजचे किरगीझीया राज्य अस्तित्वात आले. इतर राज्याप्रमाणेच तेथील शासनव्यवस्था असून त्याचे इसिककूल, नरिन व ऑश असे तीन विभाग आहेत. त्याची ३२ ग्रामिण जिल्ह्यात विभागणी केली आहे. राज्यात १५ शहरे आणि ३५ शहर विभाग आहेत. सुप्रिम सोव्हिएटवर १९७१ च्या निवडणुकीत ३३९ सदस्य निवडून आले असून त्यापैकी १२० स्त्रिया आहेत व २३१ कम्युनिस्ट आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate