অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओमान

ओमान

अरबस्तानच्या आग्नेय टोकावरील देश. मस्कत व ओमान या नावाने १९७० पूर्वी  प्रसिद्ध. क्षेत्रफळ २,१२,४०० चौ. किमी.; लोकसंख्या सु.  ७,५०,००० (१९७०). याच्या उत्तरेस ओमानचे आखात, पूर्वेस व दक्षिणेस अरबी समुद्र, नैर्ऋत्येस दक्षिण येमेन, पश्चिमेस सौदी अरेबिया व वायव्येस संयुक्त अरब अमीर राज्ये आहेत. हॉर्मझच्या सामुद्रधुनीत शिरलेला रूऊस अल्-जबल हा ओमानचा डोंगराळ द्वीपकल्पीय भाग, कल्‌बा आणि फुजाइरा या संयुक्त अरब अमीर राज्यांनी ओमानच्या मुख्य भूमीपासून अलग केलेला आहे. १७८४ साली कलातच्या खानाकडून ओमानला मिळालेला मकरान किनाऱ्यावरील ग्वादर  बंदराजवळील प्रदेश ओमानने १९५८ साली पाकिस्तानला ३० लाख पौंड घेऊन परत केला, तर ओमानकडून १८५३ मध्ये ब्रिटनला मिळालेली दक्षिण किनाऱ्याजवळील कुरिया-मुरिया बेटे ब्रिटनने १९६७ साली ओमानला परत केली. १,६०० किमी. किनारपट्टी लाभलेल्या ओमानची मस्कत ही राजधानी आहे.

भूवर्णन

चिंचोळी किनारपट्टी, त्यामागील पर्वतप्रदेश व त्याच्याही मागे उजाड पठारी प्रदेश असे ओमानचे सर्वसाधारण भौगोलिक स्वरूप आहे. ओमानच्या आखातावरील किनारपट्टी उत्तरेकडे सु. २५० किमी. लांब व २० – ६० किमी. रुंद असून अत्यंत सुपीक आहे.  बाटिना या नावाने ही ओळखली जात असून येथील खजूर उत्तम स्वाद असलेला म्हणून जगप्रसिद्ध आहे.बाटिनाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी अतिशय अरुंद असून मस्कत शहर याच भागात आहे. किनारपट्टीला लागून अल् हाजर ही सु. ४८० किमी. आग्‍नेय-वायव्य पर्वतरांग पसरली असून, वाडी समाईल या नदीखोऱ्याने तिचे पूर्व हाजर व पश्चिम हाजर असे दोन भाग झाले आहेत. जबल अल्- अख्दर (३,१०७ मी. ) हे यावरील सर्वोच्च शिखर होय. ओमानची अरबी समुद्रावरील धोफारची किनारपट्टी मात्र सरासरी ३२ किमी. रुंद व समृद्ध आहे. या किनारपट्टीच्या उत्तरेस जबल फलिक, कमर, कारा, समहान इ. ९०० — १,२०० मी. उंचीच्या पर्वतरांगा असून या पर्वतरांगांमध्ये  धोफार नावानेच प्रसिद्ध असलेला पठारी प्रदेश आहे. ओमानचा अंतर्गत पठारी प्रदेश अतिशय रुक्ष असून सौंदी अरेबियाच्या रब-अल्-खली नावाच्या निर्मनुष्य वाळवंटभागाला तो मिळतो. किनारपट्ट्या आणि मरूद्याने सोडल्यास ओमानचा प्रदेश वाळवंटी, खडकाळ आणि उजाड आहे. नद्यांचे प्रवाहही कोरडे पडलेले असतात. त्यांना वाड्या म्हणतात. ओमानची दक्षिणेकडील मासिरा, कुरिया-मुरिया ही बेटेदेखील जवळजवळ ओसाड आहेत.

अतिशय उष्ण व किनारपट्टीवर दमट हवामान यांविषयी ओमान प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्याजवळील समुद्राचे पाणी बहुधा गरमच असते. किनारपट्टीवर नोव्हेंबर ते मार्च तपमान १६- २१ से. असते,  तर उन्हाळ्यात ते ३७ से. च्या वर व क्कचित ४६ से. पर्यंतही जाते. अंतर्गत भागात तपमान ५५ – ६० से. पर्यत जाते. पर्वतशिखरांवरील हवामान मात्र तुलनेने सौम्य आढळते. पूर्व किनाऱ्यावरील सरासरी वार्षिक पर्जन्य १० सेंमी. असला, तरी प्रामुख्याने किनाऱ्यांवर व पर्वतप्रदेशांवरच पाऊस पडतो. धोफार किनारपट्टीवर मात्र मोसमी वाऱ्यांपासून सु. ६० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. अतिशय उष्णता व कमी पाऊस यांमुळे मरूद्याने सोडल्यास, ओमानच्या अंतर्गत भागावर थोडी जंगले असून त्यांमध्ये चित्ता, हरिण, सांबर, खोकड, लांडगा, ससा इ. प्राणी आढळतात.

इतिहास-राज्यव्यवस्था

ओमानच्या किनाऱ्याहून बॅबिलोन - पूर्वकाळापासून वाहतूक होत असल्याचे पुरावे मिळतात. उत्तरेकडून आलेल्या सेमेटिकांनी ओमानमध्ये स्थायिक झालेल्या हॅमाइटांना हुसकावले होते. इ. स. पू. ५३६ मध्ये ओमानचा भाग पर्शियाच्या साम्राज्यामध्ये आल्याचा इतिहास मिळतो; तथापि सातव्या शतकात ओमान इस्लामधर्मीय बनेपर्यंतचा इतिहास सुसंगत नाही. ओमानने इस्लाम धर्म स्वीकारला तरी मूळचा वंशभेद चालूच राहिला. उत्तरेकडील आलेले ते हिनवी व मूळचे घाफिरी समजले जाऊ लागले. इस्लाम धर्मातील फाटाफुटीनंतर आठव्या शतकात अब्दल्ला इब्न इबाह (६९९ – ? ) याने ओमानमध्ये इबादीय ( अबादीय) पंथाची स्थापना केली. या लोकांनी  ७५१ मध्ये जुलंद बिन मसूद याला ओमानचा पहिला इमाम म्हणून निवडले. याच्यानंतर लोक इमामाची निवड करीत ; परंतु ११५४ मध्ये बनू नभन याने आपल्या वंशाची स्थापना केली.१४२९ पासून नभनी राजांबरोबर लोकनियुक्त इमामांचाही कारभार सुरू झाला. नवव्या शतकापासून ओमानचे संबंध पूर्व आफ्रिकेतील प्रदेशांशी जमले होते; मोझँबिकजवळील काही प्रदेशावर त्यांचा ताबाही होता. १५०८ साली पोर्तुगीजांनी ओमानचा किनाऱ्यावरील प्रदेश व पूर्व आफ्रिकेतील प्रदेश यांचा ताबा घेतला. जवळजवळ १५० वर्षे त्यांच्यातडेच हा भाग होता. १६१६ साली ओमानमधील नासिर बिन मुर्शिद या इमामाने आपली सत्ता प्रबळ करून यारुबी वंशाची स्थापना केली. याचा मुलगा बिन सैफ याने ओमान व पूर्व आफ्रिकेतून पोर्तुगीजांची हकालपट्टी केली  आणि ओमानचे साम्राज्य वाढविले. १७०८च्या सुमारास इमामाला पाठिंबा असलेले हिनवी व घाफिरी यांच्यात यादवीयुद्ध सुरू झाले. इमामाने इराणचा पाठिंबा मिळविला. १७३७ मध्ये इराणच्या नादिरशाहने ओमानवर आक्रमण केले. १७४१ मध्ये घाफिरींचा पाठिंबा असलेला इमाम अहमद बिन सैद याने इराण्यांना हाकलून सध्याच्या सय्यद (सैद) घराण्याची स्थापना केली. ब्रिटनने ओमानशी १७९८ मध्ये तह करून मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. १८२० नंतर ओमानचे साम्राज्य प्रबळ झाले. १८३२ मध्ये सुलतानाने आपली राजधानी झांझिबारला हलविली; तथापि त्याच्या मृत्यूनंतर १८५६ साली  त्याच्या मुलांनी ओमान व झांझिबार वाटून घेऊन स्वतंत्र राज्ये बनविली. ओमानचा सुलतान दुर्बल झाल्यामुळे ब्रिटनने १७९१ साली ओमानला भारताबरोबर बांधून अंकित केले. १९१३ साली ओमानच्या अंतर्गत प्रदेशातील लोकांनी बंड करून नवीन इमाम निवडला; परंतु या इमामाचा १९२० साली खून झाला. सुलतान सैय्यद तैमूर याने नवीन इमामबरोबर तह केला. या इमामामागून येणाऱ्या इमामाने १९५४ साली वेगळे राज्य स्थापण्याचा प्रयत्‍न केला;  परंतु सुलतानाने ब्रिटिशांच्या मदतीने त्याचा बीमोड केला. १८०० पासून सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमीर राज्ये यांच्या सरहद्दीवरील अल् बरायमी या मरूद्यानाच्या प्रदेशाबाबत वहाबी जमातीने गडबड चालू केली होती. ब्रिटिशांच्या मदतीने तीही शमविण्यात आली. १९६५ साली संयुक्त राष्ट्रांनी ठराव करून ओमानला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. ती ब्रिटनने मान्य केली. १९३२ साली गादीवर आलेला सुलतान सैद बिन तैमूर याच्या कारभाराला कंटाळून त्याचा मुलगा काबूस बिन सैद याने २४ जुलै १९७० रोजी रक्तशून्य क्रांती करून ओमानची गादी बळकावली. धोफार भागात १९७१- ७२ साली सुलतानाविरुद्ध उठावाचे प्रयत्न झाले; परंतु ब्रिटिशांनी पूर्वेकडील आपले साम्राज्य संपुष्टात आणले असले, तरी यूरोपला तेल पुरविणाऱ्या इराणी आखातावरील राष्ट्रांत त्यांचे हितसंबंध पुष्कळच गुंतलेले आहेत.

सुलतान हा शासनप्रमुख असून त्याच्या हाताखाली गृह, कायदा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, समाजकल्याण इत्यादींचे मंत्री असतात. शासनाच्या सोयीसाठी ओमानचे ‘विलायत’ (इलाखे) पाडले असून त्यावर सुलतान वलींची नेमणूक करतो. न्यायदान कार्जीकडेच आहे. ओमान हा संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असून त्याचे ब्रिटन, भारत, अमेरिका, नेदर्लंड्स, जर्मनी इ. देशांशी अतिशय मित्रत्वाचे संबंध आहेत. सुलतानाजवळ छोटे सैन्यदल व वैमानिक दल आहे.

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate