অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धाडसी निलेशच्या कुटूंबियांची देश पातळीवर ओळख

धाडसी निलेशच्या कुटूंबियांची देश पातळीवर ओळख

घरात अठरा विश्व दारिद्र्य.. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मुक्ताईनगरातील कोथळी येथील रेवाराम भील परिवार अतिशय हालाखीच्या स्थितीत जीवन जगत असताना त्यांचा मुलगा निलेश याने दाखविलेल्या शौर्य व धाडसाची दखल घेत केंद्रीय प्रशासनाने त्याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. मुलाच्या कर्तृत्वामुळे त्याच्या कुटूंबियांना देश पातळीवर ओळख मिळाली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ऋषिपंचमीच्या दिवशी ओंकार उगले रा.बुलढाणा हे कुटूंबियांसह कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले होते. तेथे पूर्णा नदीचे बॅक वॉटर मंदिराच्या समोरच्या बाजूस सोडून घाट तयार करण्यात आला आहे. भागवत उगले, (वय-11) हा बालक घाटावर हातपाय धुण्यासाठी गेला होता. मात्र तो पाय घसरून पाण्यात पडला. ही घटना लक्षात येताच मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कोथळी जिल्हा परिषद शाळेचा इ. चौथी चा विद्यार्थी निलेश याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात सूर मारला आणि त्या बालकास सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्याच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक झाले. निलेशला दोन लहान भाऊ असून आई-वडील मोलमजूरी करून चरितार्थ चालवितात. मुक्ताईनगर पंचायत समितीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी निलेश चा सत्कार केला आहे. तर, 8 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन यांच्या हस्ते देखील त्याचा सत्कार झाला आहे.

निलेश हा अत्यंत गरीब कुटूंबातील असून त्याच्याकडे पोहण्याचे कौशल्य आहे. आपल्या या कौशल्याचा वापर करत त्याने धाडसाने आपल्या जिवाचा विचार न करता निष्पाप बालकाचा जीव वाचवला. या शौर्यामुळे निलेश भील याची यंदाच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदा महाराष्ट्रातून चार बालकांची निवड करण्यात आली असून त्यात निलेश चा समावेश आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार त्याला देण्यात येणार आहे. कर्तृत्ववान शौर्य, धाडस दाखवलेल्या 18 वर्षाच्या आतील मुले-मुलींना हा पुरस्कार मिळतो. निलेशला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाल्याने मुक्ताईनगरचे नांव राष्ट्रीय पातळीवर निश्चितच पोहचले आहे.

लेखक: निलेश किसनराव परदेशी, चाळीसगांव, जि.जळगांव

मो.नं.7588646750

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate