অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एल् साल्वादोर

एल् साल्वादोर

मध्य अमेरिकेतील सर्वांत छोटा व सर्वांत दाट वस्तीचा देश. क्षेत्रफळ २१,३९३ चौ. किमी.; लोकसंख्या ३५,८७,९१७ (१९७१). याच्या उत्तरेस व पूर्वेस हाँडुरस, वायव्येस ग्वातेमाला आणि दक्षिणेस व पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. अटलांटिक महासागरावर किनारा नसलेला हा मध्य अमेरिकेतील एकमेव देश असून याची राजधानी सान साल्वादोर ही आहे.

भूवर्णन

पॅसिफिक किनाऱ्यावरील सखल भाग, पूर्वपश्चिम पसरलेले सहाशे मीटरवरील सुपीक पठार व उत्तरेकडील लेंपा नदीचे खोरे आणि पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस पसरलेल्या डोंगररांगा अशी याची त्रिविध रचना आहे. पॅसिफिक किनारपट्टीने १०% क्षेत्र व्यापले असून तेथे ६% लोक राहतात.

उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशाने १५% क्षेत्र व्यापले असून तेथे फक्त ६% लोक राहतात. दक्षिणेकडील पर्वतरांगांवर १,२०० ते २,३०० मी. उंचीचे वीस ज्वालामुखी असून त्यांपैकी काही जागृत आहेत. या ३०% क्षेत्रात ६३% लोक राहतात. कारण लाव्हारसाने जमीन सुपीक बनली आहे.

प्रामुख्याने याच भागात देशाची बहुतांश उत्पन्ने निघतात. दोन डोंगररांगामधील पठाराने ४५% क्षेत्र व्यापले असून तेथे २५% लोक राहतात. जागृत ज्वालामुखींपैकी ईसाल्को (१,८८५ मी.) पॅसिफिकचे दीपगृह म्हणून प्रसिद्ध आहे; कारण त्याचे धगधगते तोंड नाविकांस दूरवरून दिसते. सांता आना हे देशातील सर्वोच्च (२,३५५ मी.) शिखर आहे. लेंपा व सान मीगेल या येथील महत्त्वाच्या नद्या होत. लेंपा उत्तरेकडील ग्वातेमालातून वायव्येस प्रवेश करते. तेथून ती १२० किमी. पूर्वेकडे व मग १०५ किमी. दक्षिणेकडे वाहून पॅसिफिकला मिळते. सान मीगेलचा पसारा पूर्व भागातच आहे.

येथे सरोवरे बरीच आहेत. त्यांपैकी मध्यभागातील ईलोपांगो, ग्वातेमाला सीमेवरील गीहा व कोआतेपेक प्रसिद्ध आहेत. प्रदेशाच्या उंचसखलपणावर हवामान अवलंबून असते. नोव्हेंबर ते एप्रिल हिवाळा व मे ते ऑक्टोबर उन्हाळा असतो पण उन्हाळ्यातच पावसाच्या सरी येतात. पॅसिफिक किनारपट्टीवर पावसाची सरासरी १७२ सेंमी., पर्वतरांगांवर १७५ सेंमी. ते २५० सेंमी. व पठारावर ११५ ते १५० सेंमी. आहे.

किनारपट्टी व कमी उंचीच्या प्रदेशात तपमान २५सें. ते २९से. असते तर उंच प्रदेशामध्ये १७सें. ते २२से. असते. विस्तीर्ण जंगले असल्याने मॉहॉगनी, देवदार, अक्रोड, बालसम, अनेक औषधी वनस्पती, नाना तऱ्हेची फळझाडे, रबर इ. वनस्पती येथे आढळतात.

दक्षिणेकडे, पठारावर व उत्तरेकडील डोंगरी भागात निरनिराळ्या प्रकारचे गवत होते. विविध माकडे, जग्वार, तापीर, आर्माडिलो, ऑसेलॉट वगैरे प्राणी, पोपट, इग्वाना इ. पक्षी तसेच सुसर आणि अनेक जातींचे साप येथे आढळतात. किनाऱ्यावर मत्स्यसंपत्ती विपुल आहे.

इतिहास

स्पेनच्या आक्रमणापूर्वी पिपिल नावाच्या जमातीचे राज्य या देशात होते. त्यांच्या भाषेत याला कूस्कातलान (रत्‍नदेश) म्हणत असत. मेक्सिकोचा विजेता कोर्तेझ याच्या पेद्रो द आल्व्हारादो या अधिकाऱ्याने १५२५ मध्ये येथे स्पेनचे अधिराज्य स्थापन केले आणि जुनी राजधानी कूस्कातलान जवळच सान साल्वादोर (पवित्र उद्धारकर्ता) हे सध्याचे गाव वसवले.

पुढे गावास व देशास तेच नाव पडले. तीन शतके स्पेनच्या शोषणाखाली गेल्यावर १८२१ मध्ये इतर वसाहतींबरोबर हाही देश स्वतंत्र होऊन मेक्सिकन साम्राज्यातच सामील झाला. या वेळची विशेष घटना म्हणजे याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत स्वत:चे विलीनीकरण जाहीर केले ही होय. परंतु त्यांनीच यांचा स्वीकार केला नाही. १८२३ मध्ये मध्य अमेरिकन देशांनी मेक्सिकोपासून स्वत:चा संघ अलग केला. हाही १८३९ मध्ये मोडला.

१८४१ मध्ये साल्वादोर स्वतंत्र झाला तरी २५ जानेवारी १८५९ ला साल्वादोरने गणतंत्र जाहीर केले. तेव्हापासून विक्षोभ, अस्थिरता व राष्ट्रपतीपदासाठी लष्करी अधिकाऱ्यांची चढाओढ हाच एक साल्वादोरचा इतिहास आहे. १९११ पासून दहाहून अधिक राष्ट्राध्यक्ष झाले. सर्व सैन्याधिकारीच होते.

लष्करी उठावही होत आले. जनरल मार्तीनेस (१९३१ - ४४), जनरल कास्ट्रो (१९४५ - ४८), ऑस्कर ओसोरिओ (१९५० - ५६), लेमस (१९५६ - ६०), रिवेरा (१९६२ - ६७), फिडल हर्नांदेस (१९६७ - ) व आर्तुरो मोलिना (१९७२) हे प्रमुख राष्ट्राध्यक्ष होत.

राजकीय स्थिती

देशात अनेकदा संविधानबदल झाले असून सध्याचे संविधान १९६२ मधील आहे. ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संविधानाप्रमाणे आहे. राष्ट्रपतीची निवडणूक सार्वत्रिक मताने दर पाच वर्षांकरिता होते. त्यास लगेच फेरनिवडणुकीस उभे राहता येत नाही. राष्ट्राध्यक्षच शासनप्रमुख असतो व आपले मंत्रिमंडळ व अधिकारी तोच नेमतो. विधिमंडळात ५२ सदस्य असतात व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा त्याला अधिकार आहे.

शासनाच्या सोईसाठी देशाचे चौदा विभाग पाडले असून त्यावर एकएक राज्यपाल असतो. अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांस मताधिकार आहे आणि पुरुष मतदारास मतदान सक्तीचे आहे. पुरोहित वर्गास मतदानाची वा सरकारी अधिकारपदे घेण्याची बंदी आहे. येथे अनेक राजकीय पक्ष आहेत. देशात तिन्ही दले असून राष्ट्राध्यक्ष त्यांचा प्रमुख आहे.

१८ ते ३० वयातील पुरुषांस एक वर्ष लष्करी सेवा सक्तीची आहे. सैन्यबल साडेचार हजार असून, दोन गस्तनौका व काही विमाने आहेत. गेल्या महायुद्धात हा देश दोस्त राष्ट्रांच्या बाजूचा होता.

आर्थिक स्थिती

मुख्य व्यवसाय शेती असून मका हे प्रमुख पीक आहे. मात्र धनोत्पादनाचे साधन कॉफी हेच आहे. ज्वालामुखींच्या आसपासची सुपीक जमीन, वक्तशीर पाऊस, अल्प मजुरी व सुलभ दळणवळण यांमुळे कॉफीची लागवड प्रचंड प्रमाणावर होते. सु. ६० टक्के निर्यात व्यापार कॉफीचाच आहे.

कापूस, तांदूळ, ऊस, तंबाखू व नीळ ही येथील दुसरी महत्त्वाची पिके होत. बालसमपासून निघणाऱ्या गोंदासाठी देश प्रसिद्ध असून रबर, साबण, तेल, सिमेंट, कापड, सिगारेट, मद्य इत्यादींचे अनेक छोटे उद्योग निघाले आहेत. गवताळ भागात पशुपालन हा उद्योग आहे. त्यावर मांस, दूध, कातडी इ. उद्योग चालतात. १९७० मध्ये सु. १४·९ लक्ष गुरे, ४·२ लक्ष डुकरे, अडीच लक्ष शेळ्यामेंढ्या होत्या.

सोने चांदीचे उत्पादन आता कमी झाले असून तांबे, लोखंड, जस्त, पारा, गंधक वगैरेंच्या संभाव्य खाणी आहेत. एक पोलादाचा व एक तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे. १९५० पासून मजूर संघटनेस मान्यता मिळाली असून कामाचे तास, सुट्‍ट्यांचे नियम वगैरेंबद्दल कायदे झाले आहेत.

देशात सहा स्थानिक व काही अमेरिकन आणि ब्रिटिश बँकांच्या शाखा असून मध्यवर्ती बँकेचे १९६१ मध्ये राष्ट्रीयीकरण झालेले आहे. ‘कोलोन’ हे साल्वादोरचे नाणे अमेरिकन ०·४ डॉलर किंमतीचे आहे (१९७२).

जास्तीत जास्त ९६ किमी. रुंदी व २५६ किमी. लांबी असलेल्या देशाच्या मानाने दळणवळण प्रगत असून ७५० किमी. रेलमार्ग व १३,२४३ किमी. रस्ते आहेत. सर्व शहरांत दूरध्वनी असून नभोवाणीची दोन व दूरचित्रवाणीची दोन केंद्रे आहेत.

लोक व समाजजीवन

देशातील ८० टक्के लोक मिश्रवंशीय ‘मेस्तिसो’ असून बाकीचे पिपिल जमातीचे शुद्ध इंडियन, निग्रो व यूरोपीय आहेत. मध्य अमेरिकेतील हा सर्वांत दाट लोकवस्तीचा देश होय.

एका चौ. किमी. स. १२६ लोक राहतात. यातील तीनचतुर्थांश शेतीवरच असतात. सांता आना (१९७१ ची लोकसंख्या १,७२,३००), सान मीगेल (१,१०,९६६), सांता टेक्ला (५५,७१८), आवाचापान (५३,३८६) ही येथील काही महत्त्वाची शहरे होत. मुख्य आहार मका, तांदूळ व कडधान्ये हा असून कॉफी हे आवडते पेय आहे.

धर्मस्वातंत्र्य असले तरी बहुसंख्य लोक कॅथलिक आहेत. दिवाळी प्रमाणे महत्त्वाचा सण जुलै ४ ते ऑगष्ट ६ पर्यंत चालणारा ‘फिआस्टादे सान साल्वादोर’ (पवित्र उद्धारकाचा उत्सव) हा होय. वृत्तीने साल्वादोरी आनंदी व गायनवादन प्रिय आहेत.

सान साल्वादोरची भाषा स्पॅनिश आहे. ७ ते १३ वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे आहे; परंतु शाळांचे व शिक्षकांचे दुर्भिक्ष असल्याने साक्षरतेचा प्रसार मंदगतीने होत आहे व अद्याप पन्नास टक्क्यांहून अधिक लोक निरक्षरच आहेत.

उच्च शिक्षणाकरिता १८४१ मध्ये राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन झाले. त्याचे केंद्र सान साल्वादोर येथे आहे. तेथेच आर्थिक, शेतकी, कला, सैनिकी व तांत्रिक शिक्षणाची विद्यालये आहेत. (चित्रपत्र १).


शहाणे, मो. ज्ञा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate