অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यूकातान द्वीपकल्प

यूकातान द्वीपकल्प

यूकातान द्वीपकल्प

उत्तर अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडील द्वीपकल्प. क्षेत्रफळ १,८१,३०० चौ. किमी. मेक्सिको, बेलीझ व ग्वातेमाला या देशांमध्ये याचा विस्तार असून जास्तीत जास्त भाग मेक्सिकोमध्ये आहे. या द्वीपकल्पामुळे कॅरिबियन समुद्र व मेक्सिकोचे आखात एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

या द्वीपकल्पाचा बराचसा भाग कमी उंचीचा, सपाट, प्रवाळ व चुनखडीयुक्त टेबललँडचा असून तो दक्षिणेस सु. १५० मी. पर्यंत उंच होत गेला आहे. याचे उत्तर व पश्चिम भाग सु. २४० किमी. लांबीच्या किनारपट्टीचे आहेत. पूर्वेकडील किनारपट्टीचा भाग उत्तरेस कमी उंचीच्या टेकड्या व कड्यांनी व्यापलेला असून दक्षिण भाग लहानलहान खाड्या, उपसागर व बेटांनी व्यापला आहे. द्वीपकल्पाच्या मध्यभागी डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातच पूर्वेस आणि वायव्येस वाहणाऱ्या थोड्याफार नद्या आढळतात. द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील निम्म्या भागात पाऊस थोडा पडतो व बहुतेक सर्व पाणी चुनखडीयुक्त जमिनीत मुरून जाते. त्यामुळे या भागातील लोकांना जमिनीखालून वाहणारे प्रवाह, विहिरी यांपासूनच पाणी मिळते. या भागात बहुतेक ठिकाणी पवनचक्क्या दिसून येतात. येथे उन्हाळा व पावसाळा असे दोन ऋतू असून सर्वसाधारणपणे उत्तर भागातील हवामान उष्ण व कोरडे, तर दक्षिण भागात ते उष्ण व आर्द्रतायुक्त असते. याच्या बव्हंशी उत्तर भागात चांगल्या मातीचा पातळ थर असून तो हेनेक्वेन वाख उत्पादक प्रदेश म्हणून जगात प्रसिद्ध आहे. लागवडीखाली नसलेला भाग झुडुपे, वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग, झापोटे वुड, कच्छ वनश्री यांनी व्यापलेला आहे. कँपीची, पेतेन व बेलीझच्या भागात उष्ण प्रदेशीय कठीण लाकडाची जंगले असून या भागात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या जंगल भागात जग्वार, आर्मडिलो, इग्वाना, यूकातान टर्की इ. प्राणी आढळतात.

या प्रदेशात हेनेक्वेनशिवाय तंबाखू, कापूस इ. पिकेही घेतली जातात. यूकातान किनाऱ्यावर मासेमारी चालते. येथील पुळणी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. जलमार्ग, महामार्ग, लोहमार्ग व हवाइमार्गाने हा प्रदेश इतर भागांशी जोडलेला आहे. मेरीदा, कँपीची (मेक्सिको); बेलीझ सिटी (बेलीझ) ही यूकातानमधील प्रमुख शहरे आहेत.

स्पॅनिशांच्या आगमनापूर्वी ⇨ माया संस्कृतीचे हे केंद्र होते. या द्वीपकल्पाला मेक्सिकन लोक मायापान म्हणत होते. स्पॅनिश दर्यावर्दी गोंझालो दे गेर्रेरो याने १५११ मध्ये या भागात प्रवेश केला. त्यानंतर जेरॉनीमो द एग्विलर हा या भागात आला (१५७९). तो स्पॅनिश सेनापती कोर्तेझचा दुभाषा होता. कोर्तेझने १५२४ - २५ मध्ये या द्वीपकल्पापासून हाँडुरसपर्यंत मजल मारली. स्पॅनिश वसाहतकारांनी १५२७ पासून माया इंडियनांचा बीमोड करण्यास सुरुवात केली. पुढे १५४६ मध्ये माया इंडियन जमातीचे संयुक्त बंड मोडून काढण्यात आले.


संदर्भ : 1. Blom, F. F. The Conquest of Yucatan, 1971.

2. Roys, R. L. The India Background of Colonial Yucatan, Oklahoma city, 1972.

चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate