जीवनराम भगवानदास कृपलानी : (११ नोव्हेंबर १८८८ - १९ मार्च 19८२) महात्मा गांधींचे एक निष्ठावंत अनुयायी, राजकीय नेते, विचारवंत व समाजसेवक. सिंध प्रांतातील हैदराबाद या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. पुणे, मुंबई, कराची इ. ठिकाणी शिक्षण घेऊन एम्. ए. ही पदवी व प्राध्यापकाची नोकरी धरली (१९१२ – १७). १९१७ च्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी गांधींचे अनुयायित्व स्वीकारले. मध्यंतरी १९१९ – २० च्या दरम्यान ते बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. पुढे त्याच साली गुजरात विद्यापीठाचे आचार्य झाल्यापासून आचार्य हे उपपद त्यांना कायम लागले. काही दिवस (१९१८) त्यांनी मदन मोहन मालवीय यांचे चिटणीस म्हणून काम केले. त्यांच्या पुरस्काराने त्यांनी बनारस येते १९२० मध्ये गांधी आश्रमाची स्थापना केली आणि खादी व ग्रामोद्योग या गांधींच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी असहकारिता, सविनय कायदेभंग व छोडो भारत या चळवळींत भाग घेतला. त्यामुळे अनेक वर्षे त्यांना त्यांना कारावासही भोगावा लागला. १९३४ ते १९४६ च्या दरम्यान अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले.
१९४६ – ४७ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. परंतु राजकीय मतभेदांमुळे गांधीवधानंतर फार काळ ते कांग्रेसमध्ये राहिले नाहीत. १९४६ ते १९५० च्या दरम्यान त्यांनी संविधान समितीवर काम केले. याच काळात त्यांनी व्हिजिल (१९४६) हे राजकीय साप्ताहिक सुरू केले. १९५१ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली; पण हा पक्ष त्याच वर्षी समाजवादी पक्षात विलीन केला. पुढे ते प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले; तथापि याही पक्षाशी त्यांचे १९५४ नंतर पटले नाही. म्हणून त्यांनी तोही पक्ष सोडला. यानंतर लोकसभेचे १९५२, ५७, ६३ व ६७ मध्ये ते अनुक्रमे सभासद म्हणून निवडून आले. संसदेत भारताच्या परराष्ट्र व संरक्षण या खात्यांवर ते टीका करीत.
सुचेता मजुमदार या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्तीशी त्यांनी विवाह केला. त्या उत्तर प्रदेशाच्या १९६३ ते १९६७ च्या दरम्यान मुख्यमंत्री होत्या.
कृपलानींनी गांधीवादी विचारसरणीतून स्फुट लेखनाबरोबर पुस्तकेही लिहिली. त्यांपैकी द गांधियन वे (१९४५); द नॉन-व्हायलंट रेव्होल्यूशन; द पॉलिटिक्स ऑफ चरखा (१९४६); द फ्यूचर ऑफ काँग्रेस (१९४६); द लेटेस्ट फॅड : एज्युकेशन (१९४६); द गांधियन थॉट (१९६४); गांधी-द स्टेटस्मन (१९५१); सरप्लस व्हॅल्यू, प्लनिंग, गांधी : हिज लाइफ अँड थॉट (१९७२) वगैरे काही पुस्तके प्रसिद्ध असून गांधींच्या अर्थविषयक विचारांबाबत कृपलानी ही एक अधिकारी व्यक्ती समजण्यात येते. सध्या ते लखनौच्या गांधी आश्रमाचे संचालक असून तेथेच राहतात.
लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौरा...
फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या ...
संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव ...
फ्रान्समधील एक राजकीय विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ....