অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झां बॉदँ

झां बॉदँ

झां बॉदँ : फ्रान्समधील एक राजकीय विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ. त्याचा जन्म शिंपी कुटुंबात अँजर्स (ल्वार प्रांत) येथे झाला. त्याचे प्रारंभीचे शिक्षण अँजर्स व पॅरिस येथील धार्मिक विद्यालयांत झाले. त्यानंतर त्याने कायद्याचा अभ्यास करून तूलूझ विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. पुढे १५६१ मध्ये त्याने स्वतंत्रपणे वकिलीस सुरुवात केली. १५६८ मध्ये त्याचे दोन महत्त्वाचे ग्रंथ प्रसिद्ध झाले : ए मेथड फॉर द ईझी लर्निंग ऑफ हिस्टरी (इं. भा.) व रिस्पॉन्स टू द पॅरॅडॉक्सीस ऑफ मंस्यरमॅलेस्ट्राईट (इं. भा.). पहिल्या ग्रंथात त्याने इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण विकसित केला आणि वातावरण व भौगोलिक परिस्थिती इतिहासावर कसा प्रभाव पाडते, याचे विवेचन केले. त्याचप्रमाणे त्याने असा सिद्धांत मांडला, की मानव सतत प्रगती करीत आहे आणि मानवाचे जुन्या सुवर्णयुगातून आता पतन झाले आहे, ही कल्पना बरोबर नाही. दुसऱ्या ग्रंथात सोळाव्या शतकातील भाववाढ सोने आणि चांदी यांच्या आगमनाने झाली, याचे विश्लेषणात्मक विवेचन दिले आहे. त्याच्या या अर्थशास्त्रीय विवेचनामुळे त्यास काहीजण राजकीय अर्थकारणाचा उद्‌गाता मानतात.

वरिल ग्रंथांमुळे बॉदँवर फ्रान्सचा राजा तिसरा हेन्री (कार. १५७२-८९) याची मर्जी बसली. त्यास ड्यूक ऑफ आलांसाँचा सल्लागार नेमण्यात आले (१५७२). त्यानंतर तो राजाचा लीआँ येथे मुखत्यार बनला (१५७६). त्याच वर्षी संसदेमध्ये (स्टेट्स जनरल) त्यास सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. त्याने फ्रान्समधील सरदारवर्ग व धर्मगुरू यांच्या विरोधास न जुमानता प्रॉटेस्टंटांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले; शिवाय महसूल व्यवस्थेबाबत राजाने योजलेल्या कर आकारणी कार्यक्रमास विरोध केला. परिणामत: राजाच्या मर्जीतून तो उतरला. राजाने त्यास मुखत्यार पदावरून काढून टाकले. तथापि ड्यूक ऑफ आलांसाँच्या सेवेत राहिला. पुढे त्याने सक्रिय राजकारणातून अंग काढून घेऊन उर्वरित आयुष्य लेखन-वाचनात व्यतीत करण्याचे ठरविले आणि सिक्स बुक्स ऑफ द रिपब्लिक (इं. भा. १७७६) हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील विवेचनामागे धर्मयुद्धांच्या काळातील फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या गोंधळाची स्थिती आहे.

बॉदँ हा मध्ययुगातील महत्त्वाचा राजकीय तत्त्वज्ञ मानला जातो. त्याच्या मते राज्यसंस्थेचा उदय कुटुंबसंस्थेपासून झाला आहे व खाजगी मालमत्ता आणि कुटुंब या दोन संस्था राज्यास पायाभूत होत. त्याने याच्यापुढे जाऊन सार्वभौमत्वाचा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. सार्वभौम सत्ताधीश हा अनियंत्रित असून सर्व वैश्विक नियमांचा तो जनक असतो. राजसत्ता आणि सार्वभौमत्व यांना फक्त नैसर्गिक आणि दैवी नियमांचे बंधन वा मर्यादा असतात. तेव्हा राजा हा फक्त ईश्वराला जबाबदार असतो. या ग्रंथात त्याने राज्यपद्धतीचे प्रकार सांगितले असून राजेशाही ही स्थिर राज्यपद्धती आहे, असे मत अखेरीस मांडले आहे.

बॉदँ १५८३ मध्ये सर्व सोडून लिआँला आला आणि अखेरपर्यंत तिथे तो वकिली करीत राहिला. अखेरच्या काळात त्याचा कल धार्मिक बाबींकडे जास्त होता. त्या संबंधी त्याने द डीमनॉमेनिआ ऑफ विचिस (इं. भा. १५८०) व हेप्टॅप्लोमेरिस (१५८८) ही दोन पुस्तके लिहिली. पहिल्या ग्रंथात त्याने चेटकिणींना जाळून टाकावे, असा विचार मांडला. दुसऱ्या ग्रंथात प्रत्येक धर्म आपापल्या परीने चांगला असतो, असे मत मांडून त्यात धार्मिक सहिष्णुतेचा त्याने पुरस्कार केला आहे. महामारीच्या रोगाने तो लिआँ येथे मरण पावला.

 

संदर्भ: Franklin, J. H. Jean Bodin and the Rise of Absolutist Theory, Cambridge, 1973.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate