अजयगड, अमरकंटक, इंदूर येथील होळकर राजवाडा, उज्जैन प्राचीन नगरी, उदयपूर गुप्तकाळातील लेण्या, ओरछा हे ऐतिहासिक शहर, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान (वाघ व चित्यांसाठी प्रसिद्ध), खजुराहो येथील मंदिरे म्हणजे पाषाणरूपी शिल्पांतून निर्माण झालेले महाकाव्य. लक्षावधी पर्यटक काव्यमय शिल्पांचा रसास्वाद घेण्यासाठी येथे येतात.
एकूण 85 मंदिरांपैकी 32 मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत. चंदेल राजांच्या काळातील निर्मिती. ग्वाल्हेर ही शिंदे घराण्याची राजधानी. किल्ला, कोनार्कच्या धर्तीवर बांधलेले सूर्यमंदिर. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे भव्य स्मारक. जबलपूर हे ऐतिहासिक शहर.
पचमढी हे सातपुडा पर्वतरांगेतील निसर्ग समृद्ध हिल स्टेशन. पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणी. बुरहाणपूर हे तापी नदीवरील ऐतिहासिक ठिकाण. भारहूतच्या बौद्ध लेण्या. भीमबेटकातील भित्तिचित्र, भोपाळ हे शहर मध्य प्रदेशची राजधानी आहे. अकराव्या शतकात राजा भोजने भोपाळ शहर वसवले.
निसरर्गरम्य टेकड्यांवर वसलेले भारत भवन, गांधी भवन. शहराच्या मध्यभागी दोन विस्तीर्ण तलाव. मंडला हा जंगलाने व्यापलेला प्रदेश, मांडवगड हे ऐतिहासिक शहर. रावेरखेडी येथे थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी. रिवा अभयारण्य व धबधबा आदी महत्वाची पर्यटन केंद्रे मध्यप्रदेशात पहायला मिळतात.
मध्य प्रदेशातील प्रमुख भाषा हिंदी असली तरी काही घटकबोली या राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी खालील काही भाषा व त्या भाषा बोलणारे समूह सांगता येतील :
असुरी - असुर, बिर- असुर, भत्री - भत्रा, गडाबा, मुंडा, भूंजिया – भूंजिया, ब्रज-भाषा - मीना- भील बुंदेलखंडी - गोंड, मुजही, पाऊं, सोनर, छत्तीसगडी - आगरिया, भैना, भैर, बिंजवार, गोंडी – गोंड - ओझा, हलबी - हलबा, हलबा- नागवंशी, जबलपुरी – भूमिया, कोई/कोया - कोया, कोरवा - कोडाकू कोरकू - कोरकू-बावरिया, कोरकू, निमाडी - नाहल, पर्जी - गोंड- धूरवा, राठी - भील-बारेला, सदरी - नागेसिया
राज्यात या व्यतिरिक्त अजून काही आदिवासी लोक निवास करतात. आगरीया, आंध, बैगा, भैना, भारीया, भुमिया, भातरा, भील, बरेला, पतेलिया, भूंजिया, बियर, बिंझवार, बिरहूल, दामोर, दमारीया, धनवार, गडबा, गोंड, हलबा, हलबी, कमार, कोरकू, कनवार, राठीया, कोल, खोंड, कोलाम, मुंडा, नागेसिया, धानका, परधान, पारधी आदी आदिवासी बांधव या राज्यात निवास करतात आणि हिंदी भाषेसोबत त्यांच्या स्वत:च्या काही बोलीभाषा बोलतात.
तेराताली, चारकुला, जारवा, मटकी, फुलपट्टी, गिरडा, मंच आदी लोकनृत्य मध्य प्रदेशात प्रचलीत आहेत. तेराताली हे लोकनृत्य कमार आदिवासी सादर करतात. हे नृत्य तीन अथवा चार महिला सादर करतात. डोक्यावर एक भांडे, कपड्यांवरही छोटे छोटे धातूचे भांडे गुंफलेले असतात. हाताला आणि पायालाही अनेक प्रकारचे धातूंचे भांडे बांधून हे नृत्य सादर केले जाते.
जावरा हे नृत्य बुंदेलखड भूप्रदेशात सादर केले जाते. हे नृत्य पुरूष आणि स्त्रिया दोन्ही मिळून एकत्र सादर करतात. हे लोकनृत्य सादर करताना महिला असली दागिने परिधान करतात. रंगीबेरंगी कपडे परिधान करून हे नृत्य केले जाते. डोक्यावर एकावर एक अशा टोपल्या घेऊन तोल सांभाळत हे नृत्य सादर केले जाते. या वेळी त्यांची खास अशी लोकवाद्य वाजवली जातात.
मटकी नृत्य हे लग्नप्रसंगी मालवा प्रदेशात केले जाते. डोक्यावर अनेक मडके घेऊन तोल सांभाळत महिला हे नृत्य करतात. हे नृत्य सामुहीक स्त्रियांच्या गटांनी साजरे केले जात नाही. एकेक महिला हे नृत्य करते. यात आडा आणि खाडा नाच असे दोन प्रकार आहेत.
फुलपटी हे नृत्य कुमारी असलेल्या तरूणी सादर करतात. होळीच्या वेळी ढोलाच्या ठेक्यावर हे नृत्य साजरे केले जाते. शेतकरी कुटुंबातील मुली हे नृत्य सादर करतात.
शेतातली सर्व कामे आटपून झाल्यावर शेतकरी समुहाने ग्रीदानृत्य करतात. हे लोकनृत्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता केले जाते. वेगवेगळ्या पदन्यासाने आणि कमी जास्त प्रमाणात संथ ठेके धरत हे नृत्य सादर केले जाते.
मध्यप्रदेशातील मालवा प्रांतात मंच नावाचे लोकनृत्य प्रचलित आहे. हा एक लोकनाट्याचा प्रकार आहे. मंच म्हणजे व्यासपीठ. सामुहीक सादरीकरणाचे हे नृत्य आहे. यात नाचापेक्षा अभिनय महत्त्वाचा असून हे सादरीकरण स्थानिक लोकवाद्यांच्या चालीवर होत राहते.
मध्य प्रदेशात भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, खजुराहो इथे विमानतळ आहेत. विंध्य, मैकल, महादेव, सातमाळा, सातपुडा हे पर्वत मध्य प्रदेशात असून राज्यातून नर्मदा, तापी, मही, चंबळ, कालिसिंध, बेतवा, शोण, गोदावरी, वैणगंगा, कन्हान, वर्धा, महानदी, शिप्रा, केवाइ, जोहीला आदी नद्या वाहतात.
(लेखाचा उत्तरार्ध पूर्ण. या व्यतिरिक्त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)
लेखक -डॉ.सुधीर राजाराम देवरे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023