অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक भारत : दिल्ली

दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे शहर असून प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 1,483 चौरस किमी इतके आहे. दंतकथेनुसार दिल्ली या शहराची स्थापना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूवी झाली आहे. 1911 मध्ये इंग्रजांनी भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थलांतरीत केली. 1956 ला दिल्लीला कें‍द्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1991 ला दिल्ली प्रदेशाच्या सरकारला जास्तीचे अधिकार देण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार प्रदेशाची लोकसंख्या 1,67,53,235 इतकी आहे. या प्रदेशाची साक्षरता 86.34 टक्के आहे. दिल्लीच्या अधिकृत भाषा हिंदी, पंजाबी आणि उर्दू या आहेत. भारताच्या उत्तर भारतातला केंद्रशासित प्रदेश आणि भारताची राजधानी ही या शहराची ओळख.

महाभारत काळापासून दिल्लीचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. सतत सत्तेचे हस्तांतरण. आधी मौर्य, पल्लव. मध्य भारतातील गुप्त, नंतर चार शतके अफगाण व मुस्लीम लोकांचे आक्रमण आणि सर्वात शेवटी सोळाव्या शतकात मोगलांकडे सत्ता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीला ब्रिटीशांनी सत्ता स्थापन केली. त्यांच्या सर्व हालचालींचे केंद्र दिल्ली होते. 1947 नंतर दिल्ली भारताची राजधानी झाली. 1956 मध्ये दिल्ली केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाला. पूर्व भाग वगळता सर्व बाजूला हरियाणा हे राज्य असून पूर्वेला उत्तर प्रदेश हे राज्य आहे. 69 व्या घटनादुरूस्ती झाल्याने दिल्ली विधानसभा स्थापित झाली.

इ.स. 1991 मध्ये कायदा संमत होऊन राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. यमुना नदीच्या पश्चिम तीरावर हे शहर वसले आहे. पूर्व किनाऱ्यावरही आता विस्तार होत आहे. हे शहर जुनी दिल्ली व नवी दिल्ली या दोन विभागात पसरलेले आहे. जुनी दिल्ली हे संपूर्ण तटबंदीचे पुरातन शहर आहे. मुख्यत: मोगल काळात या शहराचा विकास झाला.

इंग्रजांनी इ.स. 1911 मध्ये कोलकात्याहून आपली राजधानी दिल्लीस स्थलांतरित केली व नवी दिल्ली या शहराचा पाया रोवला. सुप्रसिद्ध वास्तु विशारद लुटिन्स व बेकर यांनी सुंदर, भव्य व विशाल ब्रिटीश राजधानीची येथे निर्मिती केली. विस्तीर्ण रस्ते व दुतर्फी व उंच उंच वृक्षराजी, भव्य चौक व दुतर्फा पसरलेले भव्य बंगले हे नवी दिल्लीचे खास आकर्षण आहे. देशाची राजधानी असल्यामुळे येथून देशभर दळणवळणाचे जाळे विणण्यात आले. रेल्वे, विमान तसेच रस्त्यांनी सर्व भागांशी हे शहर जोडण्यात आले. राष्ट्रीय मार्ग क्र. 1, 2, 8, 10 व 24 येथून सुरू होतात.

नवी दिल्लीस उत्तर रेल्वेचे मुख्यालय आहे. नवी दिल्ली व जुनी दिल्ली ही येथील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत. हे स्थान महाभारताइतके प्राचीन आहे. येथे पांडवांनी इंद्रप्रस्थ या आपल्या राजधानीची स्थापना केली होती. त्यानंतर या स्थानाने अनेक साम्राज्यांचा उदय, ऱ्हास व अंत अनुभवला आहे. प्राचीन, मध्ययुगीन, मोगल, ब्रिटीश व स्वातंत्र्योत्तर काळातील संस्कृती व वास्तुशिल्पांचा सुंदर समन्वय येथे पाहावयास मिळतो.

मध्ययुग

जगातील उंच मिनारांपैकी एक असा कुतुबमिनार, तुघलकाबादचा किल्ला, फिरोजशहा कोटला, हजरत निजामुद्दीन अवलिया यांचे दर्गा ही मध्ययुगीन वास्तुशिल्पे येथे आहेत.

मोगल काल

पुराना किल्ला, हुमायूं व सफदरजंगची स्मारके, जंतर मंतर, लाल किल्ला, जामा मशीद व फतेहपुरी मशीद या सर्वांचा मोगलकालीन प्रेक्षणीय स्थळांत समावेश होतो.

ब्रिटीश काल

राष्ट्रपती भवन, सचिवालय, संसद, लोकसभा, इंडिया गेट, कॅनॉट प्लेस, नॅशनल म्युझियम, तीन मूर्ती हाऊस ही ब्रिटीशकालीन भव्य वास्तुशिल्पे आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळ

राजघाट व त्या परिसरातील स्मारके, विज्ञान भवन, उच्च न्यायालय, प्रगती मैदान, नेहरू व इंदिरा गांधी स्टेडियम, आशियाई क्रीडा ग्राम व अनेक भव्य प्रशासकीय इमारती स्वातंत्र्योत्तर प्रगतीच्या निदर्शक आहेत. राजघाट, शांतीवन, विजयघाट, शक्‍तिस्थळ, बिर्ला हाऊस इत्यादी स्मारके दिल्लीत पहायला मिळतात. मोगल गार्डन, बोट क्लब, लोदी गार्डन, नॅशनल रोझ गार्डन, कॅनॉट प्लेस गार्डन आदी गार्डन दिल्लीत आहेत. तीन मूर्ती, नॅशनल म्युझियम, डॉल्स म्युझियम, एअर फोर्स म्युझियम, बाल भवन, गांधी स्मारक संग्रहालय आदी संग्रहालयांना भेटी द्यायला पर्यटक प्राधान्य देतात. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, जामा मशिद, गुरूद्वारा साहिब, बहाइ मंदिर (गुलाब मंदिर) आदी पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत.

दिल्ली येथे प्रगती मैदानात दरवर्षी विश्वपुस्तक मेळावा भरत असतो. जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा पुस्तक मेळावा आहे. दिल्ली परिसरात गहू, बाजरा, ज्वारी, दाळी, मका ही मुख्य पिके आहेत. धान्यापेक्षा फळे, दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन व भाजीपाला इत्यादींवर जास्त भर दिला जातो. पालम, सफदरजंग ही विमानतळे येथे आहेत.

लेखक - डॉ.सुधीर राजाराम देवरे

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate