অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक भारत: गुजरात (पूर्वार्ध)

सांस्कृतिक भारत: गुजरात (पूर्वार्ध)

गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार गुजरातची लोकसंख्या ६,०३,८३,६२८ इतकी आहे. राज्याची साक्षरता ७९.३१टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा गुजराती असून हिंदी आणि इंग्रजी भाषेतही व्यवहार केले जातात. राज्यात ३३ जिल्हे समाविष्ट आहेत. गुजरात राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. गुजरात हे भारताच्या पश्चिम प्रदेशातील राज्य आहे. महात्मा गांधी हे १९१७ ते १९३० पर्यंत याच राज्यातील साबरमती आश्रमात रहात असत.

इ.स. पूर्व २००० वर्षांचा गुजरातचा इतिहास आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरेचे राज्य सोडून सौराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर व्दारका हे नवे राज्य स्थापले. नंतर अनेक राजघराणी-मौर्य, गुप्त, प्रतिहार इ. चालुक्य (सोलंकी) राजाच्या कार्यकाळात भरभराट व उन्नती झाली. महमूद गझनीच्या स्वाऱ्या सुरू असतानाही गुजरातचे वैभव कायम होते. स्वातंत्र्यापूर्वी गुजरात दोन भागात विभाजित होता. १) ब्रिटीशांच्या ताब्यातील, २) राजांच्या अधिपत्याखालील गुजरात. भाषावार प्रांतरचनेनुसार सौराष्ट्र व केंद्रशासित कच्‍छ व जुन्या इंग्रज सरकारच्या अखत्यारितील गुजरात यांच्यासह मुंबई असा मोठा व्दिभाषिक प्रांत होता. १ मे १९६० ला नवे गुजरात राज्य अस्तित्वात आले. भारताच्या पश्चिम किनार्‍यावर पश्चिमेला अरवी समुद्र, पाकिस्तान व राजस्थान. ईशान्येला मध्यप्रदेश, दक्षिणेला महाराष्ट्र आहे.

राज्यातील मुख्य ‍पिके तंबाखू, कापूस व शेंगदाणे ही आहेत. गुजरात हा कापड व्यवसाय तसेच तेल व साबण यांचे उत्पादक राज्य समजले जाते. इसबगोल, तांदूळ, गहू व बाजरी ही पिकेही इथे पिकतात. सागवान, खैर, बांबू यांचे विपुल प्रमाणात जंगल उत्पादन होते. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातही गुजरातची प्रगती होत आहे. गुजरात राज्यात गुजराती ही अधिकृत भाषा असली तरी राज्यात काही आदिवासी वास्तव्य करतात. त्यांच्या स्वत:च्या काही घटकबोली आहेत. राज्यातील आदिवासी व ते जी भाषा बोलतात त्यांची नावे खालीलप्रमाणे सांगता येतील.

 

भाषा

कोण बोलतात

भिली

भील, डुंगरी गरासिया, वसावे भील, मावची

धानकी

धानका

गामेती

डामोर

गामित

गामित

कच्‍छी

पारधी/ नाहर पारधी

कोकणी

कोंकणा

कोतवालिया

कोतवाल/ कोतवालिया

नायकाडी

नाईकडा

सरहोदी

वागरी /वाघरी

वारली

वारली


या व्यतिरिक्‍त राज्यात अजून काही आदिवासी वास्तव्य करतात. बारदा, बावचा, भामचा, भरवाड, डुंगरी भील, मेवासी, रावल, तावडी, भगालिया, भिलाला, पावरा, वसावा, चौधरी, धोडीया, दुबळा, पडवी, गोंड, काथोडी, कातकरी, कोळी, नाइकडा, कापडिया, पधार, पतेलिया, पोमला, राबरी, राठवा, वाघरी आदी आदिवासी गुजरात राज्यात आहेत. तर्नेतर येथे तर्नेतरची यात्रा शिव या दैवतासाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी, पंचमी व षष्ठीला भरते. पोरबंदरजवळ माधवपूर येथे कृष्णाने रूक्मिणीला पळवून आणून केलेल्या लग्नाच्या तिथीला म्हणजे चैत्र शुक्ल नवमीला ही यात्रा भरते. बनसकंथा जिल्ह्यातील अंबाजी येथे देवीची यात्रा (अंबादेवी) चैत्र महिन्यात असते. ही सर्वात मोठी वार्षिक यात्रा असते. कृष्ण जन्माष्टमीला व्दारका व डाकोर येथे ही यात्रा भरते. मकर संक्रांत, नवरात्री, डांगी दरबार, शामलजी यात्रा, भवनाथ यात्रा आदीसोबतच भवाई, रास गरबा, पतंग उत्सव, नवरात्री, दिवाळी, होळी, ताजिया हे सणही इथे साजरे होतात.

लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे,
सायास, १८७, टेलिफोन कॉलनी, पाठक मैदानाच्या पूर्वेला,
सटाणा- ४२३३०१ जि. नाशिक.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate