गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध विद्यापीठ. अहमदाबाद या ठिकाणी १९५० साली स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न व अध्यापनात्मक असून या विद्यापीठाचे एकही घटक महाविद्यालय नाही. विद्यापीठाचे क्षेत्र विस्तीर्ण असून दक्षिण गुजरात विद्यापीठ, महाराजा सयाजीराव विद्यापीठ व सरदार पटेल विद्यापीठ यांचे क्षेत्र वगळता उर्वरित गुजरात राज्याचा बहुतेक भाग या विद्यापीठाच्या कक्षेत अंतर्भूत होतो. इतर विद्यापीठांप्रमाणेच गुजरात विद्यापीठाचे संविधान असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन अधिकारी आहेत. प्रत्यक्षात सर्व प्रशासकीय कारभार कुलसचिव पाहतात. विद्यापीठास एकूण १३६ महाविद्यालये संलग्न केली असून त्यांतून संगीत, वैद्यकशास्त्र, मानव्यविद्या, तंत्रविद्या, वाणिज्य वगैरे विषयांचे पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते.
विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी, हिंदी व गुजराती असून पदव्युत्तर परीक्षांचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठात पदव्युत्तर परीक्षा व तत्सम संशोधनासाठी चार विभाग आहेत. त्यांना विद्यालय (स्कूल्स) म्हणतात. ती अशी – भाषा विद्यालय, समाजशास्त्र विद्यालय, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व शिक्षण या तीन विषयांचे एक विद्यालय आणि भौतिकशास्त्र विद्यालय. या विद्यालयांतील अध्यापकवर्ग कोणत्या ना कोणत्या तरी संशोधन प्रकल्पावर काम करीत असतो; आणि जे डॉक्टरेट या पदवीसाठी मार्गदर्शन करण्यास पात्र असतात, अशा प्राध्यापकांचीच विद्यापीठीय विभागांत नेमणूक करतात. १९७१-७२ साली विद्यापीठाचा ९९·३८ लाख एवढ्या रुपयांचा अर्थसंकल्प मान्य झाला होता. त्यासाली विद्यापीठाच्या सर्व संलग्न महाविद्यालयांतून २०,८०३ विद्यार्थी शिकत होते.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
आंध्र प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ.
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...