অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलिंग

कलिंग

कलिंग

सध्याच्या ओरिसा राज्यात समाविष्ट होणाऱ्या बहुतेक प्रदेशास प्राचीन काळी कलिंग देश म्हणत. त्या वेळी ह्याच्या सीमा निश्चित नव्हत्या. गंगेच्या मुखापासून गोदावरीच्या मुखापर्यंतचा सर्व पूर्व समुद्रकिनारा त्यात अंतर्भूत होई. अशोकाच्या वेळी (इ. स. पू. २७२-२३२) गंजाम जिल्हा त्यात होता, तर ⇨खारवेलच्या वेळी (इ. स. पू. सु. दुसरे शतक) गंजाम बरोबरच पुरी, कटक व आंध्रच्या विशाखापटनम्‌ जिल्ह्याचा काही भाग त्यात समाविष्ट झालेले दिसतात.

प्राचीन संस्कृत, पाली व तमिळ साहित्यांत तसेच भिन्न कालातील शिलालेखांत आणि मीगॅस्थीनीझ, प्लीनी, ह्युएनत्संग वगैरेंच्या वर्णनांत त्याची कलिंग, स्वायंभुववन, तिलंग, अर्कालिंग, कलिंगक, मोदोनलिंग, मक्को कालिंगे, त्रिकलिंग, तैतुल इ. नामांतरे आढळतात. ह्युएनत्संगच्या मते विपुलपीक पाणी आणि युद्धोपयोगी वन्य हत्तींनी युक्त अशाया देशातील लोक उद्धट व शीघ्रकोपी होते; येथे १०० हिंदु मंदिरे, १० बौद्ध मठ आणि ५०० महायान स्थविर संप्रदायाचे बौद्ध भिक्षू होते.

. स. पू. पाचव्या शतकात कलिंग देश नंदांच्या ताब्यात असावा, असे शिलालेखांवरून दिसते. तत्पूर्वीचा त्याचा इतिहास ज्ञात नाही. मौर्यकाळात अशोकाने इ. स. पू. २६३ मध्ये त्यावर स्वारी केली. ह्यावेळी कलिंगचे राज्य बलाढ्य होते, त्यामुळे अशोकास मोठी लढाई करावी लागली. ह्या स्वारीतील प्राणहानीमुळे उपरती होऊन अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि कलिंग आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला.

मात्र त्याच्यानंतर पुन्हा कलिंग स्वतंत्र झाला आणि चेदिवंशातील खारवेल हा शूर राजा त्याच्या तख्तावर आला. त्याने जैन धर्माचा प्रसार केला. त्याच्या छोट्या पण तेजस्वी कारकीर्दीनंतर पुन्हा काही वर्षे कलिंगामध्ये अराजक माजले. चौथ्या शतकातील समुद्रगुप्ताच्या कलिंगावरील स्वारीनंतर पुढे ६१० मध्ये शशांक आणि त्यानंतर ६२५ मध्ये हर्षवर्धन यांनी कलिंगावर स्वामित्व मिळविले.

हर्षाने बौद्ध धर्माचा पुन्हा प्रसार करण्याचा यत्न केला. ह्याच सुमारास ६३८ मध्ये ह्युएनत्संग ह्या चिनी प्रवाशाने कलिंगास भेट दिली होती. सातव्या शतकात सोम वंशातील महाभावगुप्त जनमेजय (६८०-७१२) आणि त्यानंतर ७२५ मध्ये केसरी वंशातील दुसरा महाशिवगुप्त ययाती यांनी कलिंगावर राज्य केले. महाशिवगुप्ताने अनेक प्रदेश जिंकून कलिंगाचे साम्राज्यात रूपांतर केले. त्याचा ओढा हिंदुधर्माकडे होता. त्याने पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर उभारले असावे. त्याच्यानंतर कलिंगाची सत्ता पूर्व गंग वंशातील पहिला अनंगभीम, दुसरा राजराज, दुसरा अनंगभीम व पहिला नरसिंहदेव ह्या वैष्णव राजांकडे गेली. गंगांच्या कारकीर्दीत अनेक हिंदू देवालये उभारली केली, त्यातील ⇨कोनारकचे सूर्यमंदिर तेराव्या शतकात नरसिंहदेवाने उभारले. मात्र ह्यानंतर ह्या शतकातच कलिंगावर मुसलमानांची आक्रमणे सुरू झाली. १५६८ मध्ये काला पहाड ह्याने मुकुंददेव ह्या शेवटच्या हिंदू राजाची सत्ता धुडकावून लावली. अकबराच्या वेळी राजपुतांच्या ताब्यात आणि पुढे काही दिवस मराठ्यांच्या अंमलाखाली कलिंग देश आला. पुढे १८०३ मध्ये तो ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला.

शोकाच्या तेथील कोरीव लेखांवरून तसेच खारवेलाच्या खंडगिरी व उदयगिरी येथील राणी, गणेश, हाथी आदी गुंफांवरून तत्कालीन कलेची कल्पना येते. तत्कालीन साहित्यात उल्लेखिलेल्या कथांतील प्रसंग येथील उत्थित शिल्पांत खोदलेले असून द्वारांच्या गणेश पट्ट्यांवर गायक, नर्तक, शिकारी, श्री, सूर्य ह्यांच्या शिल्पाकृती व भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत. ८०० ते १३०० च्या दरम्यान कलिंगामध्ये शेकडो हिंदु मंदिरे उभारण्यात आली. त्यांतील बरीचशी पडली असली किंवा उद्ध्वस्त केली असली, तरी जी काही बऱ्या वाईट स्वरूपात अवशिष्ट आहेत, त्यांवरून तत्कालीन वास्तुशिल्पशैलीची कल्पना येते. अवशिष्ट मंदिरांत लिंगराज, परशुरामेश्वर, मुक्तेश्वर, राजाराणी, सूर्य (कोनारक), जगन्नाथ तसेच मयुरभंजच्या परिसरातील काही मंदिरे कलादृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परशुरामेश्वर हे सर्वांत जुने मंदिर असून त्यात शिल्पपट्टीवर संगीतकारांचा जथा आहेत. त्यावर गुप्तशैलीची छटा दिसते.

इतर बहुतेक मंदिरांचे बाह्यांग, क्वचित सभागृह व गर्भगृह सुरसुंदरी, नागिणी दिक्‌पाल, गणेश, देवी, मिथुने इ. शिल्पाकृतींनी अलंकृत केलेले आहे. शिल्पाकृतींत विविध विषयांची कथात्म अभिव्यक्ती असून मूर्तीची प्रमाणबद्धता, लय, भाव आणि सौष्ठव अत्यंत कलात्मक आहेत. कलिंग नृपतींचे वैभव व विलासवृत्ती यांतून व्यक्त होते. मंदिरांची बांधणीही वैशिष्ट्यपूर्ण असून वक्ररेषाक शिखर, गर्भगृह, सभामंडप, नटमंदिर व भोगमंदिर इ. दालने ठसठशीत वाटतात. तत्कालीन वास्तुविशारदाचा दृष्टिकोन मंदिरांची भव्यता वाढविण्याकडेच असावा, असे एकंदर वास्तूंवरून निदर्शनास येते. कोनारकचे सूर्यमंदिर वास्तुकलेच्या दृष्टीने परिपूर्ण असून इथे घोडा-रथ-चक्र कल्पनेचा उपयोग करून मंदिराचे विमान म्हणजे सूर्याचा अश्वरथ अशी रचना केली आहे वसात घोडे तो रथ ओढत आहेत. हे मंदिर कामशिल्पांकरिता जगप्रसिद्ध आहे. येथील वास्तुशैली ‘ओरिसा शैली’ ह्या नावाने ओळखली जाते.

 

पहा : ओरिसा.

संदर्भ : 1. Gangooly, O. C. Orissan Sculpture and Architecture, New Delhi, 1956.

2. Govt. of India, Department of Tourism, West Bengal & Orissa, New Delhi, 1964.

3. Sivaramamurti, c, Indian Sculpture, New Delhi, 1961.

देशपांडे, सु. र.; दिवाकर, प्र. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate