অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य चरित्रे – आत्मचरित्रे

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांच्या जीवनातील संस्मरणीय व उद्‌बोधक घटनांची भक्तिपूर्वक नोंद करावी, या प्ररेणेतून म्हाइंभट्टाने संकलित केलेले लीळाचरित्र हे मराठीतील पहिले चरित्र. त्यानंतरच्या सु. साडेपाचशे वर्षाच्या काळात म्हणजे इंग्रजांच्या राजवटीचा प्रारंभ होईपर्यत त्याच भक्तीच्या आणि उद्‌बोधनाच्या प्ररेणेतून अनेक लहानमोठी गद्यपद्यात्मक चरित्रे मराठीत लिहिली गेली. आख्याने, खंडकाव्ये, पोवाडे, ऐतिहासिक बखरी यांमधून ती विखुरलेली आहेत. समाजाच्या धर्मजीवनाचे आणि इतिहासाचे साधन म्हणून चालत आलेली चरित्रलेखनाची ही परंपरा ब्रिटिश राजवटीत योजनाबद्ध रीतीने सुरू झालेल्या शिक्षण प्रसारामुळे आणि त्यात लैकिक विद्यांच्या अभ्यासावर जो भर दिला गेला त्यामुळे हळूहळू बदलू लागली.

शाळेतील विद्यार्थ्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींचे जीवनवृत्तांत आदर्श म्हणून ठेवावेत या बोधवादी भूमिकेत कोलंबस ( महादेवशास्त्री कोल्हटकर, १८४९ ), सॉक्रेटिस ( कृष्णशास्त्री चिपळूणकर, १८५२ ), नाना फडणवीस ( १८५२ ), बेंजामिन फ्रॅन्कलिन ( रा. गो. करंदीकर, १८७१ ) आदीबद्दलचे वृत्तांत लिहिणार्‍या या काळातील लेखकांनी साहजिकपणेच, त्या त्या व्यक्तींच्या इंग्रजीत उपलब्ध असणार्‍या चरित्रांचा भरपूर आधार घेतलेला आहे. कोलंबसाचा वृत्तांत ( महादेवशास्त्री कोल्हटकर ) आणि नाना फडनवीस ह्यांची बखर हे दोन चरित्रग्रंथ तर अनुक्रमे रॉबर्ट्‌सन आणि मॅक्‌डॉनल्ड ह्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे अनुवादच होत. ह्याच पद्धतीची पण स्वतंत्र स्वरूपाची असणारी म. वि. चौबळ संपादित हनुमंतस्वामीकृत रामदासस्वामीचे चरित्र ( १८७१ ), रा. पां. आजरेकर कृत श्रीविष्णुबाबा ब्रम्हचारी यांचे चरित्र ( १८७२ ) अशी चरित्रे उपलब्ध होत असतानाच थोड्याफार वेगळ्या वाङ्‌मयीन प्रयोजनातून साकार झालेली विष्णुशास्त्री चिपळूणकरांची डॉ. जॉन्सनसंबंधीची लेखमाला निबंधमालेतून प्रसिद्ध होऊ लागली ( १८७६ -७७ ).

तिच्यात विद्वान, ध्येयवादी, मेहनती पण काहीशा विक्षिप्त स्वभावाच्या डॉ. जॉन्सनने स्वत:भोवतालच्या परिस्थितीवर मात करून इंग्रजी भाषेच्या व साहित्याच्या इतिहासात जे प्रचंड काम केले, ते सांगताना चिपळूणकरांनी जॉन्सनकडे एक गुणदोषयुक्त व्यक्ती म्हणून पाहिलेले होते; इतके रंजक आणि तरीही त्या व्यक्तीच्या असामान्यत्त्वातून त्याच्या राष्ट्रातील ज्ञानलालसेने भारलेल्या वातावरणाची ओळख करून देणारे दुसरे चरित्रपर लिखाण तत्पूर्वी मराठी वाचकाला वाचावयास मिळाले नव्हते; एखाद्या चरित्रलेखकाची कल्पनाशक्ती उपलब्ध माहितीला जो आकार देते तो इतिहासाच्या वा कादंबरीच्या कसा आणि कुठे जवळपास येतो हेही त्याला त्यामधून प्रथमच कळत होते. चरित्रनायकाचा स्वभाव आणि त्याच्यापुढील समस्यांचे दर्शन घडविणारी चिपळूणकरांची ही नवी दृष्टी लेखनाला लालित्याचा स्पर्श घडविणारी असल्याने जाणकार वाचकांकडून या पुढील काळात यथातथ्तत्वाबरोबर थोडी कलात्मकतेची अपेक्षाही चरित्रांकडून केली जाऊ लागली. त्या नमुन्यानुसार लेखकांकडून सत्याधिष्ठित जीवनचित्रण करण्याच्या हेतूने पत्रे, रोजनिश्या, आठवणी गोळा केल्या जाऊ लागल्या. त्यामुळे नंतरच्या काळात परिपूर्ण पुनर्निर्मितीच्या स्वरूपाची कलात्मका जरी नाही, तरी जसजसा शिक्षणप्रसार वाढत तसतशी बहुविधते बरोबरच यथार्थता आणि वाचनीयता चरित्रांमधून अधिकाधिक दिसू लागली.

आजही चरित्रविषय होणार्‍या बहुतेक सर्व थोर व्यक्तींच्या जीवनांचा संबंध समाजातील विविध चळवळींशी आणि मतप्रणालींशी घनिष्ठ स्वरूपाचा असल्याने त्यांची चरित्रेही त्यांच्या कार्याच्या प्रसाराची साधने कळत-नकळतच झालेली असतात. चरित्रनायकांबद्दल लिहिताना गुणदोषांचे संमिश्र चित्रण झाले, तर व्यक्तीच्या थोरवीला बाध तर येणार नाहीना, असे भयही अनेकांना वाटताना दिसते. त्यामुळे मानवी मनाच्या वास्तावातील गुंतागुंतीना सामोरे न जाता आकर्षक निवेदनाच्या साहाय्याने नायकाचा घटनाप्रधान जीवनक्रम सांगता आला, की लेखनातील साहित्यिक बाजू चांगली सजली असल्याचे समाधान लेखक-वाचक मानताना आढळतात. चरित्रसामग्रीतृन अर्थपूर्ण अशी पुनर्रचना करणे साधलेले नसेल, तर साहित्य या दृष्टीने एखाद्या थोर व्यक्तीचे चरित्र सामान्य होऊ शकते आणि ती साधल्यास सामान्य व्यक्तीचे चरित्रही थोर होऊ शकते हे अद्याप मराठी वाचकांना पुरेसे प्रतीत झालेलेच नाही.

डॉ. जॉन्सनचे विष्णुशास्त्रीयकृत चरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच जनमानसाची अस्मिता जागृत करण्याचे निबंधमालेचे प्रमुख उद्दिष्ट सुशिक्षितांवर प्रभाव पाडू लागलेले होते. त्याचा सर्वसाधारण परिणाम सुशिक्षितांमध्ये मराठेशाहीच्या इतिहासाबद्दल आस्थेची भावना निर्माण होण्यात झालेला होता. १८७५ ते १९७५ या पुढील शंभर वर्षाच्या कालखंडात साने, मोडक, शाळिग्राम, खरे, पारसनीस, राजवाडे, सरदेसाई, शेजवलकर आदींनी सातत्याने जुनी कागदपत्रे आणि त्यांचे ऐतिहासिक अन्वयार्थ प्रसिद्ध करून जे उत्तेजक वातावरण निर्माण केले त्यांतून इतिहासकालीन थोर व्यक्तींच्या जीवनाबद्दल कुतूहल निर्माण झाले व चरित्रसाहित्याला एक चांगला बहरच आला.

त्यामध्ये पूर्वकाळात असामान्य कर्तबगारी करून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून नजीकच्या काळात हौतात्म्य पतकरून गेलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील शूर व्यक्तीपर्यत अनेकांची निवड लेखकांनी केलेली आढळते; मात्र घटना, हकीगती यांना प्राधान्य देत, थोड्याशा रंजक पद्धतीने लिहिलेला हा व्यक्तिजीवनाचा इतिहासच असल्याने या चरित्रांबद्दल जी चर्चा झाली, ती त्यांतील सत्यासत्यांच्या संदर्भात,साहित्य म्हणून नव्हे. त्यामुळे महादजी शिंदे ( वि. र. नातूकृत चरित्र, १८९४ ) आणि नाना फडणवीस ( वासुदेवशास्त्री खरेकृत चरित्र, १८९२ ) यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण ह्याची त्यांच्या चरित्रांच्या अनुषंगाने सुरू झालेली चर्चा चिं. ग. भानूंचे नाना फडणवीसविषयक नवे संशोधन पुढे येण्याला कारणीभूत झाली.

या वातावरणात पूर्वी शिवचरित्रे प्रसिद्ध झालेली असतानाही इंग्रजी – फार्सीतील नव्या माहितीच्या आधारावर लिहिलेले कृ. अ. केळुसकरांचे ...छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ( १९०७ ) जेवढे वाचकप्रिय झाले, तेवढीच नवनवीन माहितीची भर पडून निर्माण झालेली पुढील काळातील वा. कृ. भावे ( युगप्रवर्तक शिवाजी महाराज, १९५५ ), दि. वि. काळे ( छत्रपती शिवाजी महाराज, १९५६ ), गो. स. सरदेसाई ( राजा शिवाजी , १९५७ ), वि. क. वाकरूकर ( छत्रपती श्री शिवप्रभूंचे चरित्र, १९५८ ), ब, मो. पुरंदरे ( राजा शिवछत्रपती, १९५८) यांची चरित्रेही ( त्याच कारणांनी ) लोकप्रिय झाली.

उपलब्ध होणार्‍या नवीन ऐतिहासिक माहितीच्या साहाय्याने व्यक्तिमत्वाचे जे नवे मूल्यमापन झाले त्यात शिवाजी महाराजांचे विभूतिमत्व अधिकच उजळत गेले व अस्मिता जागृतीला अपेक्षित असे साह्यही झाले. तथापि, अद्याप लेखकांकडून वास्तव आणि परिपूर्ण शिवचरित्राची अपेक्षा केली जात असून त्यासाठी त्र्यं. शं. शेजवळकरांनी गोळा केलेली शिवचरित्राची साधने एका विस्तृत ग्रंथाच्या रूपाने जाणकारांसमोर ठेवली गेलेली आहेतच ( श्रीशिवछत्रपती– संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने, १९६४ ).

प्रेरक ठरलेली वाचनीय चरित्रे

या प्रकारची इतिहासविषयक चर्चेला प्रेरक ठरलेली वाचनीय चरित्रे पुढीलप्रमाणे उल्लेखिता येतील.

  1. बापू गोखले यांचे चरित्र ( शं. तु. शाळिग्राम, १८७७ )
  2. श्रीमंत बाजीराव बल्लाळ ऊर्फ पहिले बाजीरावसाहेब पेशवे ( ना. वि. बापट, १८७९ )
  3. नाना फडनवीस ( बा. ना. देव, १९०४ )
  4. झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब ह्यांचे चरित्र ( १८९४ )
  5. महापुरूष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार ( द. ब.पारसनीस, १९०० ),
  6. देवी श्री. अहल्याबाई होळकर हिचे सचित्र चरित्र ( वि. ना. देव ऊर्फ ‘पुरूषोत्तम’, १९१३ )
  7. चक्रवर्ति नेपोलियनचे चरित्र ( वि. ल. भावे, १९१७ )
  8. प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी म्हणजेच सातार्‍याच्या राज्यक्रांतीचा इतिहास ( के. सी. ठाकरे, १९४८ )
  9. छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे १९६० )

यांपैकी पारसनीस, भावे आणि ठाकरे आणि ठाकरे यांचे लिखाण आकर्षक लेखनपद्धतीमुळेही ध्यानात रहावे असे आहे. पारसनिसांनी राणी लक्ष्मीबाईची तडफदार व्यक्तिरेखा विशेष सूक्ष्मपणाने व समप्राण उभी केली; ठाकर्‍यांनी पेशवाईच्या अस्तालगतचे रंगो बापुजींचे अदभुतरम्य, साहसी जीवन ग्रथित करताना वापरलेली उपरोधपूर्ण, खटकेबाज निवेदनपद्धती आणि समाजप्रवृत्तीवर केलेली भाष्ये लेखकाचा आक्रमक आवेश प्रगट करणारी व रसरशीत झालेली आहेत, तर वि. ल. भावे यांना चक्रवर्ती नेपोलियनचे चरित्र परमेश्वराने घडविलेले एक अतिकुशल प्रतिभासंपन्न नाटक असावे तसे करूणोदत्त दिसले आहे. नेपोलियनच्या जीवनातील चढउतारांशी मनाने समरस होऊन त्यांनी रंगविलेले नेपोलियनच्या शौर्याचे, शृंगाराचे आणि कारुण्याचे क्षण त्यांच्या लेखनाला अपेक्षेप्रमाणे चटकदार कादंबरीची रम्यता आणतात.

अशी इतिहासाधिष्ठित चरित्रे प्रसिद्ध व्हायला नुकताच प्रारंभ झाला होता, तेव्हापासून सातत्याने चौतीस वर्षे विनायक कोंडदेव ओकांचे बालबोध ( १८८१ ) मासिक दर महिन्याला एखाद्या थोर व्यक्तीची थोडक्यात ओळख करून देऊन सांस्कृतिक संदर्भात चरित्रनिर्मितीस अनुकूल वातावरण तयार करीत होते. न्या. रानडे, लोकहितवादी यांच्यासारख्या अनेक समकालीन व्यक्तींवर लिहिताना त्यांचे काही स्वभावविशेषही टिपले जावेत अशी आधिनिक दृष्टी संपादक –लेखकांनी त्यात दाखविल्यामुळे या लेखनात एकेका व्यक्तिमत्वाचे अनौपचारिक स्वरूपही व्यक्त होऊन जाई. या वातावरणात ह्याच प्रकारचे पण प्रदीर्घ स्वरूपाचे दर्जेदार लेखन केले ते लक्ष्मणशास्त्री चिपळूणकर आणि काशीबाई कानिटकर ह्यांनी लक्ष्मणशास्त्र्यांनी त्यांचे थोरले बंधू विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र लिहिताना ( १८९४ ) विष्णुशास्त्र्यांनीच प्रतिपादिलेला बॉझ्‌वेल ह्या प्रसिद्ध इंग्रज चरित्रकाराचा वास्तव चित्रणाचा आदर्श काटेकोरपणाने स्वत:समोर ठेवला.

नायकाचे व्यक्तिमत्त्व कोणत्या संस्कारांतून घडले, याचा वेध घेऊन त्याचे त्याच्या लोकप्रसिद्ध विचारांशी असणारे नाते सूचित केले; चरित्रलेखकाला आवश्यक असणारी आत्मीयता आणि तटस्थता लेखकाच्या जवळ होती, हे त्यांनी जी काही थोडी अप्रिय सत्ये प्रगट केली त्यावरून कळत होते. ह्याच कारणाने बा. ना. देव या तत्कालीन सुजाण समाक्षकाने या चरित्राचा गौरव केला, तर वा. दा. मुंडले यांच्यासारख्या काही विभूतिपूजकांनी त्याबद्दल खेदही नोंदविला. काशीबाईनी डॉ. आनंदीबाई जोशी ह्यांचे चरित्र लिहिले ( १८९१ ). आनंदीबाईनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना जे साहस अनुभवले होते, ते काशीबाईनी सांगितलेच; परंतु एक स्त्री म्हणून आनंदीबाईनी जे सांसारिक सुखदु:ख तीव्रतेने अनुभवले, तेही मन:पूर्वकतेने धाडसाने साध्यासुध्या शैलात व्यक्त केले.

या दोन दर्जेदार चरित्रांपासून सुरू झालेला आधुनिक काळातील व्यक्तींच्या जीवनाचे वास्तव चित्रण करण्याचा प्रघात पुढील काळात विविध जीवनक्षेत्रांतील व्यक्तींची चरित्रे लिहिली गेल्याने बराच विस्तारला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्राच्या लोकजीवनावर प्रभाव पाडून गेलेली बराच विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत आणि कार्यकर्ती मंडळी माहितीपर चरित्राचे आणि चरित्रमालिकांचे विषय झाली. अव्वल इंग्रजीतील बाळशास्त्री जांभेकर – दादाभाई नवरोजी यांच्यापासून तो स्वातंत्र्योत्तर काळांतील नेहरू – आंबेडकरांपर्यतच्या, सु. दीडशे वर्षाच्या कालखंडातील व्यक्तींवर लिहिताना निरनिराळ्या लेखकांनी डोळ्यापुढे ठेवलेल्या विभिन्न प्रयोजनांतून एका व्यक्तींची अनेक चरित्रेही निर्माण होऊ लागली. लोकशिक्षण व मतप्रसार असे हेतू मनात असणार्‍या काही लेखकांनी स्वत:च्या प्रतिपक्षाचे परामर्श स्वत: लिहिलेल्या चरित्रांमधून घेतले.

अशा लेखनाला सामाजिक इतिहासाच्या संदर्भात महत्त्व असल्याने या काळातील बहुतेक चरित्रांच्या शीर्षकांत ‘काल आणि कर्तृत्व’ हे वा या अर्थाचे शब्द वरचेवर दिसू लागले. चरित्राचा घाट या दृष्टीने पहिल्या भागात बालपण, विद्याभ्यास, सांसारिक अनुभव येऊ लागले आणि दुसर्‍या भागात संबंधित व्यक्तीचे जे कार्यक्षेत्र असेल, त्याची ओळख करून दिली जाऊ लागली. या घाटात फरक पडला, तो चरित्राच्या लहान-मोठ्या आकारानुसार किंवा लेखकाला अपेक्षित असणार्‍या वाचकांच्या लहानमोठ्या वयोमानानुसार. इथे बहुसंख्य चरित्रलेखकांनी स्वीकारलेली हकिगतीच्या निवेदकाची भूमिका जी पुनर्निर्मिती साधू शकत नव्हती, ती साधण्यासाठी १९५० च्या सुमारास साहित्यक्षेत्रात चरित्रात्मक कादंबरीचा जन्म झाला; परंतु विशेष लोकप्रिय झालेला हा साहित्यप्रकार धड ना चरित्र, धड ना कादंबरी अशा स्वरूपाचा आहे, चांगल्या दर्जेदार चरित्रांना तो पर्याय नाही अशी खंतही जाणकारांकडून वरचेवर प्रगट झाली.

समाजहितचिंतकांची काही महत्त्वाची चरित्रे

या प्रकारची काल आणि कर्तृत्व ह्यांचा परिचय करून देणारी समाजहितचिंतकांची काही महत्त्वाची चरित्रे पुढीलप्रमाणे आहेत

  1. श्री. ना. कर्नाटकी यांनी लिहिलेली, थोर प्राच्यविद्याविशारद रा. गो. भांडारकर (१९२७ ),विद्‌वान सुधारक न्या. का. त्र्यं. तेलंग ( १९२९ ),संशोधक – सामाजसेवक डॉ. भाऊ दाजी लाड ( १९३१) यांची चरित्रे.
  2. धर्मशील वृत्ताचे, रामशास्त्री बाण्याचे रावसाहेब वि. ना. मंडलीक ह्यांचे ग. रा. हवलदार ह्यांनी लिहिलेले चरित्र ( २ भाग, १९२७ ). मंडळीकांनी त्यांच्या वर्षानुवर्षाच्या रोजनिश्या अत्यंत साक्षेपाने लिहिलेल्या होत्या. त्यांचा भरपूर उपयोग केल्याने या चरित्रातून अव्वल इंग्रजीच्या काळाचीही बरीच कल्पना येते.
  3. याच काळातील एक द्रष्ये पुरूष शतपत्रकर्ते गोपाळराव हरि देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे, त्यांच्या चरित्रसाधनांची केलेली जुळवाजुळवच वाचकांसमोर ठेवणारे, कृ. ना. आठल्येकृत चरित्र ( १९२६ ). पुढे ह्याच सामग्रीत अधिक भर घालून त्र्यं. शं. शेजवलकर, गं. बा. सरदार, अ. का. प्रियोळकर, गोवर्धन पारीख इत्यादींनी चिपळूणकर युगात संशयास्पद झालेल्या लोकहितवादी ह्यांच्या वैचारिक मोठेपणाचे प्रतिपादन अभिमानपूर्वक केलेले आढळते. गोपाळराव हरि ( १९७९ ) हा लोकहितवादींच्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचारसरणीची एकात्म मूर्ती उभी करणारा सरोजिनी वैद्यकृत चरित्रग्रंथ ह्याच मालिकेतील एक म्हणावा लागेल.
  4. मुंबईचे वर्णन लिहिणार्‍या गोविंद नारायण माडगावकरांचे, जुना काळ उभा करणारे, अ. का. प्रियोळकरकृत चरित्र ( १९६४ ).
  5. पु. बा. कुलकर्णीकृत जगन्नाथ शंकरशेट ( १९५८ ), मामा परमानंद ( १९६३ ), शेठ जावजी दादाजी ( निर्णयसागराचे संस्थापक ) ( १९६७ ) ह्यांची चरित्रे, अव्वल इंग्रजीत महाराष्ट्राचे शैक्षणिक, सांस्कृतिक, जीवन या व्यक्तींकडून कसे प्रयत्‍नपूर्वक आकाराला आणले गेले, त्याची चांगली ओळख करून देतात.
  6. भिषग्‌वर्य, ब्रह्षी अण्णासाहेब पटवर्धनांच्या ऋषितुल्य, असाधारण जीवनाचा ‘अप्रबुद्धी’नी करून दिलेला परिचय भारतीयत्वाचे वेगळे दर्शन घडवतो ( १९२६ ).
  7. विधवाविवाहाच्या प्रश्नावर जिवाचे रान करणारे विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांचे श्री. स. पंडितकृत चरित्र ( १९३६) किंवा बाळशास्त्री जांभेकरांचे दुर्मिळ झालेले लेखन तीन खंडांत एकत्र करताना ग. गं. जांभेकरांनी प्रारंभी त्याला जोडलेले बाळशास्त्रींचे चरित्र ( १९५० ), सुधारकाग्रणी गो. ग. आगरकरांची जगन्नाथ धोंडू भांगले ( १८९५), मा. दा. आळतेकर ( १९०१ ) यांनी लिहिलेली, आगरकरांची थोरवी व तळमळ व्यक्त करणारी चरित्रे.वर उल्लेखिलेल्या ग. गं. जांभेकरांप्रमाणेच वंशजांनी अभिमानपूर्वक आपल्या पूर्वजांबद्दल लिहायचे,

ही पद्धतीही आता लेखनक्षेत्रात रूढ झालेली आहे

  1. यांत्रिकाची यात्रा ( लक्ष्मणराव किर्लोस्करांचे चरित्र : शं. वा. किर्लोस्कर, १९५८ )
  2. वडिलांचे सेवेसी ( म. म. जोशी, वा. म. जोशी, ना.म. जोशी चरित्रे अ.म. जोशी, १९६० ),
  3. वाळवंटातील पाऊले ( न. चिं. केळकरांविषयी – का. न. केळकर, १९६३ )
  4. राजारामशास्त्री भागवत.... ( दुर्गा भागवत, १९४७ ),
  5. सांगे वडिलांची कीर्ती ( व. पु. काळे, १९७५ ) .

याचप्रमाणे एखाद्या कर्तबगार व्यावसायिकाची कर्तबगारी मेहनती लेखकाकडून मुद्दाम चरित्र लिहवून घेऊन ग्रथित करून ठेवण्याचे महत्त्व जाणकारांना कळू लागले आहे (वालचंद हिराचंद : व्यक्ती, काळ व कर्तृत्व – गं. दे. खानोलकर, १९६५ ). सांस्कृतिक इतिहासाचे एक साधन या दृष्टीने हे चरित्रलेखन फार आवश्यकही ठरते.

एखाद्या व्यक्तीने जीवन तिच्या काळाशी अनेक संदर्भात एकरूप झालेले असेल, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकेक पैलू लक्षात घेऊन तिची एकाहून अधिक चरित्रे लिहिली जाणे स्वाभाविकच होते. न्या. रानडे, ना. गोखले, लो. टिळक, म. गांधी, दलितोद्वारक आंबेडकर, क्रांतिकारक सावरकर व धर्मसंजीवक विवेकानंद यांची या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण चरित्रे मराठीत आता विपुलतेने उपलब्ध आहेत. संख्येने पाउणशेहून अधिक असणाऱ्या टिळकचरित्रांच्या निर्मितीस टिळकांच्या पन्नासाव्या वाढदिवसापासून जन्मशताब्दीपर्यत अनेक निमित्ते झालेली आहेत. सर्वागीण परिचयाची भूमिका घेणाऱ्या न. चिं. केळकरांच्या बृहद टिळक चरित्रापासून ( लौ. टिळक यांचे चरित्र – पूर्वार्ध, १९२३; उत्तरार्ध – खंड २, १९२८; उत्तरार्ध खंड ३, १९२८ ) स. वि. बापटांनी शेकडो लोकांकडून मिळविलेल्या टिलकांच्या लहानमोठ्या आठवणींपर्यत ( लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका – ३ खंड; १९२४, १९२५, १९२८ ) अनेक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथांचा त्यांत समावेश आहे.

चरित्रनायकांबद्दलच्या नवनवीन माहितीपासून नव्या मूल्यमापनापर्यतचा प्रवासही त्यांत आढळतो. न. र. फाटकांचे लोकमान्य पुरूषोत्तम म्हणून टिळकांचा गौरव करते ( १९७२ ); पण केवळ विभूतिपूजेची वृत्ती न ठेवता त्यांच्या कार्याच्या मर्यादांची आणि अपपरिणामांची चिकित्साही करते. लोकमान्य प्रसिद्ध होण्यापूर्वीच न्या. रानडे यांचे चरित्रलेखक म्हणून फाटकांचे लेखनतंत्र निश्चित झालेले होते. प्रारंभी थोर व्यक्तींच्या खाजगी आवश्यक तेवढीच ओळख करून देऊन मग कालक्रमाने त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख चितारावयाचा आणि ऐतिहासिक संदर्भात त्यांचे मूल्यमापन सूचित करायचे, अशी साधारणपणे एका प्रकारची मांडणी त्यांच्या न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि टिळक ह्यांच्या चरित्रांमध्ये आहे.

पेशवाईच्या अस्तानंतरचे महाराष्ट्राचे सर्वागीण पुनरूस्थान रानडे यांच्या व्यापक धर्मशील विचारप्रणालीतून कसकसे घडले याचा अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यावर आधारलेला अभ्यास, हे फाटकांच्या रानडेचरित्राचे वैशिष्ट्य ( न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र, १९२४ ), तर पाश्चात्य संस्कारांतून नामदार गोखल्यांचे आधुनिक भारतीयत्व कसे घडले होते, हे सांगणे फाटककृत आदर्श भारतसेवकाचे ( १९६७) वैशिष्ट्य म्हणता येईल. फाटकांची गद्यशैली कधी रूक्षतेच्या, क्लिष्टतेच्या व अनावश्यक उपरोधाच्या खुणा दाखवीत असली, तरी त्यांच्या ग्रंथांतील स्वतंत्र दृष्टिकोण व अभ्यासू वृत्ती मनावर परिणाम केल्याखेरीज राहात नाही.

नामदार गोखल्यांची पु. पां. गोखले ( १९६६ ) आणि वा. ब. पटवर्धन यांनी लिहिलेली ( मा. मनोरंजन, मध्ये प्रसिद्ध, १९१९) चरित्रेही उल्लेखनीय आहेत. पहिल्यामध्ये माहितीचे संकलन भरपूर असून दुसऱ्यामध्ये गोखल्यांच्या पूर्व-पश्चिमेच्या संस्कृतीतून संस्कारित झालेल्या व्यक्तिमत्त्वाचे व त्या निमित्ताने जाणवलेले मानवी जीवनाच्या स्वरूपाचे गंभीर, काव्यात्म असे चिंतन आलेले आहे. दुर्देवाने हे सुंदर स्वच्छंदतावादी इंग्रजी साहित्याचा संस्कारांतून लिहिले गेलेले गोखल्यांचे चरित्र अपुरेच राहिल्याने पुस्तकरूपानेही आलेले नाही. पु. पां. गोखल्यांनी १९३० मध्ये प्रसिद्ध झालेल्या मा. दा. अळतेकरकृत आगरकरचरित्रात ( गोपाळ गणेश आगरकर .. ) होती, त्यापेक्षा अधिक नवी माहिती मिळवून लिहिलेले सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांचे चरित्र ( १९३९ ), माहिती आणि कार्याचा गौरव अशा दोनही दृष्टींनी मौलिक आहे. सावरकरांच्या अनेक चरित्रांमध्ये शि. ल. करंदीकर ( १९४३ ), भा. कृ. केळकर ( १९५२ ), वि. स. वाळिंबे ( १९६७ ) आणि धनंजय कीर ( १९७२ ) यांनी लिहिलेली

चरित्रे सावरकरांच्या तेजस्वी क्रांतिकार्याची विविध घटना-विचार यांमधून उत्तम ओळख करून देतात. स्वातंत्र्योत्तर काळात, महात्मा जोतिबा फुल्यांच्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सामाजिक कार्याचे एक वेगळेच आकलन विचारवंतांना आणि कार्यकर्त्याना झाल्याने जोतिबांच्या लिखाणाबद्दल आणि जीवनाबद्दल अलीकडे बरेच गौरवपूर्वक लिहिले गेले आहे. त्यामध्ये धनंजय कीरलिखित फुलेचरित्र ( १९६८ ) हा अतिशय महत्त्वाचा, प्रौढ आणि प्रशंसनीय असा प्रयत्‍न आहे. डॉ. आंबेडकरांनी अनुभवलेला जीवनकलह, जातिबांधवांसाठी उभे केलेले संधर्षमय लढे आणि निर्माण केलेली कार्य परंपरा त्यांच्या चां. भ. खैरमोडेलिखित पंचखंडात्मक चरित्रात ( डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, १९५२ – ६८) त्याचप्रमाणे धनंजय कीरलिखित बृहद्‌चरित्रात, ( विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानस आणि तत्त्वाविचार, ( १९६६) सविस्तर प्रगटलेली आहे. यांव्यतिरिक्त आंबेडकरांचे धर्मातर, राज्यघटनाकर्तृत्व, मानवताप्रेम हे विषयही स्वतंत्रपणाने अनेक आठवणींच्या संग्रहांचा विषय झालेले आहेतच.

१९१८ साली प्रसिद्ध झालेल्या अवंतिकाबाई गोखले यांच्या महात्मा गांधीच्या चरित्रापासून ( ज्याला लोकमान्य टिळकांची गांधीजींविषयीच्या प्रस्तावना लाभली), दा. न. शुखरे व त्र्यं. र. देवगिरीकर यांच्या अनुक्रमे १९४४ व १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गांधीचरित्रांपर्यत विविधांगी माहिती आणि विवेचन यांची भर गांधी चरित्रांतून पडलेली आहे. आधुनिक भारतकर्ते आचार्य जावडेकर यांचे टिळक-गांधी तुलनात्मक विवेचन ही त्याची एक अपरिहार्य परिणतीच आहे ( लो. टिळक व  म. गांधी १९४६ ). ना. ग. गोरे ( १९६५ ) आणि पां. वा. गाडगीळ ( १९६६ ) ह्यांच्या नेहरू- चरित्रांना दर्जेदार चिंतनाचा सूर लाभलेला आहे. तथापि आटोपशीरपणाने व्यक्तिवैशिष्ट्ये सांगणारे आचार्य अत्रे यांचे सूर्यास्त ( पं. नेहरूचरित्र – १९६४ ) तसेच कादंबरीकार ना. सी. फडके यांची दादाभाई नवरोजी ( १९२० ), लो. टिळक ( १९५० ) व राष्ट्रपिता महात्मा गांधी ( १९५१ ) ही चरित्रे निवडक प्रसंग आणि आकर्षक शैली यांमुळे सर्वसामान्य वाचकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत. बडोदा संस्थानचे प्रजाहितदक्ष महाराज सयाजीराव गायकवाड यांचीही अशीच अनेक चरित्रे लिहिली गेली असून त्यांतील दा. ना. आपटे यांचे विसतृत असे त्रिखंडात्मक सयाजी-चरित्र ( १९३६ - ३७ ) विशेष लक्षणीय आहे.

या शंभर वर्षाच्या काळात ज्यांचे शौर्य लोकमानसाला हादरवून व भारावून टाकीत होते अशा सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही भरपूर लिहिले गेले. आहे. त्यांमध्ये वि. श्री. जोशी यांनी लिहिलेली वासुदेव बळवंत फडके ( १९४७, सुधारित आवृ. १९७४ ) आणि अनंतराव कान्हेरे, तात्या टोपे, विष्णु गणेश पिंगळे, खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदींची १९५१ पासून प्रसिद्ध झालेली आणि विशेष माहितीपूर्ण होत गेलेली चरित्रे क्रांतिकारकांची ओजस्वी वृत्ती प्रतीत करून देणारी आहेत.मृत्युंजयाचा आत्मयज्ञ ( १९५१, १९७२ ), कंठस्‍नान आणि बलिदान ( १९७३ ) या शीर्षकांवरूनही त्यातील आशयाची आणि शैलीची कल्पना येते. क्रांतिकारकांच्या झळझळीत जीवनक्रमात अनेकदा काही सामान्य-असामान्य व्यक्ती पडद्यामागे राहून मोठी कामे करीत असतात. द. न. गोखले यांचे क्रांतिवीर बाबाराव सावरकर ( १९४७ ) अशा उपेक्षित जीवनाची भावोत्कट ओळख करून देते. वा. कृ. परांजपे यांनी लिहिलेले काळकर्ते शिवरामपंत परांजपे-जीवन ( १९४५ ) कौटुंबिक माहितीबरोबरच परांजपे यांच्या तेजस्वी विचारसरणीची, तिच्यातील स्थित्यंतरांची पार्श्वभूमी चांगल्या प्रकारे टिपते. लोकमान्य टिळकांच्या आसपास असणाऱ्या, त्यांनी सांगितलेली महत्त्वाची कामगिरी निष्ठापूर्वक पार पाडणाऱ्या व्यक्तीही काही वैशिष्ट्यपूर्ण चरित्रांचा विषय झालेल्या आहेत. उदा., वासुकाका जोशी व त्यांचा काल ( त्र्यं. र. देवगिरीकर, १९४८ ), दादासाहेब खापर्डे ह्यांचे चरित्र ( बा. ग. खापर्डे, १९६२ ).

स्त्रीसुधारणा हा या कालखंडातील एक ज्वलंत विषय. ज्यांच्या प्रयत्‍नांनी तो अधिकच ज्वलंत झाला, त्या पंडिता रमाबाईचे महाराष्ट्राच्या तेजस्विनी असे वर्णन करणारे दे. ना. टिळककृत चरित्र ( १९६१ ) रमाबाईच्या कार्याच्या, व्यक्तिमत्त्वाच्या आणि माहितीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. रमाबाई रानड्यांचे उमाकांतकृत जीवन परिचयात्मक चरित्र ( १९२५ ) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना विशेष आत्मीयतेने देते. कमलाबाई देशपांडे यांच्यावर कोवळ्या वयातच वैधव्याची आपत्ती आली; परंतु मनोधैर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी जे सार्थ जीवन व्यतीत केले. त्याची ओळख विद्या बाळ यांच्या कमलाकी मध्ये होते. परंतु ऐतिहासिक काळातील स्त्री-चरित्रे वगळता स्त्रियांची चरित्रे मराठीत संख्येने अगदी थोडीच आढळतात. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेले, शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक हे ताराबाईचे कर्तृत्व व संघर्षमय जीवन ह्यांचा अविष्कार करणारे पद्मजा फाटककृत चरित्र हा एक सन्माननीय अपवाद आहे.

वरील सर्व काल आणि कर्तृत्व यांचे चित्रण करणारी, सामाजिक जीवनावर अधिक भर असणारी चरित्रे प्रसिद्ध होत होती. तेव्हाच ‘व्यक्ती आणि वाड्‌मय’ यांची ओळख करून देणारी महानुभाव पंथीय भास्करभट्ट बोरीकर यांच्यापासून तो रविकिरण मंडळाच्या माधव जूलियनांपर्यत अनेक कवी-लेखकांची चरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. या चरित्राचा प्रारंभीचा चरित्रात्मक भाग पुढील वाड्मय विवेचनाला पार्श्वभूमी निर्माण करून देत असल्याने त्यांचा समावेश अनेकदा समीक्षासाहित्यातही केला जात असतो. या प्रकारचे श्री. र. भिंगारकरलिखित श्री ज्ञानदेव चरित्र ( १८८६ ) ज्ञानेश्वरांचे चरित्र आणि काव्य यासंबंधीच्या चर्चाना प्रेरक ठरले. संतसाहित्याचे भक्त आणि अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी या पद्धतीने ज्ञानेश्वरांपासून मोरोपंतांपर्यत अनेकांवर रसाळपणे लिहून आम्‍ल सुशिक्षितांचे लक्ष जुन्या साहित्याकडे वेधून घेण्याचे मोठेच काम केले. परमार्थबुद्धी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचे शील घडत नाही आणि महात्म्यांच्या ग्रंथांत दोष संभवत नाहीत, अशी दृढ भूमिका असणारे पांगारकर, ज्ञानेश्वर ( १९१२ ), एकनाथ ( १९११), तुकाराम ( १९२० ), मोरोपंत ( १९०८ ) यांची व्यक्तिमत्वे त्यांच्या संतत्वाला महत्त्व देऊन उभी करतात.

त्यांमध्ये विशेष चांगले उमटले आहे ते मोरोपंतांचे व्यक्तिमत्त्व. सुशील, कुटुंबवत्सल मोरोपंत, तत्कालीन कोटुंबिक - धार्मिक संस्कृतीची उत्तम ओळख करून देतात. पांगारकरांच्या प्रमाणेच ज. र. आजगावकरांनी महाराष्ट्र कविचरित्रमालेचे आठ भाग प्रसिद्ध करून ( १९०७ – २७ ) ह्याच प्रकारे जुन्या काळातील लेखकांचा परिचय करून दिला आहे. सप्रमाण लेखनाच्या अभावासंबंधीच्या स्वत:वरील प्रतिकूल टोकेला उत्तर देताना प्राचीन कालच्या संदर्भात चरित्र लेखनाची बॉझ्‌वेलची पद्धती कागदपत्रांच्या उपलब्धीखेरीज अगदी फोल ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. गं. दे. खानोलकरांची अर्षा चीन मराठी वाडमयसेवक ही चरित्रमाला अर्वाचीन साहित्यिकांचा थोडक्यात परिचय होण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरली, १९७० साली प्रसिद्ध झालेले ल. ग. जोगांचे नामदेव-चरित्र-कार्यासंबंधीचे पुस्तक आजवरच्या नामदेवविषयक संशोधनाचा सविस्तर परामर्श घेते. ह्या प्रकारे आता मराठी एकेका विषयाबाबतचे पुनर्लेखन जसे होते आहे तसेच नव्याने संकलनही होते आहे. शं. दा. पेंडसे यांनी लिहिलेल्या ...संत एकनाथ ( १९७१ ), साक्षात्कारी संत तुकाराम ( १९७२ ), राजगुरू समर्थ रामदास ( १९७४ ) यांमधून हा प्रत्यय येतो. प्राचीन संतजीवन आणि साहित्य यांकडे ऐतिहासिक काळातील प्रेरणा आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले आहे ते न. र. फाटक यांनी.

ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यतच्या प्रमुख संतांवरील त्यांच्या चरित्रात्मक भाष्यांत त्यांनी मुसलमानी राजवटीच्या आणि संस्कृतीच्या हिंदुसमाजजीवनाशी व साहित्याशी झालेल्या संमीलनाची आणि आक्रमाणांची विविध रूपे लक्षात घेतली आहेत. फाटकांची भाष्ये भाविकांच्या व इतिहाससंशोधकांच्याही दृष्टीने वेळोवेळी वादाचा विषय झाली. प्राचीन संतांप्रमाणेच आधुनिक काळात होऊन गेलेल्या अनेक धर्मचिंतकांची, संतांची, महाराजांची वा सद्‌गुरूंची भक्तिरसपूर्ण चरित्रे ( गोदवलेकर, उपासनी, गुलाबराव, तुकडोजी, गाडगे महाराज इत्यादी ) आजही मोठ्या संख्येने मराठीत लिहिली-वाचली जात असतात. चरित्रातील उदात्तता, अद्‌भुतता यांमुळे ती श्रद्धापूर्वक वाचली जातात. रामकृष्ण परमहंस, शारदामाता आणि स्वामी विवेकानंदविषयक अनेक चरित्रांत प्रारंभी व्यक्तिजीवन थोडक्यात येते व भर राहतो तो विचारांच्या प्रकटीकरणावर. त्यांचे जीवनचिंतन हाच महत्त्वाचा आशय त्यांत असतो. स्वामी विवेकानंदांचे नऊ भागांतील भा. वि. फडके, रा. वा. बर्वे, रा. ना. मंडलिक यांनी लिहिलेले चरित्र ( १९१७ – २० ) हे या प्रकारच्या लेखनाचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल ). शं. गो. तुळपुळेकृत गुरूदेव रानडे यांचे चरित्र आजही ह्याच प्रकारे त्यांच्या गुरूदेवांचे पारमार्थिक जीवन भक्तिभावाने चित्रित करते व ते करताना गुरूदेव रानड्यांनी केलेल्या संतसाहित्याच्या चिंतनावर भर देते ( १९५८ ). पु. मं. लाडलिखित अपूर्ण राहिलेले वैशिष्ट्यपूर्ण तुकाराम-चरित्र ( १९५७ ) तुकारामांच्या साहित्याचा आधार घेत तुकारामांचे मानसिक जग सुंदर रीतीने उभे करीत जाते.

आधुनिक साहित्यिकांबद्दल मा. का. देशपांडे व वि. स. खांडेकर यांनीही लिहिले आहे. देशपांड्यांनी वि. स. खांडेकर ( १९४१ ), आचार्य प्र. के. अत्रे ( १९४१ ), न. चिं. केळकर ( १९४२ ) आणि ग. त्र्यं. माडखोलकर ( १९४८ ) आदींबद्दल, तर खांडेकरांनी राम गणेश गडकरी ( १९३२ ) आणि गोपाळ गणेश आगरकर ( १९३२ ) आदींबद्दल लिहिले. दोघांनीही दोन भिन्न प्रकारच्या आलंकारिक शैलीच्या आहारी जाऊन व्यक्तिजीवनाच्या वा साहित्याच्या फारसे खोल पाण्यात उतरण्याचे नाकारलेलेच आहे. ना. म. पटवर्धनलिखित वा. म. जोशी चरित्र ( १९४४ ) किंवा वि. ना. कोठीवालेकृत गडकरी जीवनचरित्र ( १९७० ) हे माहितीपर लेखनाचे आणखी एक प्रकारचे नमुने आहेत. सर्वसाधारणपणे विद्यापीठात वाङ्‌मयाभ्यास करणारा विद्यार्थी डोळ्यांपुढे ठेऊन लिहिलेली ही उपयुक्त चरित्रे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर साहजिकपणेच निर्माण होत आहेत. याहून अधिक आणि वेगळा आवाका ज्या साहित्यिकांच्या चरित्रांचा आहे,

ती काही पुढीलप्रमाणे आहेत : वेणूबाई पानसे किंवा नी. म. केळकर यांनी लिहिलेल्या हरि नारायण आपटे यांच्या चरित्रांत ( १९३१ , १९३३ ) एक गुणदोषयुक्त कलावंत व्यक्ती या दृष्टीने हरिभाऊंचे अंतरंग शोधण्याचा चांगला प्रयत्‍न आढळतो. द. न. गोखलेकृत ज्ञानकोशकर डॉ. केतकरांचे ( १९५९ ) व माधव जूलियनांचे चरित्र ( १९७८ ) ही त्या त्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिमा, पांडित्य, विक्षिप्तपणा, परिश्रम, पूर्वसंस्कार, मनोरचना असे सर्व घटक ध्यानात घेऊन जीवनातील सुसंगती-विसंगती हेरत दर्जेदारपणे लिहिलेली चरित्रे आहेत. नायक व्यक्तीची वाङ्‌मयनिर्मिती त्यांना कधी ती व्यक्ती समजून घेण्यास उपयोगी पडलेली आहे; परंतु वाङ्‌मयाची समीक्षा करण्यावर चरित्रात त्यांचा भर नाही. चरित्रवाचनात ती व्यक्ती भेटावी, अशी जी अपेक्षा असते ती या ठिकाणी पुष्कळ अंशाने पूर्ण होते. याउलट गं. दे. खानोलकरांनी लिहिलेली माधव जूलियन्‌( १९५१ ), रवीद्रनाथ टागोर ( १९६१ ), श्री. कृ. कोल्हटकर ( १९२७, सुधारित आवृ. १९७२ ) यांची प्रदीर्घ चरित्रे नायकव्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे वाड्‌मय आणि त्या वाङ्‌मयाची जाणकरांनी केलेली समीक्षा सर्वच एकत्रितपणे व विस्तार पूर्वक देतात.

या ठिकाणी चरित्राची कक्षा समीक्षेच्या इतिहासात शिरते. लेखक आणि एक ध्येयवादी कार्यकर्ते म्हणून परिचित असलेली साने गुरूजींची मातृधर्मी प्रतिमा पु. ल. देशपांडे ( १९७० ), राजा मंगळवेढेकर ( साने गुरूजींची जीवनगाथा, १९७५ ) यांच्या चरित्रांतून भावपूर्ण रीतीने साकार झालेली आहे. कृ. वा. मराठेलिखित बालकवींचे चरित्र ( १९६२ ) व्यक्तिजीवन आणि काव्य यांचा परस्परसंबंध परिश्रमपूर्वक जमविलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट करते. ह्याच पद्धतीचे, साहित्याच्या चरित्रपर मानसशास्त्रीय समीक्षेला साहाय्यभूत ठरेल असे, पण कुतूहल चाळवीत लिहिलेले श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर आणि हिराबाई पेडणेकर यांचे सहजीवन म. ल. वर्‍हाडपांडे यांच्या कोल्हाटकर आणि हिराबाईमध्ये आढळते ( १९६९ ). कवी काव्यविहारीकृत देवल व्यक्ति आणि वाङ्‌मय ( १९६३ ) आणि पु. रा. लेले, का. ह. खाडिलकरलिखित नाटककार खाडिलकरांची चरित्रे उभयतांचा साहित्यिक व्यक्ती म्हणून मर्यादित रीतीने केवळ परिचय करून देतात ( १९२२; १९४९ ). रवीद्रनाथ, टॉलस्टॉय यांच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक चरित्रांमध्ये बा. भ. बोरकरांचे आनंदयात्री ( १९६४ ) आणि सुमती देवस्थळे यांचे टॉलस्टॉय एक माणूस ( १९७४ ) वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाची आहेत. रवीद्रजीवनाचा अनेकांगी आलेख हे खानोलकरांचे, त्यांच्या संस्कारसाधनेतून काव्यात्मतेचा वेध हे बोरकरांचे, तर टॉलस्टॉयच्या व्यक्तिमत्त्वातील विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ता इ. पैलूंच्या मुळाशी असणारा माणूस नाट्यमय पद्धतीतून मूर्त करणे हे सुमती देवस्थळे ह्यांच्या लिखणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. यापूर्वी ( १९१९ ते १९२२ ) मध्ये प्र. श्री. भसे यांनी कौंट टॉलस्टॉय हे पंचखंडात्मक विस्तृत चरित्र लिहून वाचकांना टॉलस्टॉयची चांगली ओळख करून दिलेलीच होती.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांच्या क्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्कर आणि गो. ब. देवलांसारखे प्रतिष्ठित लोक नट-नाटककार-दिग्दर्शक म्हणून उतरले, तेव्हा नाट्यव्यवसायाकडे पाहण्याचा समाजाचा अवहेलनेचा दृष्टिकोण बदलून त्या क्षेत्रातील कलावंतांची चरित्रे गौरवपूर्वक लिहिली जाऊ लागली. शं. बा. मुजुमदारलिखित लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र ( १९०१ ) आणि ऩट-नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे चरित्र (१९०४ ) दोन्हीही –लेखकाचा स्वानुभव, संशोधनपूर्वक जमविलेली चरित्रात्मक माहिती आणि समकालीन नाट्यसमीक्षा जमेस धरून लिहिलेली असल्यामुळे विशेष जिवंत वठलेली आहेत. ह्यानंतरच्या साहित्यिक, खेळाडू, गायक, कारागीर इत्यादींच्या चरित्रांत अशा सर्व गोष्टी क्वचित एकत्र आल्या. बहुतेक चरित्रे म्हणजे आठवणी आणि आख्यायिकांचे रंजक संग्रह झाले. त्यामुळे देवल-कोल्हटकर-गडकऱ्यांसारखे लोकप्रिय नाटककार.

बालगंधर्व-दीनानाथ-गणपतराव जोशी यांच्यासारखी दैवते बनलेली नटमंडळी अद्यापही आपणास उत्तम पूर्णाकारी चरित्रांतून व्यक्तिमत्तांच्या वैशिष्ट्यांसह, मूर्त झालेली आढळत नाहीत. त्यातल्यात्यात व. शां. देसाई यांची कलावंतांच्या सहवासात ( १९३९ ), कलेचे कटाक्ष ( १९४५ ), बालगंधर्व : व्यक्ती आणि कला ( १९५९), मखमालीचा पडदा ( १९४७ , दुसरी आवृ. १९६२ ) ही आठवणीवजा पुस्तकेच लक्षणीय ठरतात. बालगंधर्व या व्यक्तीची आणि गंधर्व युगाचीही गृढरम्यता देसाई ह्यांच्या लिखाणात प्रतीत होते. नटसम्राट गद्यनाट्याचार्य गणपतराव जोशी यांचे चरित्र ( ल. ना. जोशी, १९२३ ) अभिनयसम्राटांची हकिगत सांगते, तर बाबुराव पेंटर व्यक्ती आणि कला ( ना. सी. फडके, १९५४ ) चित्रमहर्षीच्या जीवनाची फारच वरवरची ओळख करून देते. त्यामुळे असे म्हणता येईल, की कलावंतासंबंधीच्या लोकमानसातील कुतूहलाला यापुढील काळात थोडा समाधानकारक प्रतिसाद दिला तो चरित्रांपेक्षा त्यांच्या स्वत:च्या लेखनानेच, म्हणजे आत्मचरित्रांनीच.

चरित्रसाहित्याचे या प्रकारचे इतिहास डोळ्यांपुढे ठेवून ह्या साहित्याचे एक विमर्शक प्रा. अ. म. जोशी यांनी सारांशाने असे मत नोंदविलेले आहे, की गेल्या शंभर वर्षात विविधता आणि विपुलता बरीच आलेली असली, तरी अद्याप कलापूर्ण चरित्रे लिहिणाऱ्या लेखकांची परंपरा मराठीत निर्माण झालेली नसून चरित्रविषयक मूलभूत दृष्टिकोणातही फारसा फरक पडलेला नाही. कालमानानुसार मांडणीत आणि भाषाशैलीत आकर्षकता आलेली आहे; पण अद्यापही वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्याचा पाठपुरवठा न करता चरित्रनायकाच्या उघड किंवा छुप्या गुणसंकीर्तनातच आपण अडकलेले आहोत. चरित्रांच्या मानाने तुलनेने, आत्मचरित्रसाहित्य मात्र अधिक प्रगत झालेले आहे. प्रा. जोशींच्या या निष्कर्षाचा प्रत्यय गेल्या दीडशे वर्षातील आत्मचरित्रांच्या ओझरत्.या आढाव्यातूनही येतो.

प्राचीन काळात संत नामदेव, बहिणीबाई इत्यादींनी आत्मपर लेखन केलेल   असले, तरी विपुल संख्येने बराचसा पूर्णाकार प्राप्त झालेली आत्मचरित्रे लिहिली गेली आहेत ती अव्वल इंग्रजीच्या काळापासूनच. स्वत:ची माहिती देणे, एखाद्या प्रसंग रंगविणे, उद्बोधन घडविणे, स्वकैफियत मांडणे, आठवणी सांगणे अशा मर्यादित प्रेरणा आत्मपर लेखनाच्या मागे असल्याने आजही आत्मचरित्र हा साहित्यप्रकार पुरेसा विकसित झालेला दिसत नाही. वास्तविक पेशवाईच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या नाना फडणविसांच्या आत्मवृत्ता स्वत:च्या वासना-विकारांचा शोध घेत तारूण्यकाळापर्यतची जी हकिकत त्यांनी सांगितली आहे ( नानांचे आत्मचरित्र व्याख्याते – प्रो. चिं. ग. भानु; १९१० साली पुस्तकरूपाने; तत्पूर्वी काव्येतिहाससंग्रहात प्रकाशन झालेले ), ती आत्मचरित्र-साहित्याचा प्रारंभ या दृष्टीने एक योग्य दिशा होती; परंतु पुढील शंभर वर्षाच्या काळात आत्मचरित्रांतून आवश्यक असा व्यक्तिनिष्ठ भाग वाढला असला, तरी आत्मशोधनाची अत्यावश्यक भूमिका मात्र क्वचित राहिली, बहुतेक सर्वाचा भर राहिला तो स्वत:च्या व्यवसायातील किंवा काळातील महत्त्वाचे वाटलेले अनुभव बहिर्मुख वृत्तीने सांगण्यावर.

अव्वल इंग्रजीतील अनेक विद्वान रोजनिशी लिहीत, परंतु त्या आधारे स्वजीवनाचा शोध घेत केलेले लेखन आढळत नाही. १९५८ मध्ये अ. का. प्रियोळकरांनी प्रो. केरुनाना छत्रे यांची टिपणवही प्रसिद्ध केलेली आहे. या तुटपुंज्या लेखनाचेही सामाजिक इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपल्याला महत्त्व वाटत राहते. अव्वल इंग्रजीत सामाजिक परिस्थितीत झालेल्या मूलगामी बदलांमुळे दादोबा पांडुरंग तर्खडकर ( आत्मचरित्र व चरित्र संपा. अ. का. प्रियोळकर, १९४७ ), विष्णुबुवा ब्रह्मचारी ( वेदाक्त धर्मप्रकाश, १८५९ ), केशव शिवराम भवाळकर यांचे आत्मवृत्त ( संपा. भवानिशंकर पंडित, १९६१ ) यांना स्वत:चे कुटुंब, शिक्षण, धार्मिक-व्यावसायिक वातावरण यांची माहिती पुढील पिढीसाठी टिपून ठेवावी, असे जे वाटले, तीच त्यांची आत्मचरित्रे आहेत. १८५७ च्या बंडाचा रोमहर्षक अनुभव सांगताना माझा प्रवास ( प्रकाशन, १९०७ ) लिहिणाऱ्या वरसईकर गोडसे भटजींनी स्वत:ची कौटुंबिक परिस्थिती आणि वेळोवेळीची मन:स्थितीही जाता जाता व्यक्त केली म्हणून ती त्यांचे आत्मचरित्र म्हणता येईल.

याप्रकारे आत्मपरतेचा भाग लेखनात येऊ लागला असतानाच बाबा पदमनजींचे अरूणोदय हे पहिले पूर्णाकृती आत्मचरित्र ‘ईश्वराने प्राण्यांवर जी दया केली,’ ती सांगण्याच्या हेतूने लिहिले गेले ( १८८४ ). ख्रिस्ती धर्मस्वीकार केलेल्या बाबांना जो ‘प्रकाश’ आपल्याला दिसला तो इतरांनाही दिसावा अशी इच्छा असली, तरी केवळ प्रचारासाठी त्यांनी लेखन केलेले नाही. स्वप्रवृत्तीचा वेध घेत, स्वत:च्या आयुष्यातील स्थित्यंतर साध्या प्रांजळ भाषेत-क्वचित ख्रिस्ती वळणाने – त्यांनी मन:पूर्वक व्यक्त केले आहे. मात्र अरूणोदयानंतर साहित्यात आत्मचरित्रलेखनाची पद्धती पूर्णपणे रूजू लागली असे झाले नाही. आजही विविध जावनक्षेत्रांतील बऱ्याच व्यक्ती आपले काही काही अनुभव सांगण्यास पुढे सरसावत आहेत आणि मधूनच एखादे आत्मचरित्र या पदवीस साजेसे लिखाण वाचकांच्या हाती पडते आहे.

डोंगरीच्या तुरुंगात आमचे १०१ दिवस ( १८८२ ) मध्ये गोपाळ गणेश आगककरांनी त्यांच्या व लोकमान्य टिळकांच्या पहिल्या तुरूगवासाची हकिगत लिहून लोकनेत्यांसाठी एक चांगला पायंडा घातला. आत्मवृत्तामध्ये ( १९१५ ) महर्षी धों. के. कर्व्यानी महाराष्ट्रातील विधवाजीवन सुधारावे या हेतूने स्वत: जे शैक्षणिक – सामाजिक कार्य केले होते, त्याची हकिगत नोंदविली. लोकमतास अमान्य असणारा पुनर्विवाह केलेला असूनही लेखनात आपल्या व्यक्तिगत अनुभवांवर महर्षीना भर द्यावयाचा नाही. माझी घडण ( १९६१ ) मध्ये अ. वा. सहस्त्रबुद्धयांनी व माझी जीवनयात्रा ( १९५६ ) मध्ये अप्पा पटवर्धनांनी टिळक-गांधी युगात समाजोन्नतीचे जे प्रयत्‍न झाले, त्यांतील स्वत:चा वाटा ‘स्व’ला कमीतकमी महत्त्व देऊन सांगितला. विठ्ठल रामजी शिंदे, माधवराव बागल, पां. चि. पाटील यांच्या अनुक्रमे माझ्या आठवणी व अनुभव ( दोन भाग, १९४०; १९४४ ), जीवनप्रवाह ( १९५४ ), माझ्या आठवणी ( १९६४ ) .

यांमध्ये ब्राह्मणेतर समाजाचे सामाजिक जीवन प्राधान्याने महाराष्ट्रातील ब्राम्हण-ब्राह्मणेतर समाजांतील वादाच्या संदर्भात व्यक्त झाले. धर्मानंद कोसंबी आणि ग. य. चिटणीस ( निवेदन, १९२४ ; माझ्या आठवणी, १९५५ ) यांच्या लेखनात भर राहिला, तो स्वत:च्या धर्म व अध्यात्मविषयक विचारांतील परिवर्तन सांगण्यावर. कोसंबी केवळ ज्ञानसंपादन करिताना झालेल्या प्रवासाची हकिगत सांगतात, तर उत्कट ऊर्मीने विविध वळणे घेत गेलेल्या चिटणीसांच्या आयुष्यप्रवाहात कला, राजकारण, मजूरचळवळी यांच्या संदर्भातील मौलिक अनुभव व नाट्य मोकळेपणाने आणि विश्लेषणासह आलेले असल्याने ते आत्मचरित्र विशेष वाचनीय झालेले आहे. राजकीय क्षेत्रात कार्य केलेल्या गंगाधरराव देशपांडे ( माझी जीवनकथा, १९६० ), न. वि. गाडगीळ ( पथिक, १९६४ ), पुंडलीकजी कातगडे ( पुंडलीक, १९५० ) यांनी स्वत:च्या हकिगतींमध्ये काँग्रेसच्या संपूर्ण देशातील चळवळींचा संबंध गृहीत धरून राजकीय – सामाजिक इतिहासाला अधिक प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे ही आत्मचरित्रे व्यक्तींच्या इतकीच काँग्रेसच्या इतिहासाशीही निगडित आहेत. अनसूयाबाई आणि मी ( १९६२ ) या पुस्तकात पु. बा. काळे यांनी काँग्रेसचे कार्य करणाऱ्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी पत्‍नीची – अनसूयाभाईची – गुणावगुणयुक्त व्यक्तिरेखा आस्थापूर्वक मोकळेपणाने चितारलेली आहे. पतीने पत्‍नीला प्राधान्य देऊन लिहिलेले हे पुस्तक अपवादात्मक म्हणावे लागेल. रँ. र. पु. परांजपे यांचे नाबाद ( ८९ ( १९६५ ) हे आत्मचरित्र शिक्षणतज्ञ, विधिमंडळ सदस्य, मत्री, राजदूत इ. नात्यांनी त्यांनी केलेल्या कामगिरीची केवळ ओळख करून देते. त्यातून त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी वृत्तीचाही प्रत्यय येतो. निरेप घेता – ना. भि. परूळेकर ( १९७५ ), अशी ही बिकट वाट – वि. स. माडीवाले ( १९७२ ), स्मृतींची चाळता पाने ( मा. पं. शिखरे ) ही वृत्तपत्रव्यवसायातील मंडळींची आत्मचरित्रेही उलाढालीपूर्ण आयुष्यांचा आलेख विशेष गंभीरपणाने काढतात.

सामाजिक वास्तवापेक्षा व्यक्तिगत जीवनातील वास्तव, तसा संदर्भ आय़ुष्याला असूनही, ज्यात थोडे अधिक प्राधान्याने प्रगटले आहे, अशी पुढील काही वैशिष्ट्यपूर्ण चरित्रे आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये त्यांच्या अंदमानमधील बारा वर्षाच्या काळातील वास्तव्याची भीषण, शौर्यशाली, उदात्त गाथा मूर्त केली आहे ( १९२७ ). सावरकरी वृत्ती आणि शैली एकमेकींच्या हातात हात घालून जात असल्यामुळे साहित्यदृष्ट्याही हे पुस्तक अजोड ठरते. रियासतका र. गो. सरदेसाईकृत माझी संसारयात्रा ( १९५६ ) त्यांच्या इतिहाससंशोधनांत व्यतीत झालेल्या कार्यरत जीवनाची सविस्तर ओळख करून देते. समाजनिरीक्षक ना. गो. चापेकरांच्या जीवनकथेत ( १९४३ ) स्वत:च्या आयुष्याकडे सामाजिक जीवनातील एक नमुना म्हणून अलिप्तपणे पाहिल्याचे आढळते. के. सी. ठाकरे माझी जीवनगाथा ( १९७३ ) ह्या आपल्या आत्मचरित्रात स्वत:च्या पुरूषार्थी, आक्रमक जीवनदृष्टीचा शैलीबाज लेखणीद्वारे पुन:पुन्हा उच्चार करतात. संस्थानिक बाळासाहेब भवानराव पंतप्रनिधींनी दोन खंडांतील प्रांजळस्ववृत्तांतात ( आत्मचरित्र – २ खंड, १९४६ ) राजे लोकांचे भ्रष्ट जीवन लोकांपुढे ठेवून धोक्याच्या कंदील दाखविला आहे. त्याच राजकुलात जन्माला येऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरलेले अप्पासाहेब पंत एक प्रवास एक शोध ( १९७५ ) मध्ये स्वत:ची कर्तृत्वक्षेत्रे न्याहळत अत्याधुनिक जीवनाचा विचार करताना आढळतात. आत्यांतिक गरीबीतून वर येऊन समाजोपयुक्त सेवाभावी आयुष्य काढणारे डॉ. सुधीर फडके कोठे आणि कधीतरी ( १९७२ ) मध्ये स्वत:चे आणि तळागाळाच्या समाजजीवनातील अनुभव फार दृद्य पद्धतीने टिपतात.

सामान्य परिस्थितीतील शिक्षक-प्राध्यापकांच्या आत्मचरित्रांतून ध्येयवादी आयुष्याची समाधानी चित्रे वरचेवर आढळतात. भावी पिढीवर सुसंस्कार व्हावेत हाच त्यांचा निर्मितिहेतूही असतो.

  1. विरंगुळा – ना. म. पटवर्धन – १९६०
  2. चित्रपट- श्री. म. माटे – १९६०
  3. कृष्णाकांठची माती – कृ. पां. कुलकर्णी – १९६१
  4. वेचलेले क्षण – वा. गो. मायदेव – १९६५
  5. एका शिक्षकाची कथा – कृ. भा. बाबर – १९६२,
  6. समाधान – ना. वि. पाटणकर १९६२,
  7. माझी वाटचाल – के. ना. वाटवे – १९६४,
  8. एका पथिकाची जीवनयात्रा – मो. वा. जोशी – १९६४ ही त्यांपैकी काही

. याहून अगदी वेगळे असे कैदी नं. ३१४६७ ( १९७४ ) हे नारायण महाडिकांचे पुस्तक आहे. खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याचे कैदेतील आणि तुरूंगाबाहेरील अनुभवांचे विदारक चित्रण त्यात आहे. गांधीहत्या आणि मी ( १९६७ ) या पुस्तकात गोपाळ गोडशांनी गांधीहत्येनंतरच्या काळातील स्वत:च्या कुटुंबाच्या कष्टमय जीवनाची हकिगत ग्रथित करून आपल्या आणि समाजाच्या मानसिक प्रतिक्रियांवर प्रकाशझोत टाकला आहे. अशा प्रकारे आत्मचरित्रांची अनुभवकक्षा रूंद होणे, हे प्रगतीचे एक लक्षणच म्हणावे लागेल.

गेल्या पन्नास वर्षात वादग्रस्त आशय आणि गुणवत्ता या संदर्भात चर्चेचा मोठा विषय झाला, तो कलावंतांची गुणवत्ता या संदर्भात चर्चेला मोठा विषय झाला, तो कलावंतांची आणि राजकारणी मंडळींची आत्मचरित्रे. कलावंतांमध्ये साहित्यिकांची आत्मचरित्रे त्यांच्या सफाईदार लेखनशैलीमुळे जरी वाचली गेली असली, तरी अपेक्षेप्रमाणे दर्जेदार मात्र क्वचितच ठरलेली आहेत. बहुतेकांत ‘स्व’- शोधापेक्षा स्वप्रसिद्धीची, आत्मगौरवाची आणि समाजमनातील आपल्या प्रतिमेला धरून लिहिण्याची जाणीव तीव्रतेने आढळत असल्याने एक प्रकारचा तोचतोपणाही जाणवतो. याउलट क्‍लोरोफॉर्म ( १९७८ ) लिहिणारे डॉ. अरूण लिमये डॉक्टरी व्यवसायातील वेगळ्या अनुभवांची अत्यंत मनमोकळी नोंद उत्तम साहित्यिकाप्रमाणे प्रत्यकारी, जिवंत शैलीत करतात.

या सामान्य उणिवा वगळून काही वैशिष्ट्ये घेऊन आलेली साहित्यिकांची महत्त्वाची काही आत्मचरित्रे अशी आहेत : गतगोष्टी ( १९३९ ) मध्ये न. चिं. केळकरांचा हेतू ‘हिवाळ्यातील चंद्रप्रकाशाचा आस्वाद’ वाचकांना द्यावा असा असल्याने त्यात अनेक रम्य-उद्‌बोधक स्मृतीचे विपुल संकलन आढळते. ह. भ. प. पांगारकरांना चरित्र- चंद्र ( १९३८ ) लिहिताना एखाद्या मुमुक्षूस आपले चरित्र स्फूर्तिप्रद व्हावे असे वाटत असल्याने ते रसाळपणे भर देतात तो त्यांच्या आयुष्यातील धार्मिकतेवर. आत्मवृत्त ( १९३५ ) मध्ये श्री. कृ. कोल्हटकर स्वत:च्या नाट्य-विनोद-समीक्षादी लेखनामागील प्रेरणांची त्रोटक पण महत्त्वाची नोंद फक्त करतात. मी कसा झालो? (१९५३ ) या आगळ्या आत्मवृत्तात प्र. के. अत्रे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील शिक्षक, वक्ता, विडंबनकार आदी पैलूंचे प्रारंभापासूनचे रूप प्रसन्न विनोदी शैलीने सांगतात आणि कर्‍हेचे पाणी ( १९६३ – ६८ ) या पंचखंडात्मक प्रचंड लेखनात वरील मजकुराबरोबरच आणखीही व्यापक स्वरूपाच्या, व्यक्तीपेक्षा स्वकाळाशी संबंधित असलेल्या घटना, सविस्तर रीतीने स्वत:च्या खास शैलीत रंगवून ते लिहितात. दिवस असे होते..

. ( १९६१ ) मध्ये वि. द. घाटे यांनी आपल्या जवळच्या माणसांची नेटकी अशी व्यक्तिचरित्रे रेखाटली असून काव्यात्मतेच्या थोड्या आडपडद्याने स्वत:चे आंतरिक जीवनही हळुवारपणे प्रगट केले आहे. माझं जीवन एक कादंबरी ( १९६९ ) हे ना. सी. फडक्यांचे आत्मचरित्र त्यांच्या कादंबरीप्रमाणेच रंजक-आकर्षक असून आयुष्यातील खोलवरच्या समस्यांकडे फारसे लक्ष न देताच आत्मसंतुष्ट वृत्तीने लिहिलेले आहे. कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकरांच्या दोन तपे ( १९४६ ) आणि एका निर्वासिताची कहाणी ( १९४९ ) मधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीची आणि त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीची त्यांतील नाट्यमयतेसह कल्पना येते. आनंद साधल्यांची मातीची चूल ( १९७० ) ही आत्मकथा मध्यमवर्गीय संसारातील सत्य-स्वप्‍न-आभास यांचे गमतीदार मिश्रण प्रकट करते. काका कालेकर आणि ना. ग. गोरे यांनी अनुक्रमे स्मरणयात्रा व शंख आणि शिंपलेमध्ये (१९४९, १९५७ ) आपले बालपण फार संवेदनक्षमतेने टिपलेले असल्यामुळे ही पुस्तके विलक्षण आल्हाददायक झालेली आहेत.

य. गो. जोशींची दिधाची घागर ( १९५५ ) ही आत्मकथा नुकत्याच दिवंगत झालेल्या आईच्या आठवणी सांगताना स्वत:ला आदर्श वाटणाऱ्या मध्यमवर्गीय संस्कारांनाही हेतुपूर्वक प्रगट करते. सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतूत ( १९६९ ) त्यांच्या विविध विषयांच्या व्यासंगाची आणि जीवनातील चमत्कृतिपूर्ण अनुभवांची गोष्टीवेल्हाळ वृत्तीने सांगितलेली मिष्कील हकिगत वाचावयास मिळते. स्त्री – किर्लोस्कर मासिकांचे ध्येयवादी संपादक शं. वा. किर्लोस्कर यांचे शंवाकीय (१९७४) हे आत्मचरित्र त्यांच्या ‘उद्योग- उत्साह -आत्मोन्नती’ या सूत्रांवर आधारलेल्या संपादकीय कारकीर्दीची व प्रसन्न वृत्तीची उत्तम ओळख करून देते. कादंबरीकार गो. नी.दांडेकरांच्या कलंदर जीवनातील, लेखकाला अनुभवसमृद्ध करणाऱ्या भटकंतीची हकिगत, स्मरणगाथेत ( १९७३ ) वाचावयास मिळते, तर क्श्री. ना. पेंडसे स्वत:चा शोध त्रयस्थपणे घेण्यासाठी स्वत:च्या मित्राची भूमिका ...लेखक आणि माणूस ( १९७४ ) मध्ये घेतात. प्रथमपुरूषी एकवचनी ( २ भाग, १९८०, १९८३ ) या पु. भा. भावे यांच्या आत्मचरित्रात हिंदुत्वनिष्ठ राजकारण, वृत्तपत्रीय संघर्ष आणि साहित्यक्षेत्रातील वाद–वादंग यांच्या हकिगती व त्यासंबंधातील चिंतन वाचावयास मिळते.

साहित्येतर क्षेत्रातील कलावंत मंडळींमध्ये विशेषत: रंगभूमी आणि संगीतक्षेत्राशी कलावंत मंडळींमध्ये विशेषत: रंगभूमी आणि संगीतक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या मंडळींनी आत्मचरित्रे लिहिण्यात बरीच आघाडी मिळविलेली आहे. माझी भूमिका ( १९४० ) मध्ये गणेश गोविंद ऊर्फ गणपतराव बोडसांना स्वत:च्या अभिनयसाधनेबरोबरच नाटककंपन्यांतील कलह सांगून स्वसमर्थ करावयाचे आहे. गोविंदराव टेंब्यांना माझा संगीत- व्यासंग ( १९३९ ) आणि माझा जीवनविहार ( १९४८ ) मध्ये स्वत: शिकलेले – ऐकलेले संगीत, वाद्यसंगीत आपण घेतलेल्या रसास्वादाच्या अनुभवांसह वाचकाच्या प्रत्याला आणून देण्याची इच्छा मुख्यत’ आहे. बहुरूपी ( १९५७ ) लिहिणाऱ्या चिंतमाणराव कोल्हटकरांनी प्रारंभी आत्मपर माहितीचे ‘स्वगत’ भाषण केले असून पुढे वाचकांशी जे प्रकट संभाषण केले आहे, ते त्यांच्या काळातील प्रमुख नाटककारांविषयीच्या अनुभवांच्या संदर्भात. रंगभूमिविषयक माहिती, चिंतन आणि घडविलेली नेटकी भाषाशैली असल्याने बहुरूपीला पुष्कळच सन्मान मिळाले.

बाबुराव पेंढारकर ( चित्र आणि चरित्र, १९६१ ), नानासाहेब फाटक ( मुखवट्यांचे जग, १९६३ ), शं. नी. चापेकर ( स्मृतिधन, १९६६), गजानन जाहगिरदार ( संध्याकाळ, १९७१ ) ही चित्रपट- रंगभूमिविषयक स्मृतिसंग्रहांचे स्वरूप असलेली आत्मचरित्रे कलावंतांच्या जीवनाविषयी उत्सुकता असलेल्या वाचकांनी फार प्रेमाने वाचली असून साहित्यिकांच्या लेखनापेक्षा ती अधिक कलात्मकतेनेही लिहिली गेलेली आहेत. लोकनाट्यातून नट म्हणून गाजलेल्या व नाभिक समाजात जन्माला आलेल्या राम नगरकरांना रामनगरीमध्ये ( १९७५ ) स्वत: च्या कौटूंबिक व कलाक्षेत्रातील सर्वसामान्य अनुभवांकडे मागे वळून पाहताना जे हसू आले आहे, ते त्यांच्या वाचकांनाही आणून देण्यात त्यांना यश मिळाल्याने मध्यमवर्गीय जीवनापलीकडच्या आत्मचरित्राचा एक वेगळाच नमुना मराठीत उपलब्ध होऊ शकला आहे.

तथापि सर्वाधिक दर्जेदार ठरली आहेत ती स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे. रमबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यांतील काही आठवणी ( १९९० ) पासून ही परंपरा सुरू झाली. स्वत:च्या लोकोत्तर पतीचे जीवन भक्तिभावपूर्वक सांगावे ही त्यांची प्रेरणा पुढील अनेक स्त्रियांनाही अनुकरणीय वाटली. रमाबाईचे मोठेपण न्या. रानड्यांचे असामान्यत्व समजून घेऊन शब्दांतून उमटविण्यात जसे आहे, तसे घरगुती वळणाच्या मराठी भाषेचे अभिव्यक्तीचे सामर्थ्य उपयोजिण्यातही आहे. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ( ४ भाग, १९३४ – १९३६ ) रेव्ह. टिळकांचे ‘जसे घडले तसे चरित्र’ सांगावे या हेतूने निर्माण झाली. पण अल्पशिक्षित लक्ष्मीबाईनी कवा टिळकांचे मोठेपण आणि विक्षिप्तपण, आयुष्यातील गंभीर व हलकेफुलके नाट्यप्रसंग असे समर्थपणाने चितारले, की स्मृतिचित्रे हे पुस्तक मराठी  साहित्याचा एक मानदंड होऊन राहिले. आमची अकरा वर्षे ( १९४५ ) मध्ये लीलाबाई पटवर्धनांनी त्यांच्या आणि कवी माधवराव पटवर्धनांच्या सहजीवनाची चक्रावून टाकणारी सुखदु:खात्मक हकिगत विशेष प्रांजळपणाने सांगितल्याने हेही पुस्तक व्यक्तिमत्त्व उभे करण्याच्या संदर्भात मौलिक ठरले.

महर्षी कर्व्याच्या पत्‍नी बाया कर्वे यांनी माझे पुराण ( १९४४ ) या छोट्या आत्मकथेत आपले कोकणातील दुर्दैवी बालपण, क्लेशदायक रीतीरिवाज आणि पुनर्विवाहोत्तर उपयुक्त सामाजिक जीवन नि:संकोचपणे सांगताना घरगुती भाषेतल्या म्हणींचा फार सहजतेने उपयोग केला आहे. विशेष असे, की ही सर्वच आत्मचरित्रे लेखिकांच्या स्वत:च्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे वेगवेगळे पैलू फार ठळकपणे व्यक्त करणारीही झाली. पार्वतीबाई आठवलेकृत माझी कहाणी ( १९२८ ) ह्यांच्या हिंगण्याच्या बालिकाश्रमाच्या कामातील अनुभव टिपण्याच्या दृष्टीने, कमलाबाई देशपांडेकृत स्मरणसाखळू ( १९४३ ) संस्थात्मक जीवनातील कडूगोड प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने, राधाबाई आपट्यांचे उमटलेली पावले हे गांधीवादी चळवळीतील कौंटुंबिक वातावरणाच्या प्रत्यय घेण्यासाठी, सत्यभामाबाई सुखात्मे यांचे गेले ते दिवस ( १९६४ ) गरीब ब्राम्हण कुटुबांतील धार्मिक जीवन-संस्कारांची ओळख होण्याच्या दृष्टीने आणि यशोदाबाई जोशी यांचे आमचा जीवनप्रवास ( १९६५ ) सुसंस्कृत श्रीमंत ब्राम्हणी परिवाराची सांस्कृतिक पातळी परिचित होण्याच्या दृष्टीने फार प्रत्ययकारी झालेली आहेत.

लिखाणातील प्रांजलपणा हा या सर्वाचाच जो विशेष गुण, तो यांच्या आत्मचरित्रांना विलक्षण सच्चेपणाची जोड देतो. वाढत्या सिक्षणाबरोबरच स्त्रियांचे जीवन जसे बदलले तसे त्यांच्या आत्मचरित्रातील अमुभवही बदलत गेले. या, सदाशिव ( १९४८ ) मध्ये इंदिरा भागवंतांनी पतिविरहाची, तर दुर्दैवाशी दोन हात ( १९७५ ) मध्ये सरोजिनी सारंगपाणी यांनी पतीने केलेल्या फसवणुकीची हकिगत मनावरची दडपणे दूर सारीत लिहिली, स्‍नेहांकिता मध्ये ( १९७३ ) स्‍नेहप्रभा यांनी आणि अजुनी चालतेची वाट ( १९७० ) मध्ये आनंदीबाई विजापुऱ्यांनी आपल्या विवाहाची आणि विवाहबाह्य पुरूषमैत्रीतील सुखदु:खांची कथा धीटपणाने चित्रित केली. पण ऐकतं कोण? (१९७०) मध्ये उषाताई डांगे यांनी एक जिद्दी, करारी कार्यकर्ती म्हणून स्वत: लढविलेल्या मजूर लढ्याचे चित्रण केले. माणूस जेव्हा जागा होतो ( १९७० ) मध्ये गोदावरी परूळेकरांनी १९४२ ते १९५३ या काळात डहाणूजवळील वारली समाजाची अस्मिता जागृत होण्यासाठी जे संघर्ष उभे केले त्याची हकिगत सांगितली, असे स्फोटक आत्मलेखन प्रसिद्ध होत होते.

तेव्हा आनंदीबाई शिर्के यांचे सांजवात ( १९७२ ) साठ-सत्तर वर्षापूर्वीच्या मराठा समाजाचे दर्शन स्वत:च्या सोजवळ, खानदानी वृत्तीतून घडवून गेले. डॉ. केतकरांच्या पत्‍नी शीलवतीबाई केतकरांनी मीच हे सांगितलं पाहिजे ( १९६९ ) असे ठाम आत्मविश्वासपूर्वक म्हणत, डॉ. केतकरांच्या चरित्रकारांचा परामर्श घेत, स्वत:चे असामान्य सांसारिक जीवन खुले केले. सरोजिनी वैद्यांनी संपादित केलेल्या श्रीमती काशीबाई कानिटकर आत्मचरित्र पूर्णता देण्याचा एक नवा दृष्टिकोण आढळतो. शिक्षणाची आणि ललित लेखनाची गोडी लागलेल्या काशीबाईची आत्मकथा चे वातावरण, जे प्रश्न, जे व्यक्तिमत्त्व व नातेसंबंध आपल्यापुढे ठेवते, तेच ‘उत्तरायणा’त कोणकोणती रूपे घेऊन गेले हे त्यांच्या जीवनानुभवाला पूर्णता देण्याचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून संपादिकेने ललित पद्धतीने मांडलेले आहे.

गेल्या दहापंधरा वर्षात कलावंत स्त्रियांनी आपले घराबाहेरील विश्व, त्यातील समाधान आणि आपत्ती यांच्यासह, पुष्कळशा खुलेपणाने सांगितलेले आढळते. हंसा वाडकर यांचे सांगत्ये ऐका ( ९१७० ) हे या प्रकारचे सर्वात अधिक गाजलेले पुस्तक. पुढे चंदेरी दुनियेत ( १९८१ ) या लीला चिटणीसांच्या पुस्तकाने आमि मी दुर्गा – खोटे ( १९८२ ) या दुर्गा खोटे यांच्या पुस्तकाने भारतीय चित्रपटसृष्टीचीही ओळख आपल्या व्यक्तिगत जीवनातून करून दिलेली आहे. या प्रकारे स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून गुणवत्तेबरोबर विविधातही आढळू लागलेली आहे.मराठी आत्मचरित्रांचा एकत्रित परामर्श घेताना प्रा. रमेसचंद्र पाटकर यांनी त्यांच्या अप्रकाशित प्रबंधात या साहित्यप्रकाराच्या बाह्यकक्षा विस्तृत झाल्याबद्दल आनंद प्रगट करून स्वत:चे निरीक्षण असे नोंदविलेले आहे. की लेखकांचे सत्याचा शोध घेण्याचे सामर्थ्य वाढलेले असले, तरी एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणूनम आत्मचरित्रांचे अस्तित्व अद्यापही पुरेसे प्रस्थापित होऊ शकलेले नाही.

गेल्या काही वर्षात म्हणजे १९६० -६५ पासून दलितांच्या आत्मकथांनी प्रा. पाटकर म्हणतात, ती बाह्यकथा अधिकच विस्तृत केली आहे. मध्यमवर्गीय जीवनातील अनुभवविश्व इंग्रजी अमदानीतील शिक्षणप्रसारामुळे साहित्यात जोवढ्या सहजतेने प्रगट होत आले तेवढ्या सहजतेनेच डॉ. आंबडकरांनी उभ्या केलेल्या दलित चळवळीतून दलित साहित्यही जन्माला आलेले आहे. हे दलित साहित्य प्राधान्याने आत्मपर अनुभवांशीच बांधलेले असून कधी –कादंबरीच्या रूपाने तर कधी सरळ आत्मचरित्राच्या रूपानेच अधिक सकसपणे प्रगटलेले आहे. अशी अलीकडच्या काळात गाजलेली आत्मचरित्रे म्हणून पुढील पुस्तकांचा उल्लेख करता येईल.

  1. बलुतं – द्‍या पवार ( १९७८ )
  2. आठवणींचे पक्षी – प्र. ई. सोनकांबळे ( १९७९ ),
  3. मुक्‍काम पोस्ट, देवाचे गोठणे – माधव कोंडविलकर ( १९७९ ),
  4. तराळ – अंतराळ – शंकरराव खरात ( १९८१ ).

या आत्मकथा एकेका व्यक्तीइतकेच त्या त्या समाजाचे जीवनही कधी निर्लेप मनाने, तर कधी विद्रोहाच्या, अन्यायाच्या भावनेने पेटून प्रगट करतात. त्यांची भाषाही अनेकदा ज्या वर्गाचे, जातीचे जीवन आत्मकथेत येते त्या जातीचीच बोलीभाषा असते. ज्या समर्थपणाने वाड्‌मयीन आविष्काराचे माध्यम म्हणून ती उपयोजिली जाते आहे, तिने समग्र मराठी साहित्यातील अभिव्यक्तीलाही भरघोसपण येण्यास साह्य केले आहे. मराठी आत्मकथेची श्रीमंती यांच्यामुळे पुष्कळच वाढलेली आहे.

लेखिका: सरोजिनी वैद्य

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate