भारतीय लोकसाहित्याला प्राचीन व समृद्ध अशी वैविध्यपूर्ण परंपरा आहे. या लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङ्मयात आढळतात. व्यक्तीच्या जन्मापासून अंत्यविधीपर्यंत जे प्रमुख धर्मविधी व संस्कार आहेत, त्या प्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्व भाषांमध्ये आहेत. मृत्युप्रसंगी म्हणवयाची सूक्ते ऋग्वेदात आहेत. तशीच काही आदिवासी जमातींतही अंत्यविधि-गीते आहेत. गुप्तपूर्व काळातील काही भारतीय लोकगीते चिनी भाषांतराच्या रुपाने जतन करून ठेवली आहेत. ए. एल्. बाशम यांच्या द वंडर दॅट वॉज इंडिया मध्ये असे काही निर्देश आढळतात. रामायण, महाभारत, पुराणे यांतील कथांचे प्रादेशिक, स्थानिक वैशिष्ट्यांसह रुपभेदात्मक आविष्कार सर्वच भाषांत आढळतात. भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशांतल्या लोकवाङ्मयात साधारण तीन प्रकारचे मूलबंधात्मक विषय पुनरावृत्त झालेले दिसून येतात :
भारतातल्या प्रमुख भाषांमधल्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात व्यक्तिजीवनातल्या विविध टप्प्यांवरच्या विधी-संस्कारप्रसंगांची गीते, श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी रंजनपर गीते, सण-उत्सवांशी निगडित विधिगीते व ऋतुगीते हे प्रकार विविध व विपुल प्रमाणात आढळतात, त्याचप्रमाणे लोककथांचे अनेकविध प्रकार आढळतात, तसेच सामाजिक संदर्भ असलेली लोकनाट्ये आढळतात. जनसामान्यांची कल्पकता व चातुर्य ज्यांतून व्यक्त होते अशा म्हणी, उखाणे, कूटप्रश्न हाही लोकसाहित्याचाच एक आविष्कार आहे.
आसामी भाषेतील बिहू गीते ही इतर प्रांतांतल्या नववर्षाच्या आगमनानिमित्त गायिल्या जाणाऱ्या गीतांशी साधर्म्य दर्शवितात. बंगाली तुसू गीते, हिंदी फाग (फाल्गुम) गीते, पंजाबी तिजा गीते, तमीळ तिरुविळअपात्तु ही वेगवेगळ्या प्रांतांतील प्रमुख सण-उत्सवपर गीते होत. धर्मविधीचा एक भाग म्हणून गायिली जाणारी लोकगीते हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे व त्यात प्रत्येक प्रदेशातल्या वैशिष्ट्यपू्र्ण लोकसंस्कृतीनुसार वेगळेपणा व वैविध्य आढळते. भारताच्या अनेक प्रदेशांत प्रचलित असलेल्या लोकधर्मामध्ये कालीपूजेला विशेष महत्त्व आहे. केरळ, बंगाल आणि आसाम राज्यांत हे विशेषेकरून आढळले.
काली ही वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी लोकदेवता आहे. आई किंवा सितली (आसाम), अम्मन किंवा मरीअम्मन (केरळ व तमिळनाडू), महाराष्ट्रात आई, अंबाबाई, गौरी इत्यादी. ‘देवी’ ही एक साथीच्या रोगाशी संबंधित देवता आहे व ह्या रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधिगीते गायिली जातात. वेगवेगळ्या ऋतुमानांतील नैसर्गिक बदलांमुळे लोकमानसात जी परिवर्तने घडून येतात, त्यांची भावपूर्ण वर्णने करणारी ऋतुगीते सर्वत्र आहेत. पेरणी, कापणी अशा कृषिकर्मांच्या वेळी जो आनंद व उल्हास शेतकरीवर्गात असतो, तोच लोकगीतांचे रुप घेऊन प्रकट होतो. अशी कृषिगीते भारतातल्या सर्व भाषांत आढळतात. श्रमिक लोक काम करताना श्रम हलके व्हावेत म्हणून गाणी गातात. प्रत्येक प्रदेशात ती वैशिष्ट्यपूर्ण असतात व त्यांत विविधताही मोठ्या प्रमाणात आढळते. बंगालमध्ये मैसाल, तमिळमध्ये तोळिलपा्टटू, सिंधीमध्ये हमरको आणि वलारो यांचे उदाहरणादाखल उल्लेख करता येतील.
जनसमुदायाच्या मनोरंजनार्थ काही लोकगीते व लोकनाट्ये रचली व सादर केली जातात. मलयाळम् कईकोट्टिकळ्ळी, आसामी गरखिया गीत, तमिळ कोलाट्टम्, ओडिया चिताकुटा गीत ही काही लक्षणीय उदाहरणे होत. नद्या, तलाव, समुद्र यांच्या सान्निध्यातील प्रदेशांत नौकागीते व कोळीगीते विपुल प्रमाणात आढळतात. आसामी नावखेलर गीत, मलयाळम् वंचिपाटटू, गुजराती अबवाणी वा भामणी हे उल्लेखनीय प्रकार होत. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत लग्नगीतेही विपुल व विविध प्रकारची आढळतात. ती विवाहाच्या वेगवेगळ्या विधींच्या प्रसंगी गायिली जातात. कित्येक गाणी केवळ मनोरंजनार्थ असतात.
प्रत्येक भाषेत अशा लग्नगीतांची उदाहरणे आहेत. मलयाळम्मध्ये वातील तुर अप्पाट्टू, काश्मीरीमध्ये वनवुन, उर्दूमध्ये जलवा गीते, तेलुगूमध्ये विट्याळ वारी पाटलु, तमिळमध्ये कल्याण-अप्पाट्टू यांचे उदाहरणादाखल निर्देश करता येतील. आसामीमध्ये लग्नगीतांच्या ह्या वर्गाला ‘विया-नाम’ अशी संज्ञा आहे. काही ठिकाणी लुटुपुटूची बेडकांची लग्ने लावून त्यांची लग्नगीतेही गायिली जातात. त्यामुळे पाऊस पडतो, अशी लोकश्रद्धा आहे. इतिहास-पुराणांत शौर्य गाजवणाऱ्या वीरपुरुषांच्या गाथा व पोवाडे सर्व भाषांत आढळतात. थंडीच्या दिवसांत शोकोटी पेटवून त्याभोवती समूहाने जमून गप्पागोष्टी करणे, गाणी म्हणणे ही प्रथा खेडोपाडी आढळते. अशा वेळी जी कथा सांगितली जाते, ती बहुधा गीतात्मक असते. काश्मीरी लोकगीतांमध्ये हा प्रकार विशेषत: आढळतो. धार्मिक आशयाच्या बंगाली बाऊल गीतांमध्ये व काश्मीरी वातसुन गीतांमध्ये सांगीतिक गुणवत्ता विशेष आढळते. लोकगीतांमधल्या लयतालाचा प्रभाव लिखित स्वरुपाच्या नागरकाव्यामध्ये पडलेला दिसून येतो.
भारतातील लोककथांचा वारसाही खूप समृद्ध आहे. भारतीय लोककथांच्या आधारेच गुणाड्याची यृहत्कथा (बड्डकहा),बोद्ध जातककथा, जैन धम्मकहा, सोमदेवाचा कथासारित्सागर, दंडीचे दशकुमारचरित, विष्णुशर्म्याचे पंचतंत्र व हितोपदेश इ. कथा-संकलने तयार झाली. शिवाय रामायण, महाभारत, पुराणे यांतही मौखिक परंपरेतून आलेल्या अनेकविध लोककथा अंतर्भूत आहेत. भारतातल्या आदिवासी जमातींतही वैशिष्ट्यपूर्ण लोककथा विपुल प्रमाणात आहेत. लोककथांना सांस्कृतिक महत्त्व असते. या कथा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात व सर्वदूर प्रसृत होतात. ‘लोककथा’ या व्यापक संज्ञेखाली लहान मुलांच्या परीकथा, अद्भुतरम्य कथा, बोधकथा, प्राणिकथा, मिथ्यकथा, आख्यायिका, धार्मिक कहाण्या व व्रतकथा आदींचा समावेश होतो. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांतल्या लोकसाहित्यात ह्या सर्व प्रकारच्या कथा विपुल प्रमाणात आढळतात. प्रत्येक भाषेच्या लोकसाहित्यात सृष्टीच्या निर्मितीविषयीच्या मिथ्यकथा, तसेच प्राणी, वृक्ष, वेली, देवदेवता यांविषयीच्या मिथ्यकथाही मोठ्या प्रमाणात आढळतात. आख्यायिकांचे प्रमाणही विपुल आहे. बंगालमधील अकराव्या शतकातील राजपुत्र गोपीचंत्राची आख्यायिका प्रसिद्ध आहे. गोरखनाथ व मच्छिंद्रनाथ यांच्या आख्यायिका तर भारताच्या उत्तर प्रदेशाच्या सीमा ओलांडून नेपाळ व तिबेट येथेही पसरल्या आहेत.
व्रतकथा हा प्रकार भारतात खेडोपाडी सर्वत्र रुढ आहे. मूळ संस्कृत व्रतकथांवर या लोककथा आधारित असतात. उदा., सत्यनारायण व्रतकथा. व्रतकथा या देवदेवतांच्या उपासन, सणउत्सवांची व्रतवैकल्ये यांच्याशी संबंधित असतात. ह्या व्रतकथा ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये विशेषेकरून प्रचलित आहेत. कुमारिका, नववधू व विवाहित स्त्रिया यांच्यासाठी निरनिराळी व्रतवैकल्ये व त्या व्रतांच्या पारंपारिक कथा आहेत. ह्या व्रतकथा जरी गद्यात असल्या तरी त्यांत अधूनमधून मंत्रश्लोकांची पद्यमय पारखण असते. त्यांचे पठण पारंपारिक पद्धतीने सूत्रबद्ध रीत्या केले जाते. कित्येकदा एका कथेत दुसरी उपकथा गुंफलेली असते व अशा रीतीने त्यांची साखळीच तयार होते. ह्या व्रतकथांतून नैतिक मूल्ये व शाश्वत सत्ये यांचे दर्शन घडते व त्यामुळे त्यांना सांस्कृतिक आशय लाभलेला असतो. सत्यनारायण कथा, व्रतकथा, शिवरात्री व्रतकथा अशा काही प्रकारांत त्या व्रताची महती वर्णिलेली असते. त्यात उपवास, नैतिक शुद्ध आचरण यांवर भर असतो. मैथिलीमध्ये वटसावित्री व्रताच्या दिवशी वारीसती कथापठणाचा प्रघात आहे. व्रत केल्याने पुण्यप्राप्ती होते, पापाचा विनाश होतो.
दुष्टांचा संहार होतो. इष्ट मनोकामनांची प्राप्ती होते असे तात्पर्य सांगणाऱ्या कथा आहेत, तर व्रताचे पालन न झाल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, असा इशाराही दिलेला असतो, उदा., नागपंचमीची व्रतकथा; जीतीय (जीमूतवाहन) व्रतकथा इत्यादी . पुराणे व उपनिषदे यांतूनही काही व्रतकथा उगम पावल्या आहेत. मैथिलीमध्ये ‘मधुश्रावणी व्रतकथा’ नावाची कथांची मालिका आहे. नवविवाहितेने मधुश्रवणी व्रताच्या पहिल्या पंधरा दिवसांत ह्या पंधरा कथांचे पठण करावयाचे असते. कार्तिक मासात व्रतकथेचे पठण कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी नांदावी म्हमून केले जाते. ह्या व्रतकथा म्हणजे एका परीने नीतिवादी बोधकथाच असतात. लोकांच्या इच्छाकांक्षांचे मूर्त रुपही या कथांत प्रतिबिंबित झालेले असते. कुमारिकांना चांगला पती मिळावा, पतिपत्नींना विवाहसौख्य लाभावे, चांगली संतती निर्माण व्हावी, सुखीसमाधानी दीर्घ कौटुंबिक जीवन लाभावे, अशा मनोकामना ह्या व्रतकथांतून व्यक्त झालेल्या दिसून येतात. कार्तिक महिन्यात हरिसन व्रतकथांचे पठण केले जाते. काही व्रतकथा काव्यात्म सौंदर्याने, वाङ्मयीन गुणांनी युक्त असतात. उदा., सपत-विपत (संपत्ती-विपत्ती) व्रतकथा ही नलदमयंतीच्या आख्यानावर आधारलेली असूनती चैत्र मासात पठण केली जाते. दुसाध या दलित जमातीच्या साल्हेआ देवतेची व्रतकथाही अशाच स्वरुपाची आहे.
भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पारंपारिक कथाकथकांच्या व्यावसायिक जमाती आहेत. कथा सांगून जनसमुदायाचे मनोरंजन करीत गावोगाव भटकणे हा त्यांचा परांपरागत व्यवसायच आहे. पण आधुनिक जीवनसरणीमध्ये मनोरंजनाची आधुनिक तंत्रसाधने उपलब्ध झाल्याने आश्रयदात्यांच्या अभावी हा व्यवसाय नामशेष होत चालला आहे.
म्हणी व वाक्प्रचार, तसेच कोडी व उखाणे हा भारतीय लोकवाङ्मयाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणींमधून जनमानसाचे चातुर्य व शहाणपण मोजक्या सूत्रबद्ध वा काव्यमय पंक्तींतून व्यक्त होते. लोक आपल्या नेहमीच्या बोलण्यात सहजपणे म्हणी व वाक्प्रचार वापरतात. त्यांत जनजीवनातील सार्वत्रिक अनुभवांचे सारसत्त्व आळून आलेले असते. त्यांत मोजक्या शब्दांत मार्मिक सत्ये प्रकट केलेली असतात. असे अनुभव समान संस्कृतीच्या पातळीवर अनेक लोकांना आलेले असल्यामुळे जगभर निरनिराळ्या लोकसमूहांत एकाच अर्थाच्या म्हणी सापडू शकतात. भारतातही प्रांतोप्रांतींच्या समान म्हणींचा एकत्रित विचार केल्यास काही सामान्य अनुमाने काढता येतात.
बऱ्याचशा म्हणी हवामानावर आधारलेल्या असतात. पावसाची नक्षत्रे व त्यावर आधारलेला शेतकऱ्याचा सामान्य अनुभव हा सर्वत्र समान असल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या म्हणींमध्येही सारखेपणा आढळतो. उदा., उत्तरा नक्षत्राविषयी निरनिराळ्या प्रदेशांत निर्माण झालेल्या पुढील म्हणींत साधर्म्य आढळते: (१) वरस लगे ऊतरा, अन्न व खावै कूतरा (उ.प्र.), (२) जो वरसे ओत्रा, तो धान नही खाय कुत्रा (गुजरात), (३) पडतील उत्तरा, तर अन्न न खाय कुत्रा. ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ या म्हणीचा उगम ‘न ह्येकेन हस्तेन तालिका सम्पद्यते’ या चाणक्याच्या उक्तीत असून ही म्हण बहुतेक भारतीय भाषांत आढळते. ‘सुनेच्या हातून भांडे फुटले तर ते सोन्याचे; सासूच्या हातून फुटले तर मातीचे’ या म्हणीचे पर्याय कानडी, गुजराती, तेलुगू व हिंदी या भाषांत सापडतात. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीचा गुजराती पर्याय असा -‘उपाडी जीभने लगाडी तालवे’. अशा रीतीने समान समाजसंस्कृतीतील म्हणींचे वेगवेगळ्या भिन्नभिन्न भाषिक प्रदेशांत समानार्थी प्रचलन आढळते.
भारतात लोकोक्ती वाङ्मय फार प्राचीन असून ते आशयाने परिपूर्ण व साहित्यगुणांनी नटलेले आहे. त्यात भारतीय प्रज्ञेचे प्रगल्भ रुपदिसते. ‘सूक्तिवाङ्मयाने वा सुभाषितांनी भारताने अद्वितीय आदर्श निर्माण करून जागतिक वाङ्मयाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे’,असे विंटरनिट्झ यांचे मत दुर्गा भागवतांनी नोंदवून ठेवले आहे. ऋग्वेदातही वाक्यप्रचारांचा वा सूक्तींचा आढळ होतो. ‘चक्षुर्वैसत्यम्’ हा वाक्प्रचार बृहदारण्यकात आला आहे व तो भारतात सर्वत्र रुढ आहे. रामायण, महाभारत या ग्रंथांतही अनेक लोकोक्ती-सूक्ते व सुभाषिते-आढळतात. ‘तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले’ - हा वाक्प्रचार कथासरित्सागरातल्या एका कथेवरून आला आहे. कोडी वा कूटप्रश्न आणि उखाणे यांना पारंपारिक भारतीय समाजजीवनात विधिविधानात्मक मोलही आहे.
विवाहप्रसंगी वधू-वरपक्ष एकमेकांना कोडी व उखाणे घालतात. छोटा नागपूरमधील ओराओं जमात, बाउरीसारख्या अनुसूचित जमाती व बंगालमधील हिंदू यांच्यात अजूनही ही प्रथा आहे. ह्याखेरीज मृत्युविषयक कूटप्रश्नही आहेत. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागांतही त्यांचे प्रचलन आहे. गूढ व आध्यात्मिक कूटप्रश्नांचा उगम प्राचीन वैदक वाङ्मयात आढळतो. मब्ययुगीन भारतीय वाङ्मयातही गूढ व आध्यात्मिक कूटप्रश्न आढळतात. धर्मामधल्या गूढ कल्पनांची अभिव्यक्ती ही कित्येकदा कूटप्रश्नांद्वारा केली जाते. त्यामुळे त्या विचारातली गूढात्म अनुभूती जतन केली जाते. महाभारतात यक्षाने धर्मराजाला अनेक अवघड कूटप्रश्न विचारले व धर्माने त्यांची समर्पक उत्तरे दिली, असा उल्लेख आहे. महायान बौद्ध संप्रदायातील कूटप्रश्न, तसेच बंगालमधील प्राचीन व मध्ययुगीन काळातील नाथ संप्रदायाचे कूटप्रश्न हे रुपकात्मक भाषेत धर्मत्तत्वांचा प्रसार करण्यासाठी रचले गेले.
भारतीय लोकसाहित्यात पारंपारिक समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. स्त्रियांची विविध रुपे त्यातून आविष्कृत झालेली दिसून येतात. नववधू, सासू, सून, आई, बहीण, नणंद, भावजय, जाऊ अशी स्त्रीची विविध रुपे पारंपरिक लोकसाहित्यात आढळतात. सासूसून, नणंद-भावजय ही नाती सामान्यत: विरोधात्मक असतात. आई, बहीण यांचे चित्रण उदात्त व प्रेमळ असे असते. लोकसाहित्यात इतिहासाचे कणही विखुरलेले असतात. ‘पन्हाळ दुर्गी राजा भोज’ अशी एका मराठी लोककथेची सुरुवात आहे. मोगल सत्तेच्या जुलमी व अन्यायी राजवटीचे चित्रणही काही लोकगीतांतून आढळते. उदा., मोगलांच्या हिंदू स्त्रियांवरील अत्याचारांचे चित्रण कुसुमावतीच्या एका गीतात आढळते. राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल इ. प्रदेशांतील अनेक वीरगाथा ऐतिहासिक सामग्री उपलब्ध करून देतात. मराठी ओवीवाङ्मयात इंग्रजी सत्तेखालील राज्यातल्या विपरीत परिस्थीतीची प्रभावी चित्रणे आढळतात.
भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांतल्या भौगोलिक स्थितीची निदर्शक अशी भूवर्णनेही लोकवाङ्मयात येतात. गंगा, यमुना, शरयू, शोण इ. नद्या; काशी, प्रयाग, अयोध्या, जनकपूर इ. स्थळे ह्यांचे निर्देश आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशांतील पारंपारिक पोषाख व वेशभूषा यांचेही दर्शन त्या त्या भाषांतल्या लोकवाङ्मयात घडते. रंगांचे वैविध्य व वैचित्र्य आढळून येते. उदा., भोजपुरी लोकगीतांमध्ये लाल व कुसुंबी हे रंग विशेषत्वाने येतात. पंजाबी स्त्रीला आसमानी रंगाचा घागरा विशेष आवडतो, असे लोकगीतांतल्या वर्णनांवरून जाणवते. लोकसाहित्यातील वृक्ष, वेली, फळे, फुले यांचे निर्देश भारतीय प्रकृती-संस्कृतीला साजेसे, अनुरुप असतात. आंबा, डाळिंब, महुआ, लिंब हे वृक्ष लोकजीवनाचे सहचर होत. लोकसाहित्यात जनमानसाच्या धार्मिक भावनाही प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. गंगा व तुळस या भारतीय स्त्रीच्या आदर्श देवता होत. त्यांचे उल्लेख सर्वत्र आढळतात. मराठी लोकसाहित्यात पंढरपूर व विठोबा यांविषयीची श्रद्धा प्रकर्षाने प्रकटलेली दिसून येते.लोकसाहित्यातून सामान्यत: नैतिकता, श्रद्धा, सदाचरण आणि जनकल्याणाची, विश्वमंगलाची कामना यांचे चित्रण आढळते.
भारतातील वेगवेगळ्या भाषांमधल्या लोकसाहित्यात काही भिन्नत्वदर्शक वैशिष्ट्येही आढळतात. उदा., सर्व भारतीय भाषांमधल्या लोकसाहित्यात प्रेम हा समान विषय आहे. फक्त मराठीतच त्याचा काहीसा अपवाद आढळतो. हे वैशिष्ट्य दुर्गा भागवतांनी निदर्शनास आणून दिले आहे. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी यांसारख्या इंडो-आर्यन भाषांमध्ये राधा-कृष्ण हा विषय प्रकर्षाने आढळतो; पण दक्षिण भारतीय भाषांमधल्या लोकसाहित्यात त्याचे फारसे प्रचलन नाही. केरळमध्ये ख्रिस्ती व ज्यू उगमापासून निर्माण झालेले लोकसाहित्य विपुल आढळते; इतर प्रांतांत मात्र ते फारसे आढळत नाही. मुस्लिम प्रभाव बंगाली, मलयाळम् व उर्दू लोकसाहित्यात आढळतो.
संदर्भ : 1. Danieis, C. L.; Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.
2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.
3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd Legend, New York, 1949.
4. Reaver, J. Russell; Boswell, George W. The Fundamentals of Folk Literature, London, 1962.
5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington, 1955-58.
६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.
७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.
८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.
९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.
१०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.
११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.
१२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०.
१३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.
१४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.
१५. परांजपे, तारा, आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.
१६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.
१७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.
१८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.
१९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.
२०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.
२१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.
२२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.
२३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९.
२४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.
२५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्गम आणि विकास, नागपूर, १९८७.
लेखक : श्री. दे. इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/15/2023
औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी येथील भारत पठाडे यांनी ...
भारतात जन्माला आलेला एक खेळ.
या विभागात कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे विवध वि...
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत...