सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम त्या करतात. या संघटना स्वायत्त असून त्यांची स्वनिर्मित घटना व आचारसंहिता असते. या नियमावलीत त्या वावरत असतात. त्यांची नोंदणी ‘ इंडियन सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅट ’, १८६०; मुंबई सार्वजनिक न्याय अधिनियम, १९५० च्या कायद्याने होणे आवश्यक असते. यांचा राज्यसंस्थेशी दूरान्वयाने संबंध येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षण, सूतकताई संघ इत्यादी काही संस्था प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीशी निगडित होत्या आणि त्यांचे उद्दिष्ट देशाचे संपूर्ण स्वातंत्र्य हे होते; तथापि स्वातंत्र्योत्तर काळात भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार, पर्यावरण, प्रदूषण, शेतकर्यांच्या आत्महत्या, अनुसूचित जमातींचे प्रश्न तसेच वीज, पाणी, निवास, शिक्षण या पायाभूत सुविधांविषयक प्रश्न भेडसावीत आहेत. त्यांचा साकल्याने विचार करण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांची निर्मिती झाली. अशा संघटनांमध्ये समान उद्दिष्टपूर्तीसाठी व्यक्ती एकत्र येतात व त्या स्वेच्छेने त्यांचे सभासदत्व स्वीकारतात. संघर्षाच्या व शत्रुत्वाच्या वेळी कोणा एकाची बाजू न घेता कोणत्याही राजकीय, वांशिक, धार्मिक अथवा मतप्रणालीविषयक वादग्रस्त बाबतींत त्या तटस्थता कटाक्षाने पाळतात.
साधारणतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वयंसेवी संघटना शासनाच्या बहुविध विकासकामांत सहभागी होऊ लागल्या आहेत. समाजात जागृती व्हावी व मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्यासाठी या संस्था भाषणे, चर्चासत्रे, पथनाट्ये, साहित्य, महाजालक इ. माध्यमांद्वारे लोकजागृतीची कामे करीत आहेत. त्याचप्रमाणे लोकांना असलेल्या समस्यांची जाणीव शासनाला करून देण्यासाठी त्या मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषण, घोषणा इ. मार्गांचा अवलंब करतात. समाजकल्याणाच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांचे योगदान फार मोठे आहे, हे निर्विवाद होय.
लेखक: सु. र. देशपांडे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2023
या विभागात कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे विवध वि...
आशिया खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक आणि जगातील सर्...
भारतात जन्माला आलेला एक खेळ.
औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी येथील भारत पठाडे यांनी ...