मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था. स्थापना मार्च १९५६. सर्वसामान्यांच्या भाषेचा व कल्पनाविष्काराचा अभ्यास व्हावा तसेच पारंपारिक कुळाचारांचे स्वरूप कळावे, हाही या समितीच्या स्थापनेमागील एक हेतू आहे. या समितीवर सदस्य म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक राज्यशासनातर्फे नियुक्त केले जातात. या सदस्यसंख्येवर बंधन नसते. समितीचे प्रारंभीचे अध्यक्ष चिं. ग. कर्वे हे होते. विद्यमान अध्यक्षा सरोजिनी बाबर या आहेत. समितीचे सचिव या नात्याने शिक्षण उपसंचालक काम पाहतात.
प्रकाशित ग्रंथांपैकी प्रारंभीच्या १ ते ५ भागांतील महाराष्ट्र लोकसाहित्य माला (१९५६–६१); लोकसाहित्य आणि लोकसंस्कृति (यात १९६१ सालच्या पुणे संमेलनात वाचलेल्या निबंधांचा संग्रह (केलेला आहे); बाळराज (१९६२), लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति (१९६३), लोकसाहित्य : साजशिणगार (१९६५), जनलोकांचा सामवेद (१९६५), तीर्थांचे सागर (१९६७), राजविलासी केवढा (१९६८), जाई मोगरा (१९६९), नंदादीप (१९७२), लोकसाहित्य शब्दकोश (१९७३), कुलदैवत (१९७४), स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७) व रांगोळी (१९७९) ही पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. यांपैकी काही पुस्तकांतून अभ्यासपूर्ण निबंध संग्रहित करण्यात आल्यामुळे ते अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहेत.
समितीचे एक संग्रहालय पुणे येथे आहे. त्यात लोकसाहित्यविषयक विविध भाषांतील वाङ्मयांचा उपयुक्त असा संग्रह केलेला असून नित्य भर पडत आहे. संशोधक-अभ्यासकांच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरतो. तसेच काही लोकगीतांच्या ध्वनिफिती व लोकजीवनाची छायाचित्रे यांचेही या संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. आवश्यकतेप्रमाणे ही संस्था अधूनमधून संमेलनेही भरवीत असते. तसेच सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची व घटना-प्रसंगांची छायाचित्रेही घेते.
लेखक: चंद्रहास जोशी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/8/2024
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संच...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...