অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यसंस्था

बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यसंस्था

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांत सु. पन्नाससाठ लहानमोठ्या साहित्यसंस्था आस्तित्वात आहेत. यांपैकी ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक संस्था म्हणजे पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद ( स्थापना २७ मे १९०६ ). महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर ‘मराठी साहित्य महामंडळ’ ही नवी मध्यवर्ती साहित्यसंस्था १९६१ मध्ये स्थापण्यात आल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद ही तिची घटकसंस्था झाली. परिषदेप्रमाणेच विदर्भ साहित्य संघ ( १९२३ ), मुंबई मराठी साहित्य संघ ( १९३५ ), मराठवाडा साहित्य परिषद ( १९३७ ) या महामंडळाच्या महाराष्ट्र राज्यातल्या आणखी तीन विभागीय घटकसंस्था आहेत. महामंडळाच्या घटनेतील तरतुदींनुसार महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रमुख राज्यनिहाय संस्थांना समाविष्ठ संस्था आणि इतर देशांतील संस्थांना संलग्‍न संस्था म्हणून मान्यता मिळू शकते. मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश, हैदराबाद ( १९५८ ), मध्यप्रदेश मराठी साहित्य परिषद, जबळपूर ( १९६३ ), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा ( १९७९ ) या मंडळाच्या समाविष्ट संस्था आहेत.

वरील सर्व संस्थांची उद्दिष्टे सामान्यत: समान आहेत. मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रसार आणि उन्नती हे स्थूलमानाने सर्वाचे उद्दिष्ट. ते साधण्याचे मार्ग म्हणजे संशोधन, ग्रंथप्रकाशन, ग्रंथसंग्रह, ग्रंथकारांचे मेळावे, नियतकालिके चालविणे, चर्चा- सभा परिसंवादादी कार्यक्रम करणे, शक्य तिथे परभाषिक साहित्य व साहित्यिक यांच्याशी संपर्क साधणे इत्यादी. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणप्रसारामुळे सर्वत्र ग्रंथ आणि ग्रंथकार जसजसे मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागले, तसतशा सर्वत्र साहित्यसंस्थाही मूळ धरू लागल्या आहेत. पण साहित्यप्रेमी सर्व मराठी जनतेची एक मध्यवर्ती संस्था असावी, तिने प्रातिनिधिक स्वरूपाचा कामे करावीत व इतर लहानमोठ्या संस्थांनी आपापली स्वायत्तता न गमावता तिच्या मातृछायेखाली वावरावे ही व्यापक, व्यवहार्य भूमिका मात्र सर्व संस्थांनी निष्ठेने पतकरली. महामंडळाच्या छायेतील नांदत असणाऱ्या सर्व घटक नि समाविष्ट संस्थांनी आपापली कार्यक्षेत्रे आखून घेतली आहेत. घटनानियमांची रचनाही प्रत्येकीने प्रादेशिक वैशिष्ट्यांना धरून केलेली आहे.

मराठी साहित्यसंस्थांमध्ये, किंबहुना साहित्यिक व साहित्यप्रेमी वाचक यांच्यामध्ये जवळीक साधणारे एक साधनभूत उत्सवी कार्य म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची वार्षिक अधिवेशने. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने १८७८ पासून अशी संमेलने भरविण्याची प्रथा पडली. आरंभीची चारपाच संमेलने ‘मराठी ग्रंथकार संमेलने’ या नावाखाली भरली. पुढे कालानुसार ‘महाराष्ट्र’, ‘मराठी’ आणि ‘अखिल भारतीय मराठी’ असे संमेलनाचे नामांतरण होत गेले. ग्रंथकार संमेलने सुनियंत्रितपणे भरावीत आणि साहित्याचा प्रसारार्थ वंगीय साहित्य परिषदेच्या धर्तीवर कायम स्वरूपाची संस्था असावी या हेतूने १९०६ च्या पुणे येथील चवथ्या ग्रंथकारसंमेलनात ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. तथापि परिषदेचे घटना- नियम १९१२ मधील अकोला संमेलनात तयार झाले आणि नंतर तिचे घटनात्मक कार्य प्रथम मुंबईहून सुरू झाले. मूळच्या घटनीनियमांत अधूनमधून अर्थातच बदल झालेले आहेत. साहित्य परिषदेचे नजरेत भरणारे एक मोठे कार्य म्हणजे १९०६ ते १९६४ पर्यतची साहित्यसंमेलने तिच्यामार्फत भरली. १९६५ च्या हैदराबाद संमेलनापासून हे कार्य ओघाने मराठी साहित्य महामंडळाकडे आले.हैदराबाद ते जळगाव संमेलनापर्यत ( १९६५ ते १९८४ ) महामंडळाने संमेलने भरविली. मंडळाचे आजवरचे तेच प्रमुख कार्य झाले आहे. मराठी शुद्धलेखनाच्या विविध पद्धतींत एकवाक्यता आणून मराठी लेखनाचे नवे नियम महामंडळाने १९६१ साली सिद्ध केले. शासनाने या नियमांना मान्यता दिल्यामुळे शिक्षणसंस्था, पाठ्यपुस्तकमंडळ आदी शासकीय संस्था, वाङ्‌मयीन नियतकालिके आणि काही प्रकाशनस्स्था व्यवहारात या नियमांचा अवलंब करतात. महामंडळ आणि तिच्या पोटसंस्था यांचे कार्य घटनेनुसार चालते. या सर्व संस्थांचे प्रतिनिधी वर्षातून तीनचार बैठका घेऊन कार्याची आणखी करतात.

महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या इतर संस्थांचे कार्य आपापल्या विभागात काही प्रादेशिक वैशिष्ट्ये ध्यानी घेऊन घटनात्मक रीत्या चालु असते. सर्व संस्था अधूनमधून विभागीय संमेलने भरवितात. बहुतेक संस्थांना इमारती आहेत, वर्गणीदार सभासद आहेत, वाङ्‌मयीन स्वरूपाची नियतकालिके आहेत, ती नीट चालावीत म्हणून शासकीय अनुदाने आहेत. महाराष्ट्र साहित्य पत्रिका ( पुणे ), युगवाणी ( नागपूर ),प्रतिष्ठान ( औरंगाबाद ), काही वर्षे चाललेले साहित्य ( मुंबई ), पंचधारा ( हैदराबाद ) आणि अनुबंध ( गुलबर्गा ) या नियतकालिकांद्वारे वरील साहित्यसंस्था संशोधनाच्या आणि समीक्षेच्या क्षेत्रांत जी कामगिरी करीत आहेत, ती निश्चितपणे मोलाची आहे.या नियतकालिकांमुळे त्या त्या संस्था आणि त्यांचे सभासद वाचक यांच्यातील स्‍नेहधागा आपोआप अतूट राखला जातो.

शिवाय आपापल्या विभागातील उपेक्षित आणि नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशात आणण्यासही ही नियतकालिके हातभार लावीत असतात. नियतकालिकांव्यतिरिक्त ग्रंथप्रकाशने करून आणि ग्रंथसंग्रहालये उभारून काही साहित्यसंस्था वाड्‍यप्रसाराचे जे कार्य करीत आहेत, ते सर्वच अभ्यासकांना उपयुक्त आहे. उदा., महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्‌मयेतिहासाचे आरंभ ते १९२० या काळाला व्यापणारे पाच खंड प्रकाशित केले. संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला भाषा व साहित्यसंशोधन ( १९८१ ) हा अनेक तज्ञांनी लिहिलेला ग्रंथ अभिनव आणि उपयुक्त म्हणावा लागेल. विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्यपरिषद या दोन संस्थांची अशीच काही मत्त्वाची प्रकाशने आहेत.

मराठीच्या परीक्षा हे साहित्यपरिषदेचे एके काळी फार लोकप्रिय कार्य होते. १९४० ते १९७० या ३० वर्षाच्या काळात प्रथमा, प्रवेश, प्राज्ञ, विशारद आणि आचार्य या परीक्षांत सु. चाळीस हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विदर्भ साहित्य संघाच्या परीक्षा अजूनही चालू आहेत. अलीकडे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघामार्फत अमराठी भाषिकांसाठी परीक्षा घेतल्या जातात.

वरील सर्व संस्थांच्या कामगिरीचे विस्तृत वर्णन पुरस्तुतच्या छोट्या टिपणात देणे शक्य नाही. याच संस्थांच्या धर्तीवर इतरत्र कार्यान्वित असणाऱ्या संस्थांचा धावता परिचय असा

कालदृष्ट्या आणि कार्यदृष्ट्या मराठी ग्रंथसंग्रहालय ( ठाणे ) आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ( दादर ) या मुंबई विभागातील ऐंशी वर्षे उलटून गेलेल्या दोन संस्थांचा सर्वप्रथम उल्लेख केला पाहिजे. ग्रंथ संग्रह आणि साहित्यविषयक उपक्रम ही दोन्ही कामे या संस्था आजवर करीत आल्या आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा महाराष्ट्रातील एक आदर्श संदर्भ ग्रंथसंग्रहालय म्हणून लौकिक आहे. संग्रहालयाच्या मुंबईत अनेक शाखा आहेत. या एका गोष्टीवरून तेथील ग्रंथसंग्रहाची, संदर्भसाहित्याची कल्पना येऊ सकते. तसेच अनेक वर्षे स्वतंत्र संशोधन मंडळामार्फत संशोधनात्मक आणि संदर्भात्मक साहित्यप्रकाशनाचे जे बहुविध कार्य ग्रंथसंग्रहालयामार्फत चालू आहे, ते कुठल्याही साहित्यसंस्थेने अनुकरण करावे असे आहे.

महाराष्ट्रात इतरत्र असणाऱ्या बहुतेक साहित्यसंस्था या मुख्यत: ग्रंथालये आहेत. ग्रंथालयाच्या आश्रयाने त्या त्या ठिकाणी काही साहित्यविषयक उपक्रम चालू असतात. काही ठिकाणी निखळ साहित्यसंस्थाही स्थापन झाल्या आहेत. सभा-संमेलने, व्याख्याने-परिसंवाद, काव्यगायन, नाट्यप्रयोग, स्पर्धा, संगीतसभा इ. कार्यक्रम ज्या संस्थांचे चालू असतात.

त्यांपैकी आवर्जून उल्लेख करावा अशा संस्था पुढीलप्रमाणे आहेत

  1. पुणे नगरवाचन मंदिर आणि मराठी ग्रंथालय
  2. नारायण पेठ या पुणे शहरातील संस्था
  3. राजाराम सीताराम वाचनालय ( नागपूर )
  4. नगर वाचनालय ( सातारा )
  5. स्‍नेहसंवर्धक संघ ( मिरज )
  6. सार्वजनिक वाचनालय व लोकहितवादी मंडळ ( नासिक )
  7. व वा. लायब्ररी ( जळगाव )
  8. सत्कार्योत्तेजक सभा ( धुळे )
  9. श्रीसमर्थ वाग्‍देवता मंदिर  ( धुळे )
  10. करवीर नगर वाचन मंदिर ( कोल्हापूर )
  11. आपटे वाचन मंदिर( इचलकरंजी )
  12. एकनाथ संशओधन मंडळ ( पैठण )
  13. कलामंदिर व प्रतिमा निकेतन ( नांदेड )
  14. मराठी साहित्य मंदिर ( कल्याण )
  15. सिंधूदुर्ग साहित्यसेवा मंडळ ( मालवण )
  16. द. रत्‍नागिरी साहित्य संघ ( सावंतवाडी )
  17. सदानंद साहित्यमंडळ ( औदुंबर ) इत्यादी.
  18. साहित्य परिषदेच्या काही शाखाही ( उदा.,सोलापूर, नगर, वाई. सांगली, ठाणे, जळगाव )

साहित्यविषयक कार्य उत्साहाने करीत असतात. पुण्यातील भा. इ. सं. मंडळ आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, विदर्भ संशोधन मंडळ ( नागपूर ), राजवाडे संशोधन मंदिर ( धुळे ), तत्त्वज्ञानमंदिर ( अमळनेर ), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ( पुणे ), शारदाश्रम ( यवतमाळ ), गोदातीर इति. सं. मंडळ ( नांदेड ), प्राज्ञ पाठशाला ( वाई ) यांसारख्या संस्था निखळ साहित्यसंस्था नसल्या, तरी त्यांचे संशोधन – संपादन – प्रकाशनवर्ग मराठी साहित्याला पूरक ठरणारेच आहे. पुणे, मुंबई, नागपूर, मराठवाडा, शिवाजी या विद्यापीठांमधील मराठी विभागांतर्फे चालू असणारे मराठी संशोधनाचे कार्यही विचारात द्यावे लागते. विविध संस्थांद्वारे चालू असलेला साहित्यविषयक चळवळचा हा प्रवाह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नित्य नवा उत्साह देत आलेला आहे.

महाराष्ट्रात अलीकडे दलित आणि ग्रामीण साहित्याचा एक नवा प्रवाह मूळ प्रवाहाशी कधी समांतरपणे, तर कधी थोड्या वेगळ्या वाटावळणाने वाहतो आहे. दलित व ग्रामीण साहित्यिकांची स्वतंत्र संमेलनही भरतात. ख्रिस्ती साहित्य परिषदही ( स्थापना १९७२ ) आपली वेगळी संमेलने स्वतंत्र पण अविरोधी कार्य करीत असते. मराठी नाट्यपरिषद, तमाशापरिषद, ग्रंथालयसंघ, नव्यानेच स्थापन झालेली महाराष्ट्र इतिहास परिषद अशा कित्येक संस्था वार्षिक अधिवेशने भरवीत असतात. या सर्वाचे कार्य अखेर मराठी साहित्याला आणि मराठी साहित्यसंस्थांना पूरक-उपकारक ठरते यांत शंका नाही.

महाराष्ट्राबाहेरील राज्यांतूनही अनेक छोट्यामोठ्या साहित्यसंस्था कार्यरत आहेत. गोव्यात गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही संस्था १९२१ पासून साहित्यविषयक प्रसारकार्य करीत आहे. मंडळातर्फे मराठी साहित्य समंलनाची मडगावला दोनदा आणि गोमंतक साहित्य संमेलनाची बारा-तेरा अधिवेशने भरविली गेली. पोर्तुगीज राजवटीत या संस्थेने मराठी अस्मिता जागविण्याचे जे कार्य केले ते अभिमानास्पद आहे. वाङ्‌मय चर्चा मंडळ ( बेळगाव ), मराठी वाङ्‌मयप्रेमी मंडळ ( गदग ) आणि मराठी साहित्यमंडळ ( गुलबर्गा ) या कर्नाटकातील तीन नामवंत संस्था असून त्यांचे कार्य नजरेत भरेल असे आहे. या राज्यातील जुन्या-नव्या सर्व संस्थांनी मिळून ‘कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद’ ही राज्यव्यापी संस्था स्थापन केली असून तिचे कार्यालय गुलबर्गा येथे आहे.

महाराष्ट्राच्या नजीक, जवळीक असणारी दुसरी दोन राज्ये म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेश. स्वातंत्र्यपूर्व काळात या राज्यांत साहित्यविषयक चळवळी मुख्यत: गायकवाड, शिंदे, होळकर, पवार इ. संस्थानिकांच्या आश्रयाने चालत असत. त्यांनी जोपासलेल्या काही साहित्यसंस्थांच्या अनुकरणाने स्वातंत्र्योत्तर काळात लोकाश्रयाने काही नव्या संस्था उद्‍याला आल्या. बडोदे येथील मराठी वाङ्‌मय परिषद व सहविचारिणी सभा या दोन जुन्या संस्थांचे कार्य सर्वश्रुत आहे. अहमदाबादमधील महाराष्ट्रसमाज ही संस्थासुद्धा साहित्यविषयक चळवळीपासून अलिप्त नाही. इंदुरची महाराष्ट्र साहित्य सभा ही मध्य प्रदेशातील सर्वात जुनी, प्रतिष्ठित व स्वत:ची भव्य वास्तू असणारी कार्यक्षम साहित्यसंस्था. शारदोपासक मंडळ ( ग्‍वाल्हेर ), साहित्य संगम (भोपाळ), मराठी वाङ्‌मय मंडळ (उज्जैन), मराठी साहित्य संघ ( जबळपूर ) या मध्य प्रदेशातील आणखी काही नावाजलेल्या संस्था. दिल्ली, जयपूर, उदेपूर, अजमेर, कानपूर, लखनौ, अलाहाबाद, मद्रास, कलकत्ता अशा दूरदूरच्या शहरांतसुद्धा मराठी साहित्यविषयक चळवळी चालू असतात. त्या त्या ठिकाणचे महाराष्ट्र-समाज वा मंडळे इतर सांस्कृतिक कार्याबरोबर साहित्यविषयक कार्यक्रम आवर्जून करतात. ‘बृहन्महाराष्ट्र परिषद’ या सुप्रतिष्ठित संस्थेतर्फे मायमराठी नावाचे मासिक अनेक वर्षे चालू आहे.

लोकाश्रयावर चालणाऱ्या साहित्यसंस्थेचे कार्य हे हौसेचे, हौशी कार्यकर्त्यानी चालविलेले कार्य असते. कारकून आणि गडीमाणसे यांशिवाय या संस्थांतून एकही पगारी पदाधिकारी नसतो हे लक्षात घेतले, म्हणजे निरपेक्ष रीत्या साहित्यप्रेमाखातर जे कार्यकर्ते या संस्थांमधून राबतात त्यांचे वाङ्‌मयऋण खरोखर न मोजता येणारे आहे. मराठी साहित्य संस्था या मराठी साहित्याच्या प्रसाराला नि उन्नतीला फार मोठा हातभार लावीत आल्या आणि त्यामुळे मराठी जनतेमधील भावनिक ऐक्याला बळकटी येत गेली, ही गोष्ट सर्वमान्य होण्यासारखी आहे. साहित्यविषयक कार्यक्रमांचे एक मुक्त आनंददायी व्यासपीठ म्हणजेच या साहित्यसंस्था.

स्वातंत्र्योत्तर काळात दिल्ली येथे साहित्य अकादेमी ( १९५४ ) आणि नॅशनल बुक ट्र्स्ट ( १९५७ ), महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ ( १९६० ), लोकसाहित्य समिती, भाषासंचालनालय, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई अशा काही शासकीय, स्तरांवरील साहित्यसंस्था स्थापन झाल्या. ग्रंथप्रकाशन, प्रकाशनार्थ अनुदाने, ग्रंथपारितोषिके इ. मार्गाने या संस्थामार्फत होणारे कार्य मराठीच्या संसाराला हातभार लावणारे खचित आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे योजनाबद्ध कार्य इतर कुठल्याही राज्याने अनुकरण करावे असे आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे, की विद्यापीठे आणि शासकीय स्तरांवरील संस्था यांमधून होणाऱ्या योजनाबद्ध कार्यामुळे प्रस्थापित साहित्य संस्थांच्या कार्याचा अलीकडील काळात संकोच होत चालला आहे. अशा स्थितीत शासकीय व अशासकीय संवतंत्र साहित्यसंस्थांची मूळ उद्दिष्टे, साधने, कार्यक्षेत्रे आणि जनतेकडूनच्या अपेक्षा या सर्व बाबींचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे.

लेखक: म. श्री. दीक्षित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate