आधुनिक काळातील एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ. अशा प्रकारचे विद्यापीठ प्रारंभी बाराव्या शतकात इटलीतील बोलेन्या येथे विद्यार्थ्यांनी स्थापन केले होते. त्यातील शिक्षक विद्यार्थ्यांनीच घालून दिलेले होते. शिक्षक वर्गात उशिरा आले किंवा त्यांनी ठरविलेले तास वेळेवर घेतले नाहीत, तर विद्यार्थीच त्यांना शिक्षा करीत.
शिक्षणतज्ञांच्या मताप्रमाणे १९६४ मध्ये अमेरिकेतील बर्कली येथे विद्यार्थ्यांच्या ज्या दंगली झाल्या, त्यांमध्ये अलीकडील मुक्त विद्यापीठांचा उगम आहे. आपण विद्यापीठातून बाहेर पडावे आणि आपले स्वतःचे असे एक ‘मुक्त विद्यापीठ’ स्थापन करावे, असे बर्कली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वाटले. सुरुवातीच्या काळात बर्कली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते, की आपल्या समाजाच्या प्रश्नांशी निगडित असलेल्या परंतु विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश नसलेल्या गोष्टी व प्रश्न यांसंबंधी चर्चा करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्या व्यवहारात आणणे, हेच मुक्त विद्यापीठाचे प्रमुख ध्येय होय.
जेथे संवाद आहे, खुली चर्चा आहे, भावनांची उत्कटता आहे, निःपक्षपाती वातावरण आहे; स्वागत,सभा, चळवळी, संमेलने, प्रेम यांचे जीवन आहे, ते विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ होय. मुक्त विद्यापीठाच्या चळवळीने तरुण मनाला सर्जनशील मार्गाकडे वळविले. १९६० ते १९७० या काळात अमेरिकेमध्ये बरीच मुक्त विद्यापीठे उदयास आली. २३ जुलै १९६९ रोजी ब्रिटनमधील मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू लॉर्ड क्राउथर यांनी आपल्या भाषणात असे म्हटले होते की, मुक्त विद्यापीठ हे सर्वार्थाने मुक्त असते.
त्यामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा, नियम, तास, शिक्षक-विद्यार्थी सभा, सत्र-कालावधी या सर्वांवर कोणतेही बंधन नसते. मुक्त विद्यापीठाचे स्वरूप बदलते व अशाश्वत आहे, असे काही शिक्षणतज्ञांना वाटते. तथापि पारंपारिक विद्यापीठांचे तरी यापेक्षा वेगळे असे काय आहे ? जसजसा काळ जातो तसतशी यांचीही अवनती होत जाते, असे इतरांचे मत आहे. समाजधारणेला पर्याय देण्याची मुक्त विद्यापीठाची कल्पना महत्वाकांक्षी आहे, असे काही शिक्षणतज्ञांना वाटते.
पारंपरिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची संख्या अतिशय वाढल्याने पाश्चात्त्य देशांत तसेच भारतातही महाविद्यालयीन शिक्षण विस्कळित झाले. संख्या व गुण यांच्या व्यस्त प्रमाणामुळे ह्या शिक्षणपद्धतीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. पदवी मिळविणे एवढेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत या शिक्षणाचे उद्दिष्ट ठरले. शिक्षण का, कसे व कोणासाठी असे जे अनेक प्रश्न विचारले जातात; त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा सर्वच ठिकाणी प्रयत्न चालू असतो व रूढ शिक्षणपद्धतीला पर्यायही शोधले जातात. ⇨ पत्रद्वारा शिक्षण, ⇨ बहिःशाल शिक्षण,
निरंतर शिक्षण, अनौपचारिक शिक्षण अशा विविध पर्यायांप्रमाणेच मुक्त विद्यापीठ या नव्या प्रायोगिक पर्यायाची सुरुवात झाली. मुक्त विद्यापीठामध्ये नियमित वर्ग भरविले जात नाहीत; अथवा ठराविक काळात शिक्षणक्रम संपविणारी एखादी विद्याशाखाही नसते; परंतु सर्वसाधारण विद्यापीठांतील पदवी परीक्षेपर्यंतचा पूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो. व्यक्ती हीच आपल्या जीवनाची उत्तम शिल्पकार असू शकते, ही या विद्यापीठामागची मूळ भूमिका आहे. गृहिणी, मध्यमवर्गीय कर्मचारी,टॅक्सी ड्रायव्हर, पोलीस अशा विविध प्रकारच्या व्यवसायांत किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या नोकरीत स्थिरावलेल्या व्यक्ती मुक्त विद्यापीठांत शिक्षण घेतात.
बव्हंशी विद्यार्थ्यांचे व्यवसाय पूर्ण वेळेचे असतात; परंतुपदवीअभावी अनेकांना नोकरीत बढती मिळत नाही. नेहमीचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी यांपैकी फारच थोड्यांना मिळते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा व्यावसायिक अनुभव केवळ शालेय शिक्षणक्रमाच्या योग्यतेच्या असला, तरी त्या व्यक्तीची औपचारिक शैक्षणिक पात्रता विचारात न घेता मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जातो.
अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांचा किंवा महाविद्यालयाचा सल्ला घेण्याऐवजी काय शिकण्याची इच्छा आहे, हे विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सांगतो आणि मार्गदर्शकांच्या साहाय्याने पदवी परीक्षेचा मार्ग स्वतःच ठरवितो. शिक्षणाची प्रक्रिया अव्याहत चालू राहावयाची असेल, तर जीवनातील समस्यांना उत्तरे कशी शोधावीत, या शोधामध्ये तज्ञांचे साहाय्य कसे घ्यावे इ. गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकणे आवश्यक असते. या गोष्टी मुक्त विद्यापीठामध्ये त्यांना शिकता येतात.
भारतातील विद्यापीठांनी मुक्त विद्यापीठाच्या चळवळीपासून खूप बोध घेण्याजोगा आहे; कारण तेथील विद्यापीठांतून बराच वेळ वाया जातो व नेहमीच्या कार्यक्रमात कितीतरी अडथळे येतात. आपल्या उच्च शिक्षणात नव्या प्रयोगांचा उदय आणि अवलंब झाला नाही, तर विद्यापीठाची मोडतोड झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या संकल्पनेमधील बाबींचा अंतर्भाव सध्याच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमांत केल्यास मुक्त विद्यापीठाची जरूरी भासणार नाही.
भारतामध्ये १९७० नंतरच्या काळात मुक्त विद्यापीठाची कल्पना रुजली. २६ ऑगस्ट १९८२ रोजी राष्ट्रपती झैलसिंग यांनी आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर येथे मुक्त विद्यापीठाचे उद्घाटन केले. ज्यांच्यापर्यंत पारंपरिक शिक्षण पोहोचू शकले नाही, ज्यांना साक्षरतेशिवाय अधिक शिक्षण लाभू शकले नाही, अशांसाठी मुक्त विद्यापीठ ही एक आवश्यक बाब आहे. भारतातील कोट्यवधी निरक्षरांची संख्या आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी लक्षात घेता येथे मुक्त विद्यापीठांची नितांत आवश्यकता आहे. पुण्यामध्ये स्थापन झालेले ज्ञानेश्वर विद्यापीठ (स्था. १९८०) हेही मुक्त विद्यापीठच म्हणावे लागेल.
मुक्त विद्यापीठे ही खरोखरच मुक्त आहेत काय ? काही शिक्षणतज्ञांना असे वाटते, की या विद्यापीठांमध्येही विद्यार्थ्यांवर काही बंधने घालावीच लागतात. नाव नोंदविण्याची तारीख, अभ्यासक्रमाचा कालावधी, निकाल जाहीर होण्याची तारीख इ. गोष्टींमुळे या विद्यापीठांवरही बंधने पडतात व खऱ्याखुऱ्या अर्थाने मुक्त विद्यापीठ हे त्यांचे स्वरूप नष्ट होते. १९६० ते १९७० या काळात जेवढी मुक्त विद्यापीठे स्थापन झाली, त्या तुलनेत पुढील दहा वर्षांत मुक्त विद्यापीठे स्थापन झालेली नाहीत. यासंबंधी असे अनुभवास येते, की मुक्त विद्यापीठांच्या स्थापनेमुळे पारंपरिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या विचारांची नवी दिशा काय आहे, बंडखोर तरुणांना काय पाहिजे आहे, हे कळण्यास साहाय्य झाले व पारंपरिक विद्यापीठांनी या गोष्टीची वेळीच दखल घेऊन आपल्या अभ्यासक्रमांमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने मुक्त विद्यापीठाचे हे यशच होय.
लेखक: श्री. ब. गोगटे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
जेनोआ : वायव्य इटलीतील जेनोआ प्रांताची राजधानी. लो...
मध्य इटलीच्या पूर्व किनाऱ्यावरील निसर्गरम्य शहर. ल...
लांब दांड्याच्या लाकडी मोगऱ्याने उभ्या ६ कड्यांतून...
हवामान व बाजारपेठ यांचा विचार करून शेतकरी पीक व्यव...