लांब दांड्याच्या लाकडी मोगऱ्याने उभ्या ६ कड्यांतून चेंडू विशिष्ट प्रकारे पार करण्याचा खेळ. इटलीत ह्याचा उगम झाला. हा खेळ तेराव्या शतकात फ्रान्समध्ये चालू होता. इटलीत त्याला ‘पॉलमॉल’ म्हणत. सतराव्या शतकात हा खेळ फ्रान्समधून इंग्लंडमध्ये आला. फ्रान्समध्ये ह्याला ‘क्रोक’ (वक्र) म्हणत, त्यावरून क्रोक हे नाव रूढ झाले. सांप्रत हा ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका व अमेरिका इ. देशांत खेळला जातो. टेनिसच्या लोकप्रियतेमुळे ह्याचे महत्त्व कमी झाले. १८७० मध्ये ‘ऑल इंग्लंड क्रोक क्लब’ची स्थापना होऊन खेळाचे नियम तयार करण्यात आले. क्रिकटेप्रमाणे वरील देशांत याचे कसोटी सामने होतात.
या खेळाचे मैदान साधारणतः ३५ X २८ यार्डाचे (सु. ३२ मी. X २५·५ मी.) असते. त्यात ठराविक अंतरावर ६ उभ्या कड्या असतात. १० इंच (सु. २५ सेंमी.) उंच व ३३/४ इंच (सु. ९·५ सेंमी.) रुंदीची मध्यावर एक खुंटी असते. हा खेळ दोन वा चार खेळाडूंना टेनिसप्रमाणे खेळता येतो. या खेळासाठी साधरणतः लांब दांड्याचा मोगरा व तांबडा, काळा, निळा व पिवळ्या रंगाचे ३१/२ इंच (सु. ८·५ सेंमी.) व्यासाचे १५ ते १६ औंस (सु. ०·४५ किग्रॅ.) वजनाचे चार चेंडू वापरतात. खेळाच्या मैदानातील प्रारंभरेषेपासून मोगऱ्याने चेंडू टोलवत आणि विशिष्ट क्रमाने ६ कड्यांतून पार करीत शेवटी तो मधल्या खुंटीला प्रथम मारणारा विजयी ठरतो.
चेंडू कड्यांतून टोलविण्याचा क्रम पुढीलप्रमाणे असतो : प्रारंभी १, २, ३, ४, ५, ६ या कड्यांतून चेंडू नेणे, नंतर २, १, ४, ३, ६ व ५ या क्रमाने नेऊन शेवटी खुंटीला मारणे. वरील क्रमाने चेंडू मारताना हुकल्यास खेळाडूची पाळी जाते व दुसर्यास मिळते. खेळाडूचा चेंडू कडीपार झाल्यास त्याला एक जादा टोला मारता येतो व दुसर्याच्या चेंडूला त्याचा चेंडू लागल्यास दोन जादा टोले मिळतात. चेंडू कडीपार झाल्यास एक गुण मिळतो. चेंडू दुसर्या चेंडूवर आपटल्यास 'रोके' मिळतो, म्हणजे एक जादा टोला मिळतो. रोके मिळाल्यानंतर चेंडू कडीपार करून जर खेळाडूने एक गुण मिळविला,
तर पुन्हा त्यास एक जादा टोला मारावयास मिळतो व त्यानंतर जर त्याने रोके केल्यास त्याला क्रोके म्हणजे आणखी दोन टोले मारण्याची संधी मिळते. कुशल खेळाडू आपला चेंडू दुसर्याच्या चेंडूवर आपटून त्याचा चेंडू मैदानाच्या बाहेर घालवतो. आपला चेंडू शक्य तो आत ठेवून सहा कड्यांचे पार चेंडू नेऊन तो विजय मिळवतो. या खेळात व बिलियर्डमध्ये थोडे साम्य आहे. अमेरिकेत खेळाचे मैदान थोडे मोठे असते आणि तेथे वेगळे नियम आहेत. हा खेळ फारसा लोकप्रिय नाही.
लेखक: श्री. पु. गोखले
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/3/2020
मध्य इटलीच्या पूर्व किनाऱ्यावरील निसर्गरम्य शहर. ल...
हवामान व बाजारपेठ यांचा विचार करून शेतकरी पीक व्यव...
इटलीतील एक जुने विद्यापीठ.
जेनोआ : वायव्य इटलीतील जेनोआ प्रांताची राजधानी. लो...