आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा असा संदेश नव्या पिढीला देत असतांना तो अभिमान बाळगण्यासाठी आपण त्यांना काय ठेवा देणार आहोत हा विचार करता आज जवळपास प्रत्येकजण निरुत्तर होत आहे. अशा परिस्थितीत मराठी साहित्य वाचत नाही म्हणून सर्वच स्तरावरून आजच्या तरूण पिढीला दोषी मानले जाते आणि आय-फोन-आय-पॅडच्या जमान्यात त्यांच्या कडून ग्रंथवाचनाची अपेक्षा ठेवली जाते. इंटरनेट या मायाजाळाचा वाढता प्रसार आणि त्याचे नव्यापीढीला असलेले प्रचंड आकर्षण याचा विचार करता अनेक महत्वाचे मराठी ग्रंथ डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होत आहेत तसेच अनेक वृत्तपत्रे डिजीटल स्वरूपात या महाजालावर प्रदर्शीत होत आहेत. महाजालाच्या प्रभावात आजची संपूर्ण पिढी रममाण असतांना अनेक विषयांचे ज्ञानभांडारही या माध्यमातून सादर केले जात आहे याच प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने संपुर्ण मराठी विश्वकोश या महाजालावर प्रदर्शीत करावयाचा ऐतिहासीक प्रकल्प हाती घेतला आणि माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी तो जगास मोफत अर्पण करण्यात आला. याप्रकल्पाद्वारे “मराठी विश्वकोश” घराघरात पोहंचला असून त्याचबरोबर जगातील अब्जावधी लोकांच्या हातात आय-पॅड व मोबाईलच्या सहायाने एका क्लिकवर उपल्बध झाला आहे.
कोणत्याही भाषेतील विश्वकोश म्हणजे त्याभाषेचे संपूर्ण प्रतिबिंब असते, त्याभाषेच्या आद्यकालापासून ते आधुनिकीकरणापर्यंत त्या भाषेत कालानुक्रमे झालेले बदल आणि त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण तसेच आवश्यक असेल तिथे चित्ररूपाने त्या भाषेतील सर्व संज्ञांची सोप्या भाषेत उकल करून देण्याचे एक विश्वासार्ह साधन होय. विविध स्तरावरील अभ्यासकांना, भाषा संशोधकांना, भाषा विद्यार्थी व शिक्षकांना तसेच कोणात्याही स्तरावरील जिज्ञासूंना त्याभाषेतील आवश्यक ते सर्व संदर्भ शोधण्यास विश्वकोशाचा उपयोग होतो.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे आणि महाराष्ट्र राज्याची ही अधिकृत राजभाषा आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाने तात्कालीन अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य सूरू केले. मूळ पुस्तकरूपात असलेल्या मराठी विश्वकोषात एकूण वीस खंड असून ते सर्व जसे आहेत तसे डिजीटाइज करून यूनीकोडमध्ये “घराघरात विश्वकोश” या प्रकल्पा अंतर्गत सर्वसामान्यांना अर्पण करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचा पत्ता http://www.marathivishvakosh.in/ असा आहे. “तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार', हे विश्वकोशाचे ब्रीद आहे.
या प्रकल्पाची सृजन संकल्पना महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांची असून तांत्रिक सहाय्य सी-डैक, पुणे यांचे आहे. सदर प्रकल्पाचा आराखडा आणि विकासकार्य ई-गव्हर्नन्सच्या धोरणाचे पालन करत असून त्यासाठीच्या W3C XHTML1.0 आणि W3C CSS या दोन्ही तांत्रिक पात्रता पूर्ण केल्या आहेत. या प्रकल्पाचा संपुर्ण डाटा शासकीय डाटा सेंटरवर ठेवण्यात आलेला आहे.
ही प्रणाली वापरावयास अत्यंत सुलभ आहे, प्रणालीच्या मुखपृष्टावर जाताच “खंड विभागणी” या सदरात खंड-१ ते खंड-१९ या लिंक दिलेल्या आहेत. यातील प्रत्येक लिंकला क्लिक केल्यास त्या खंडाचे शीर्षक आणि त्याखाली त्या खंडातील नोंदशीर्षक आणि विषय यांची यादी दिलेली आहे. यातील प्रत्येक नोंदशीर्षक म्हणजे एक स्वतंत्र लिंक असून त्या लिंकला क्लिक केल्यास त्या शब्दाची विश्वकोशात जशी आहे तशी संपूर्ण माहिती चित्रासहीत पाहावयास मिळते.
खंड : १ (अंक ते आतुरचिकित्सा), खंड २ रा : (आतुर निदान ते एप्स्टाइन, जेकब), खंड ३ रा ('एबिंगहाऊस, हेरमान' ते 'किसांगानी'), खंड : ४ (कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका), खंड : ५ (गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि), खंड : ६ ('चेन, सर एर्न्स्ट बोरिस' ते 'डोळा'), खंड : ७ (ड्यूइसबुर्क ते धरणगाव), खंड : ८ (‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’), खंड : १० ('पैकारा' ते 'बंदरे'), खंड : ११ (बंदा ते बुगनविलिया ), खंड: १२ (‘ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य’), खंड : १३('महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ' ते 'म्हैसूर संस्थान') , खंड : १४ (‘यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट’), खंड : १५ (रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण), खंड : १६ (‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’), खंड : १७ (‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ते ‘वोल्व्हरिन’ ), खंड : १८ (‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ते ‘वोल्व्हरिन’) आणि खंड : १९ (‘सँगर, फ्रेडरिक’ते सूष्टि व मानव’) अशा १९ खंडात प्रत्येकी ७८३ नोंदी प्रमाणे एकूण १४८७७ नोंदी (२२००० पाने) उपलब्ध आहेत. क्रमाने प्रदर्शीत केलेल्या खंडनिहाय माहिती शिवाय सर्वसामान्य वाचकास एखादा शब्द शोधावयाचा असल्यास याच प्रणालीतील मुखपृष्टावर “शब्द शोधा” नावाचे ऑपशन दिलेलेआहे ज्याद्वारे इनपुट फ़ील्ड मध्ये आपण टाईप केलेला कोणताही शब्द “कीवर्ड” गृहीत धरून विश्वकोशातील सर्व माहितीशी पडताळून त्या शब्दाचे साम्य असणार्या सर्व शब्दांची माहिती देणार्या लिंकचे अनेक पर्याय दर्शविले जातात. याचबरोबर इंग्रजी भाषेतून दिलेल्या शब्दाच्या अर्थाच्या मराठी शब्दाबद्दल मराठीतून माहिती देण्याची सुविधा “टाईप इन ईंग्लिश”ह्या ऑप्शन द्वारे देण्यात आलेली आहे.
या शिवाय या प्रणालीत “मान्यवरांचे व्हिडीओ” या सदरात डॉ. विजया वाड, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरूंधती खंडकर व डॉ. नरेंद्र जाधव या मान्यवरांच्या व्हिडीओ-क्लिपस पाहाता येतात तर “फोटो गॅलरी” मध्ये विविध छायाचित्रांचा संग्रह प्रदर्शीत करण्यात आलेला आहे. “वृत्तपत्रीय संच” या सदरास भेट दिल्यास विविध वृत्तपत्रांनी या प्रकल्पाची घेतलेली दखल दिसून येते.
या पोर्टलला २२ देशातून आजपर्यंत ६६७६५८ यूजर्सने भेट दिलेली आहे. मराठी भाषेची आवड असलेल्या प्रत्येकास “घराघरात विश्वकोश” हा प्रकल्प म्हणजे एक अत्यंत सुलभ आणि महत्वपूर्ण खजिना हाती असल्यासारखे आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीने पुढच्या अनेक पिढ्यांना एक मौल्यवान ठेवा हाती देण्यात आलेला आहे, असा ठेवा जो की कायमस्वरूपी असेल पिढ्या-न-पिढ्या...! खर्या अर्थाने नश्वर ! अगदी ज्ञानासारखाचं...!!
लेखक : सुनिल पोटेकर
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 9/27/2019
कोशरचनेचा एक वैशिष्टयपूर्ण प्रकार.
जगातील 'अ' पासून ते 'ज्ञ' पर्यंतच्या विविध संज्ञां...