অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योजना सामूहिक शेततळ्याची...

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये आणि पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या तलावास योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत.

सामूहिक तलावाचे प्रकार


1) मॉडेल क्र. 1 ः 2 मी. खोदकाम व 3 मी. बांधाची उंची (Half Dugout)
2) मॉडेल क्र. 2 ः पूर्णपणे खोदकाम करून करावयाचे शेततळे (Fully Dugout)
3) मॉडेल क्र. 3 ः बोडी टाईप सामूहिक शेततळे (Bodi Type)
सामूहिक शेततळ्यातील पाण्याचा उपयोग लाभार्थींनी फळपिकांच्या सिंचनाकरिता करणे अपेक्षित आहे.

लाभार्थी निवडीचे निकष


  • सामूहिक शेततळ्याचा लाभ लहान शेतकरी, आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्याने देणे अपेक्षित आहे.
  • योजना राबविताना अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (8 टक्के), आदिवासी, महिला (30 टक्के), लहान शेतकरी इत्यादींना प्राधान्याने नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावा.
  • लाभार्थी संयुक्त कुटुंबातील नसावेत. ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. तसेच त्यांचे जमीनधारणेबाबतचे खातेउतारे स्वतंत्र असावेत.
  • शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी अधिकाधिक कार्यक्षमता असलेल्या सिंचन पद्धतीचा (ठिबक, तुषार इत्यादी) वापर करणे बंधनकारक आहे.
  • जेवढे क्षेत्र सध्या समूहामध्ये फळपिकाखालील असेल, तेवढ्या क्षेत्रासाठीच सामूहिक शेततळे देण्यात येईल.
  • ज्या शेतकऱ्यांनी 2005-06 नंतर फळबाग लागवड केलेली असेल, अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • लाभार्थी समूहाकडे फळबाग लागवड असणे आवश्‍यक आहे. भविष्यात होणाऱ्या फळबाग लागवडीचा विचार करण्यात येऊ नये.
  • सामूहिक शेततळ्याचा वापर दोन अथवा अधिक लाभार्थ्यांनी करावा.
  • सामूहिक शेततळ्याचे ठिकाण फळपिकाच्या लाभक्षेत्राच्या नजीक असावे, त्यामुळे तलावातील पाणी कमीत कमी कष्टांत व खर्चामध्ये संपूर्ण फळबाग क्षेत्रास देता येईल.
  • शेततळ्यातील पाणीवापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल लाभार्थ्यांमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार प्रपत्र-7 नुसार करावा.
  • शेततळ्याचा वापर अपेक्षित पद्धतीने करण्यात येईल, असा शेतकऱ्यांनी शासनाकडे प्रपत्र-8 नुसार करार करावा.

प्लॅस्टिक फिल्म बसविताना घ्यावयाची काळजी


  • शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये जिरून वाया जाऊ नये म्हणून विशेष प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्मचा (रीइनफोर्सड्‌ जीओ मेंबरेन फिल्म IS:15351:2008 या दर्जाची) लायनिंगसाठी योग्य प्रकारे उपयोग करावा.
  • सामूहिक बोडी प्रकारच्या शेततळ्यामध्ये लायनिंग करणे अपेक्षित नाही.
  • शेततळ्यातील पाण्याच्या वापराबाबत रूपरेषा प्रथम निश्‍चित केली जावी.
  • सामूहिक शेततळ्याचा लाभ समूहाकडील पूर्वी लागवड केलेल्या फलोत्पादन पिकांसाठी देण्यात येईल.
  • फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद (अँकरिंग) करून संपूर्ण शेततळ्यात अशा प्रकारे बसवावी, की ज्यामुळे फिल्म पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही व शेततळ्यातील साठलेले पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही.
  • फिल्म शेततळ्यामध्ये योग्य प्रकारे जोडून घ्यावी.
  • मंजूर क्षमतेच्या आकारमानापेक्षा प्रत्यक्ष खोदाई जास्त केली जाते. त्यामुळे अस्तरीकरणासाठी लागणाऱ्या जादा फिल्मची किंमत देण्यास लाभार्थी तयार नसतात. त्यामुळे निर्धारित आकारमानापेक्षा जास्त खोदाई होणार नाही याची काळजी घ्यावी. जर लाभार्थी मोठ्या आकारमानाचे शेततळे घेऊ इच्छित असेल, तर त्यासाठी जास्तीचा येणारा खर्च लाभार्थीला करावा लागेल याची जाणीव करून देण्यात यावी.

अनुदान वितरित करण्याची पद्धत


अ) पहिला टप्पा ः मातीकाम
मातीकाम पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिका नोंदणीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अनुदान वितरित करण्यासाठी पाठविणे आवश्‍यक आहे. खोदकामाचे अनुदान वितरण करताना खोदकामाच्या मंजूर रकमेच्या 80 टक्के अनुदान वितरित करावे.
ब) दुसरा टप्पा ः काटेरी तारेचे कुंपण करणे
काटेरी तारेचे कुंपण पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिका नोंदणीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अनुदान वितरित करण्यासाठी पाठविणे आवश्‍यक आहे. काटेरी तारेच्या कुंपणासाठी अनुदान वितरण करताना कुंपणासाठी देय असलेली पूर्ण रक्कम लाभार्थीला देण्यात यावी.
क) तिसरा टप्पा ः फिल्म अस्तरीकरण करणे
फिल्म अस्तरीकरण पूर्ण झाल्यावर 8 दिवसांच्या आत मापनपुस्तिकेत नोंद घेऊन या बाबीसाठी मंजूर असणारे पूर्ण अनुदान (100 टक्के) वितरण करण्यात यावे.
ड) चौथा टप्पा ः शेततळ्यात पाणी भरल्यानंतर
- शेततळ्यामध्ये पाणी भरल्यावर खोदकामाचे उर्वरित 20 टक्के देय अनुदान वितरित करण्यात येते.
वरील सर्व टप्प्यांतर्गत देय अनुदान शेतकरी समूहाच्या सामूहिक बॅंक खात्यावर जमा केली जाते.
एम.एन.आर.ई.जी.एस. अंतर्गत खोदलेल्या शेततलावास फिल्टरेशन युनिट बसविणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे.

सामूहिक शेततळे तयार करण्यासाठी खर्चाचे मापदंड



1) सामूहिक शेततळ्याचा आकार उपलब्ध क्षेत्रीय परिस्थितीनुसार ठरविण्यास लाभार्थ्यांना मुभा राहील. सामूहिक शेततळ्यासाठी पुढील तीन मॉडेल्स राबवायची आहेत. त्यासाठी पाणीसाठा क्षमता आणि अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे राहील ः
1.1 जमिनीच्या वर बांध घालून पाणीसाठा करावयाचे सामूहिक शेततळे (Half Dugout)
  • सामूहिक शेततळ्यामुळे जमिनीचे कमीत कमी क्षेत्रफळ व्यापले जावे, तसेच पाण्याचा पसारा कमी ठेवल्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी पूर्ण भरलेल्या शेततळ्यातील पाण्याची उंची सुमारे पाच मीटर असावी.
  • बांधासहित व बांधाविरहित 10,000 घनमीटर (प्रपत्र- 5 अ), 8000 घनमीटर (प्रपत्र - 5ब), 6000 घनमीटर (प्रपत्र - 5 क), 5000 घनमीटर (प्रपत्र - 5 ड), 4000 घनमीटर (प्रपत्र - 5 इ), 3000 घनमीटर (प्रपत्र - 5 ई), 2000 घनमीटर (प्रपत्र - 5 फ) घनमीटर साठवण क्षमतेच्या शेततळ्याच्या खोदाईसाठी नैसर्गिक सखलतेचा विचार करून शेततळ्याची खोली 1 ते 3 मीटरपर्यंत गृहित धरलेली आहे.
  • सामूहिक शेततळ्यासाठी वाहून जाणारे पाणी जमा करण्यासाठी इनलेट, जादाचे पाणी वाहून जाण्यासाठी आऊटलेट करावे.
  • या प्रकारच्या सामूहिक शेततळ्यामध्ये वाहून जाणारे पाणी साठविणे अपेक्षित असल्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्यातील गाळ शेततळ्यामध्ये जाऊ नये म्हणून फिल्टरेशन टॅंक तयार करणे आवश्‍यक आहे. फिल्टरेशन टॅंक तयार करण्याकरिता 2x2x2 मी. आकाराचा खड्डा करून त्यामधून पाणी वाहून जाण्याची सोय करावी. जेणेकरून पाण्यातील गाळ त्या खड्ड्यामध्ये बसून राहील व गाळणी केलेले पाणी शेततळ्यामध्ये जाईल. त्यामुळे अस्तरीकरण केलेल्या प्लॅस्टिक शीटवर गाळ साचणार नाही.
  • अशा प्रकारच्या फिल्टरेशन टॅंकमध्ये वरच्या थरात 50 ते 100 मिलिमीटर जाडीची खडी, मधल्या थरात 5 ते 10 मिलिमीटर जाडीची बारीक खडी आणि सर्वांत खालच्या थरामध्ये 2 ते 4 मिलिमीटर जाडीची वाळू वापरणे आवश्‍यक आहे. या फिल्टरेशन टॅंकसाठी सुमारे रुपये 10,000 खर्च अपेक्षित आहे.
  • याशिवाय पाणी गाळण्यासाठी शेतकऱ्याने दुसरी व्यवस्था केली असल्यास त्यास हरकत नाही. तथापि वाहून येणाऱ्या पाण्यातील गाळ सामूहिक शेततळ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या शेततळ्यामध्ये बांधासहित व बांधाविरहित अशा दोन्हीही प्रकारच्या सामूहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक दिलेले आहे.
  • वाहून जाणारे पाणी साठवणूक करून पूर्णपणे खोदाई केलेल्या सामूहिक शेततळ्यामध्ये पाण्याची उंची 3.10 मीटर ठेवण्यात यावी.
  • 2500, 5000, 7500, 10,000, 12,500 व 15,000 घनमीटर साठवणूक क्षमतेचे बोडी टाईप सामूहिक शेततळे बांधणे आवश्‍यक आहे.
  • बोडी टाईप सामूहिक शेततळ्याचे बांधकाम हे पूर्ण खोदाई केलेल्या सामूहिक शेततळ्याप्रमाणे आहे. मात्र यामध्ये जमीन स्तरापासून जास्तीत जास्त खोली एक मीटर गृहित धरलेली आहे.
  • यापूर्वी खोदाई केलेल्या बोडींना या अभियानात अनुदान देय नाही, याची नोंद घ्यावी.
  • बोडी टाईपच्या सामूहिक शेततळ्यासाठी प्लॅस्टिक शीट अस्तरीकरण करणे अपेक्षित नाही. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये याचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • बोडी टाईपमध्ये बांधाची उंची 1.3 मीटर असावी.

शेततळे करताना...

  • शेततळ्यासाठी निश्‍चित केलेल्या जागेवर मजुराद्वारा अथवा आवश्‍यक ती यंत्रसामग्री वापरून योग्य त्या क्षमतेचा जलसाठा तयार करावा.
  • शेततळ्याचे क्षेत्रफळ साठवणूकक्षमतेप्रमाणे निश्‍चित करावे.
  • प्रस्तावित जागेमध्ये खोदाई करून काढलेली माती शेततळ्याच्या आकारानुसार लावून व दबाई करून बांध बनविण्यात यावा.
  • सदर शेततळ्यासाठी वापरावयाची फिल्म एचडीपीई रिइन्फोर्सड जीओ मेंबरेन 500 मायक्रॉन जाडीची (IS:15351:2008) असावी.
  • शेततळ्याचे खोदकाम, बांधकाम, फिल्म बसविणे वगैरे कामे तांत्रिक स्वरूपाची असल्याने शेतकऱ्यांनी शक्‍यतो या कामातील अनुभवी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावीत.
  • सामूहिक शेततळ्याबाबत संपूर्ण माहिती सांगणारा 3x2 फूट आकाराचा खालील मजकुराचा पक्का बोर्ड शेततळ्याजवळ लावावा.
  • शेततळ्यामध्ये उतरण्यासाठी योग्य आकाराची शिडी असावी. तथापि, बोडी टाईप सामूहिक शेततळ्यामध्ये याची आवश्‍यकता नाही.
  • मॉडेल क्र. 1 च्या शेततळ्यामध्ये पाणी भरण्याची स्वतंत्र सुविधा लाभार्थीने करणे आवश्‍यक आहे. तथापि, पूर्णपणे खोदाई केलेल्या शेततळ्यासाठी व बोडी टाईपच्या शेततळ्यासाठी नैसर्गिक पद्धतीने पाणी वळवून घेण्यात यावे.
  • सामूहिक शेततळ्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरल्यास जास्तीचे पाणी आपोआप वाहून जाण्याची सोय असावी.
  • या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत अनुदान घेतलेले नसावे.
  • सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी शेततळे तयार करण्यासाठी निर्णय घेतल्यानंतर सर्व सभासदांनी संबंधित तालुक्‍याचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोबतच्या विहीत प्रपत्र-1 नुसार अर्ज करून त्यांना सामूहिक शेततळ्यासाठी अनुदान देण्याबाबत विनंती करावी. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यापूर्वी ज्या क्षेत्रावर सामूहिक शेततळे तयार करावयाचे आहे त्या ठिकाणी ट्रायल पीट घ्यावा.
  • अर्जासोबत याबाबतची माहिती, जमिनीच्या मालकीसंबंधी 7/12, 8-अ उतारे व पाणी, जमीन वापराबाबतचा आपसांतील सामंजस्य करार (प्रपत्र-7) रुपये 100/- च्या स्टॅम्पपेपरवरील (नोंदणीकृत) सादर करावा.
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची मंजुरी प्राप्त होताच शेततळ्याचे काम सुरू करावे. सदर काम सुरू केल्यापासून तीन महिन्यांत पूर्ण करावे.
  • शेततळ्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकरीसमूहाने तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे. त्यानंतर संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तालुका कृषी अधिकारी व संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार त्या टप्प्यापर्यंत मंजूर असलेले अनुदान अदायगीसाठी शिफारस करावी.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate