बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य शेती
गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व छोट्या-मोठय़ा तलावांमध्ये मत्स्य बीज सोडून त्याचा बचत गटांमार्फत व्यवसाय करण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यातील कासारे व परिसरातील दहा गावांमध्ये सुरु आहे. या माध्यमातून या गावांतील आदिवासी जमातींनाही रोजगाराचे साधन मिळणार आहे. देशातील अशाप्रकारचा बहुधा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.
हिवरेबाजार व राळेगणसिद्धी या गावांप्रमाणेच पारनेर तालुक्यातील कासारे गावाने पाणलोट क्षेत्रात अभिनव प्रयोग केलेले आहेत. यावर्षीच्या दुष्काळातही या गावाला पाणी टंचाई भेडसावली नाही. या गावाची धडपड पाहून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट (एनआयआरडी) या संस्थेने या गावासह परिसरातील दहा गावांमध्ये बचत गटांमार्फत मत्स्य शेती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कासारे, किन्ही, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या, वारणवाडी, खडकवाडी, कारेगाव व काताळवेढा या गावांमध्ये १२ मोठे तलाव आहेत. यावर्षी या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने तलावांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे एक हेक्टर आकारमानासाठी पाच हजार मासे याप्रमाणे या तलावांमध्ये मत्स्य बीज सोडण्यात आले आहे. यासाठी ‘एनआयआरडी’ने थेट ग्रामपंचायतींना अनुदान पाठविले आहे. सरकार शक्यतो मत्स्य बीज विभागामार्फत अनुदान वाटप करते. परंतु येथे थेट ग्रामपंचायतींना पैसा देण्यात आला.
दहा गावांसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी मत्स्य शेती महिला बचत गटांमार्फत करावी अशी अट मात्र टाकण्यात आली आहे. त्यामुळे या गावांनी १६ बचत गटांकडे तलावांचे व्यवस्थापन सोपविले आहे.
तलावातील मासे वाढल्यानंतर त्यांची विक्री करुन बचत गट उत्पन्न मिळविणार आहेत. साधारण मे महिन्यात हे उत्पादन सुरु होईल. मासे पकडून त्यांची विक्री करण्याचे काम बचत गटांनी या गावांतील आदिवासी जमातींकडे सोपविले आहे. मासे कसे पकडायचे याचे प्रशिक्षणही मुळा धरणावर देण्यात आले आहे. मिळणार्या उत्पन्नापैकी निम्मे पैसे बचत गटांना तर उर्वरित पैसे विक्रीचे काम करणार्यांना असे सूत्र ठरविण्यात आले आहे.
शासनामार्फत पाच हेक्टरहून अधिक आकाराचा पाणीसाठा असलेल्या तलावांमध्येच मत्स्यबीज सोडले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मालकीचे जे छोटे तलाव आहेत त्याचा वापर मत्स्य शेतीसाठी होत नव्हता. या प्रयोगामुळे आता छोट्या तलावांतही ही शेती करता येणार आहे. यामुळे तलावातील पाणी उपशावरही आपोआप नियंत्रण येणार आहे. गावातील महिलाच आता या तलावांच्या सुरक्षा रक्षक बनून पाण्याची काळजी घेत आहेत. या गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची इतरत्रही व्याप्ती वाढणार आहे. कासारेचे सरपंच धोंडिभाऊ दातीर यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला आहे.
गावांनी पाणलोटक्षेत्र विकास करुन पाणी अडविले तर मत्स्य शेतीही गावाच्या उत्पन्नाचे मोठे साधन होऊ शकते, हा संदेश या प्रयोगातून जाणार आहे. बचत गटांची चळवळ सुरु झाली त्यावेळी पहिला बचत गट कासारे गावात स्थापन झाला होता. आता मत्स्य शेतीसाठीही आमच्या गावातील बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.
- धोंडिभाऊ दातीर,
सरपंच, कासारे
अंतिम सुधारित : 7/3/2020
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद...
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...