रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी 20 ते 30 सें.मी. असावी व त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे 800 तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर 25 सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा व दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील, अशी काळजी घ्यावी. सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून 30 दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशा वेळी लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत.
लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली, हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो, तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकास काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत, असे समजावे. प्रति हेक्टरी सुमारे 15 टन रताळी मिळतात.
- मोहन कदम, नांदगाव, जि. नाशिक
संपर्क - 02385-280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्य...
प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात...
छोटा नागपूरचा विस्तार पश्चिम बंगालच्या पश्चिमे पर्...