सोयाबीन हे आपल्याकडील महत्त्वाचे तेलबिया पीक. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राष्ट्रीय सोयाबीन संचालनालय कार्यरत आहेत. या संचालनालयाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाच्या विविध जाती, पीकपद्धती, उत्पादनवाढ आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत संशोधन केले जाते. संचालनालयाने देशातील प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार विविध जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये अधिक उत्पादनक्षम, तेलाचे अधिक प्रमाण असलेल्या जातींची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने पेंडीच्या गुणवत्तेवरही संशोधन करण्यात येत आहे.
येथील संशोधकांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंब, आंतरपीक पद्धती, सुधारित लागवड तंत्राबरोबरीने एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धती विकसित केली आहे. विविध चर्चासत्रे, शिवारफेरीच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रसार देशभर करण्यात येतो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. केवळ उत्पादनवाढीवर न थांबता, सोयाबीनपासून विविध पदार्थनिर्मितीबाबतही संचालनालयाने संशोधन केले आहे.
संचालनालयाच्या माध्यमातून देशातील सोयाबीनच्या जातींचा संग्रह करण्यात आला आहे. या जाती नवीन जातींच्या संशोधनासाठी वापरण्यात येत आहेत. रोगप्रतिकारक्षम जातींची निर्मिती करण्यात येत आहे. प्रक्रिया उद्योगाची मागणी लक्षात घेऊन जातींची निर्मिती करण्यात येत आहे. मजुरांची कमतरता लक्षात घेऊन यांत्रिक पेरणी, मळणी यंत्राबाबतही संशोधन करण्यात आले आहे. बीजोत्पादन, एकात्मिक कीड, रोगनियंत्रण, प्रक्रिया उद्योगाबाबत संचालनालयातर्फे विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात येतात. संचालनालयाच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी पीक व्यवस्थापन सल्ला, तसेच हवामान सल्लाही देण्यात येतो. याचबरोबरीने संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबत...