অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता

65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता

ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबतच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता व्हावी या उद्देशाने कृषी विज्ञान शेतकरी मंडळ कान्हेरी सरप (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सोयाबीन, हरभरा बियाणे उत्पादकतेची सुरवात केली. खरीप व रब्‍बी हंगामात प्रत्येकी 50 एकर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम या मंडळाच्या वतीने राबविला जातो.

कृषी विज्ञान शेतकरी मंडळाची वाटचाल

कान्हेरी सरप येथील मधुकर पाटील सरप यांचे वय आज 65 वर्षाचे आहे. सेंद्रीय शेतीचा आदर्श जपणाऱ्या मधुकर पाटलांना त्यांच्या या क्षेत्रातील कार्याबद्दल शासनाने कृषीभूषण पुरस्काराने गौरविले. त्यासोबतच अनेक सामाजिक संस्थांनी देखील त्यांचा विविध व्यासपीठांवर गौरव केला. त्यांच्याच पुढाकाराने कृषी विज्ञान शेतकरी मंडळाची संकल्पना प्रत्यक्षात आली. शासनाच्या वतीने ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. बिजोत्पादक शेतकऱ्यांना 1000 रुपये तर विक्री केल्यास प्रमाणित बियाण्यांसाठी 1500 रुपये प्रती क्‍विंटलचे अनुदान या कार्यक्रमांतर्गत दिले जाते. कान्हेरी परिसरातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ व्हावा या उद्देशाने त्यांनी ग्राम बिजोत्पादनास सुरवात केली. 2011 साली या मंडळाची उभारणी करण्यात आली. मधुकर पाटील या मंडळाचे सचिव आहेत. हरिदास पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष गोपाळराव शेळके तर सदस्यांमध्ये दिपक सरप, निवृत्ती पाटील, शंकर इंगळे, गजानन पाटील, रत्नप्रभा सरप, उषाताई पाटील यांचा समावेश आहे. मंडळातील सदस्यांच्या शेतावर देखील बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला जातो. एकरी 9 ते 10 क्‍विंटल सोयाबीन तर सात ते आठ क्‍विंटल हरभऱ्याची उत्पादकता होते.

बियाण्यावर होते प्रक्रीया

सोयाबीन ‘एम.ए.यु.एस-71’ पायाभूत बियाणे, जेएस-9305 पायाभूत बियाणे, एम.ए.यु.एस.158 प्रमाणीत बियाणे आज त्यांच्या मंडळाकडे उपलब्ध आहे. हरभऱ्यामध्ये जॅकी 9128 या वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम राहतो. या वाणाला मागणी अधिक राहत असल्याच्या परिणामी याच बियाण्यांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यावर भर राहतो, असे मधुकर पाटील सांगतात. बिजोत्पादन कार्यक्रमात 15 शेतकरी दरवर्षी सहभागी होतात. त्यांच्या माध्यमातून तयार झालेले बियाण्यावर स्थानिक खासगी कारखान्यात प्रक्रीया केली जाते. त्यावर क्‍विंटलमागे 415 रुपयांचा प्रक्रीया खर्च होतो. बिजोत्पादक शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा मंडळाद्वारे होतो. बाजारभावानुसार त्यांच्याकडून त्यासाठी पैशाची आकारणी होते. मंडळाला अनुदानाची रक्‍कम कृषी विभागाकडून धनादेशाद्वारे मिळताच तो धनादेश मंडळाच्या खात्यात वटविण्यासाठी टाकला जातो. त्यानंतर त्या रकमेचे बिजोत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार अनुदानाचे वाटप होते. अनुदानातील एकूण रकमेपैकी 100 रुपये मंडळाच्या खात्यात जमा केले जाते. मंडळाच्या वतीने बियाणे विक्री व इतर प्रशासकीय कामासाठी लागणाऱ्या निधीची सोय यातून होते, अशी माहिती मधुकर पाटील यांनी दिली.

बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे मिळते सहकार्य

बिजोत्पादन कार्यक्रम राबविताना महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा सातत्याने वॉच राहतो. त्यांच्याच माध्यमातून बियाणे विक्रीकामी लागणाऱ्या पिशव्यांना मंजूरी मिळते. त्यावरील टॅंग, सिलचे काम देखील यंत्रणेच्याच निगराणीत होते. त्यामुळे बियाण्यांचा दर्जा राखावाच लागतो. त्याशिवाय संबंधीत यंत्रणेचे अधिकारी बियाण्याला पासच करीत नाहीत, असे त्यांनी सांगीतले. सोयाबीनच्या एका बियाण्याची बॅंग ही 30 किलो वजनाची राहते. एका एकरासाठीचे हे बियाणे आहे. हरभऱ्याची बियाणे बॅग देखील 30 किलो वजनाचीच असते. बियाणे विक्रीची एक पिशवी छापण्यासाठी 12 ते 15 रुपयांचा खर्च होतो. कच्च्या बियाण्याच्या वजनाच्या तुलनेत दहा टक्‍के कमी पिशव्या छापल्या जातात. लो ग्रेड बियाणे दहा टक्‍के सरासरी निघत असल्याने त्या आधारेच पिशव्यांची संख्या ठरविली जाते, असे त्यांनी सांगीतले.

अकोला जिल्ह्यात केवळ दोनच मंडळ

बिजोत्पादकांची मोठी संख्या अकोल्यालगत असलेल्या वाशीम जिल्ह्यात आहे. या भागात तब्बल दहा शेतकरी मंडळाच्या माध्यमातून बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. परंतू अकोला जिल्ह्यात बिजोत्पादक शेतकरी मंडळांची संख्या अवघी दोन आहे. त्यामध्ये मधुकर पाटील यांच्या एक तर अकोला तालुक्‍यातील एका मंडळाचा समावेश आहे. त्यावरुनच त्यांच्या उद्यमशीलतेचा परिचय मिळतो. या पुढील काळात बियाणे प्रक्रीयेकामी लागणारा प्लॅंट उभारणीचा त्यांचा मानस आहे. कृषी विज्ञान शेतकरी मंडळाची धर्मदाय आयुक्‍तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. सहकारी संस्था कायद्यानुसारच या मंडळाचे कामकाज चालते. मंडळाला आपला आर्थिक लेखाजोखा ठेवावा लागतो. त्यासोबतच दरवर्षी ऑडीट करणे देखील बंधनकारक राहते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमीतता होण्याचा प्रश्‍नच राहत नाही. सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी देखील त्यांच्याव्दारे ग्रामस्थांना मार्गदर्शन मिळते.

सिमीतर ऑरगॅनीक कंपनी मुंबई शेतकऱ्यांच्या शेताचे प्रमाणीकरणासाठी देखील ते मार्गदर्शन करतात. याच कंपनीला प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून आपले तीन एकर शेत त्यांनी करारावर दिले आहे. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा असा उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. या कामी पत्नी रत्नप्रभा त्यासोबतच मुलगा योगेश आणि दीपक यांचे देखील सहकार्य मिळते. त्यांची मुलगी सुलभा हिने कृषी अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी. केले आहे. महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयातील ग्रंथालयाची वाढ आणि विकास या विषयावर त्यांचा मुलगा योगेश यांचे पी.एच.डी. सुरु आहे. शेतीचा व्यासंग जपणाऱ्या मधुकर पाटलांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षीत केले. त्यांचा मोठा मुलगा दीपक याचा गावातच वेल्डींग व्यवसाय आहे. अशाप्रकारे त्यांनी मुलांमध्ये शिक्षणासोबतच उद्यमशीलतेचे देखील बीज रोवले. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे... याच आशावादी विचारातून 65 वर्षाच्या या तरुण शेतकऱ्याची वाटचाल सुरु आहे. हातावर हात धरुन बसणाऱ्या निराशावादी शेतकऱ्यांसाठी निश्‍चीतच ते नवा आशावाद आहेत !
(सरप 9923584366)

शब्दांकन : चैताली बाळू नानोटे
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/11/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate