অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पट्टा पद्धतीने सोयाबीन पिक

पट्टा पद्धतीच्या सोयाबीन पिकातून एकरी पाच क्विंटल उत्पादनवाढ

पट्टा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास बियाणे बचतीबरोबर प्रभावी पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण असे विविध फायदे होतातच. शिवाय एकरी उत्पादनातही चांगली वाढ होते, असे अमरावती येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मागील खरिपात शेतकऱ्यांच्या शेतात केलेल्या प्रयोगांत आढळले आहे. या शेतकऱ्यांना एकरी सरासरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन अधिक मिळाले आहे. 
हाराष्ट्रात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. मागील वर्षी राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना 
दुष्काळाला सामोरे जावे लागले. मात्र मध्यम खोल जमिनीत ज्या ठिकाणी सप्टेंबर अखेरपर्यंत मुबलक पाऊस झाला अशा ठिकाणी प्रति एकर मिळालेल्या उत्पादनाची आकडेवारी पाहता स्थिती आशादायक आढळली आहे. अशा भागांत शेतकऱ्यांना एकरी पाच- सहा क्विंटल पासून आठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. याउलट खोल भारी जमिनीत ज्या ठिकाणी सप्टेंबर अखेरपर्यंत मुबलक पाऊस झाला अशा ठिकाणी मात्र तेवढे चांगले चित्र नसून सर्वसाधारण एकरी उत्पादकता दीड ते तीन क्विंटलपासून चार ते साडेपाच क्विंटलपर्यंत दिसली आहे. खोल, भारी जमिनीतील कमी उत्पादकतेची कारणमीमांसा केल्यास असे दिसून येते, की सततच्या पावसामुळे आंतरमशागतीची कामे वेळेत होऊ शकली नाहीत. जमिनीतील अति जास्त ओलीमुळे मुळांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. तसेच पीक संरक्षणाच्या उपाययोजना वेळेत होऊ शकल्या नाहीत. याउलट मध्यम खोल जमिनीत पाण्याचा योग्य निचरा झाला. त्यामुळे पिकाला वाढीच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत ओलावा मिळाला. (सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाणा पक्व होईपर्यंत जमिनीत ओल असल्यामुळे) उत्पादनाचा प्रत व दर्जा चांगला मिळून उत्पादनातही वाढ झाली. 

अमरावतीच्या कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अमरावती व वाशीम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन पिकाची पट्टा पद्धतीने लागवड करण्याच्या संदर्भात मागील वर्षी प्रयोग केले. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आले आहेत. शेतकऱ्यांना प्रचलित पद्धतीने मिळणाऱ्या एकरी उत्पादनात सुमारे पाच क्विंटलची वाढ आढळली आहे. या प्रयोगाचे त्यांना दिलेले तंत्रज्ञान थोडक्‍यात असे. 

सोयाबीन पिकाच्या हंगामादरम्यान पावसाच्या पाण्याचे वितरण या बाबीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लागवड मध्यम खोल अथवा भारी खोल जमिनीत असो, पाऊस जास्त पडो अथवा कमी, पावसाच्या पाण्याचे वितरण योग्य असो वा अयोग्य कोरडवाहू परिस्थितीतही सोयाबीनची उत्पादकता चांगली मिळायला हवी. पिकाची सलग लागवड करताना प्रति एकर झाडांची संख्या सुमारे एक लाख 77 हजार 777 पर्यंत राखली जाते. (45 सें.मी. x 5 सें.मी. लागवडीच्या अंतरानुसार प्रति एकर 30 किलो बियाणे वापरल्यास) 
कारण संपलेल्या सोयाबीन पिकाच्या हंगामातील सर्वसाधारण परिस्थितीत कोरडवाहू भागात प्रति एकर लागवड खर्चात झालेली वाढ बघता उत्पादकता वाढवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब फायद्याचा ठरल्याचे शेतकऱ्यांकडील केलेल्या प्रयोगांच्या आधारे स्पष्ट झाले आहे. कोरडवाहू परिस्थितीत प्रचलित पद्धतीने सोयाबीन पिकाची मिळालेली उत्पादकता पट्टा पद्धतीपेक्षा बरीच कमी असल्याचे प्रयोगांतून दिसून आले. 

कोरडवाहू परिस्थितीत सलग सोयाबीन लागवडीकरिता असे पट्टा पद्धतीचे तंत्र वापरण्यात आले. 

लागवडीचे अंतर प्रचलित पद्धतीप्रमाणेच ठेवावे. मात्र प्रत्येक तीन ओळीनंतर एक ओळ वा सरी (तीन फुटांची) खाली ठेवावी. अशा प्रकारे संपूर्ण शेतात प्रत्येक चौथी ओळ खाली राखली जाईल. खाली सोडलेल्या चौथ्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी (कोळपणी), डवरणी आटोपल्याबरोबर केवळ एक डवरा ठेवून व त्याच्या जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून सरी (गाळ अथवा दांड अथवा सारणी) पाडून घ्यावी. अशा प्रकारे प्रत्येक चौथ्या ओळीच्या ठिकाणी सरी पाडून घेतल्यास सोयाबीनच्या तीन ओळी-सरी वा पट्टा व पुन्हा पिकाच्या तीन ओळी असे चित्र तयार होऊन सोयाबीनचे पीक गादीवाफ्यावर येते. यालाच पट्टा पद्धत म्हणतात. 

त्याचे फायदे असे मिळाले.


1) बियाण्याचे प्रमाणे कमी लागते (प्रति एकर 22 किलो बियाणे लागते.) 
2) बियाणे खर्चात बचत होते. (आठ किलो बियाण्याचा खर्च वाचतो) 
3) लागवड खर्चात बचत होते. (कमी वेळेत जास्त लागवड शक्‍य होते.) 
4) शेतात मोकळी जागा निर्माण होते. (किडी, अळ्या व रोग यांचे निरीक्षण व नियंत्रण सुलभ होते.) 
5) फवारणी सुलभ होते. 
6) अळ्यांचा प्रादुर्भाव कमी (अळ्या एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात जाण्यासाठी नालीचा अडथळा असल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमीच राहतो.) 
7) शेतात हवा खेळती राहते (बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.) 
8) सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग होतो. (प्रकाश संश्‍लेषणाच्या क्रियेकरिता) सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोचण्यास मदत होते. 
9) ओलित व्यवस्थापन करणे शक्‍य होते. (ओलिताची सोय असल्यास सरींच्या माध्यमातून पाटपाणी अथवा स्प्रिंकलरची सोय असल्यास सरीचा उपयोग स्प्रिंकलर पाइप टाकण्यासाठी होतो.) 
10) बॉर्डर इफेक्‍ट मिळतो. (गादीवाफ्यावरील काठावरच्या दोन्ही ओळींना मुबलक हवा, अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. या ओळीतील झाडांना पसरण्यासाठी मोकळी जागा मिळाल्यामुळे शेंगांचा लाग जास्त प्रमाणात असतो) 
11) पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन होते. (डवरणीपश्‍चात शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते व जिरते.) साहजिकच सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाणा पक्व होईपर्यंत जमिनीतील ओल टिकून राहते. उत्पादनात मोठी वाढ शक्‍य होते.) 

पट्टा पद्धतीचे महत्त्व


पट्टा पद्धतीने सोयाबीनची लागवड करताना प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवावी लागते. म्हणजेच 25 टक्के ओळींची संख्या कमी होते. म्हणजे आपसूकच 25 टक्के झाडांची संख्या कमी होते. अशा प्रकारे प्रचलित पद्धतीने लागवड करताना राखल्या जाणाऱ्या 1,77,777 एवढ्या झाडांच्या संख्येऐवजी 1,33,333 एवढी संख्या पट्टा पद्धतीत ठेवली जाते. तरीही पट्टा पद्धतीच्या लागवडीतून उत्पादनात चांगली वाढ शक्‍य होते.

प्रा. जितेंद्र दुर्गे, 9403306067 
(श्री. दुर्गे व श्री. शिंदे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे तर श्री. डिके
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate