हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेच्या वतीने अन्न आणि पोषकता मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने दोन आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पाची आखणी केली आहे. त्यामध्ये दुर्लक्षित असलेल्या आणि उच्च पोषकता मूल्ये असलेल्या पिकांच्या विकसनासाठी तीन वर्षांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 225 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका निधी देण्यात येणार आहे.
संशोधन आणि विस्ताराचे दोन प्रकल्प जुलै 2012 पासून सुरू करण्यात आले असले तरी त्यांचे औपचारिक उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. त्या प्रसंगी बोलताना इक्रिसॅट संस्थेचे महासंचालक डॉ. विल्यम दर म्हणाले, की 2050 या वर्षापर्यंत जगाची लोकसंख्या नऊ अब्जांपेक्षा अधिक होणार असून, सद्यःस्थितीतील पीक उत्पादकतेमध्ये सुमारे 70 टक्क्यांनी वाढ करण्याची आवश्यकता असणार आहे. त्यामध्ये तापमान बदल आणि पीकवाढीसाठी उपलब्ध स्रोतांची कमतरता या अडचणी असून भविष्यातील गरिबी आणि भूक यांचा सामना करण्यासाठी प्रयत्नांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे.
कडधान्ये ही माणसांसाठी पोषक घटक पुरवतात. मांसातून उपलब्ध होणाऱ्या पोषक घटकांच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने गरिबांसाठी, विशेषतः बालकुपोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. शाश्वत शेतीमध्ये पिके आणि पशुधन सांभाळणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकल्पामध्ये जगभरातील संशोधक एकत्रितरीत्या संशोधन करणार असून कडधान्ये आणि कोरडवाहू तृणधान्ये यांच्या विकासासाठी, वापरासाठी आणि लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
कडधान्ये विषयात कार्यरत असलेल्या भागीदारांसह तीव्र वातावरण आणि कोरडवाहू पद्धतीच्या प्रदेशात अन्न सुरक्षितता वाढविण्यासोबतच पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- डॉ. रूबेन इचेवेर्रिया, महासंचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रॉपिकल ऍग्रिकल्चर (CIAT)
कोरडवाहू तृणधान्ये आणि कडधान्ये ही पोषक आणि अवर्षण सहनशील पिके आहेत. या दोन्हींच्या एकत्रीकरणातून चांगल्या दर्जाचा आहार तयार करणे शक्य आहे. त्यातून अल्प भूधारक शेतकरी उत्पादकता वाढ मिळवून पोषकतेच्या दृष्टीने अन्नसुरक्षितता मिळवू शकतील. त्यातून त्यांचे जीवनमान सुधारण्यास वाव मिळणार आहे.
- डॉ. महम्मद सोल्ह, महासंचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन ड्राय एरियाज (ICARDA)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या...
सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील ना...
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्य...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...