सूर्यफूल पिकावर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम होत नाही, त्यामुळे हे पीक कोणत्याही हंगामात तसेच कोणत्याही कालावधीत घेता येते. सूर्यफूल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत येणारे, कमी पाण्यावर येणारे पीक असून, त्याच्या अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा.
जमीन - सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत - जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
पेरणीची वेळ - रब्बीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पेरणी करण्याची शिफारस आहे. मात्र आपत्कालीन स्थितीत व संरक्षित सिंचनाची व्यवस्था असल्यास शिफारशीत वेळेनंतरही रब्बीची पेरणी करता येते. उत्पादनावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही.
पेरणीचे अंतर
मध्यम ते खोल जमीन - 45 x 30 सें.मी.,
भारी जमीन - 60 x 30 सें.मी.,
संकरित वाण - 60 x 30 सें.मी.
पेरणी पद्धत
- जिरायती सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते.
- बियाणे 5 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.
- पेरणीनंतर पाणी देण्याच्या दृष्टीने सारे पाडून घ्यावेत.
- बागायती पिकाची लागवड सरी, वरंबा वरंब्यावर टोकण पद्धतीने केल्यास फायद्याचे ठरते.
बियाणे - सूर्यफुलाचे पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8-10 किलो तर संकरित वाणाचे 5-6 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
सूर्यफूल पिकाचे वाण
compose/8--12-2014/agr- cs6 page 1.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी, प्रति किलो बियाण्यांसाठी.
- मर रोग प्रतिबंधासाठी - 2 ते 2.5 ग्रॅम थायरम
- केवडा रोग प्रतिबंधासाठी - 6 ग्रॅम मेटॅलॅक्झील (35 एसडी)
- विषाणूजन्य नेक्रॉसीस रोगाच्या प्रतिबंधासाठी - इमिडाक्लोप्रिड (70 डब्ल्यू.ए.) 5 ग्रॅम. (बियाण्याला संबंधित कीटकनाशकाची प्रक्रिया केली आहे का, याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर या संबंधी उल्लेख दिलेला असतो.)
- शिफारशीत कालावधीनंतर ऍझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत 25 ग्रॅम.
रासायनिक खते
- हेक्टरी 2.5 टन शेणखत अथवा गावखत.
- बागायती पिकास हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे व उरलेल्या 30 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.
- गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
आंतरमशागत
- पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवून विरळणी करावी.
- पेरणीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी करावी.
- तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 35 ते 40 दिवसांनी करावी
पाणी व्यवस्थापन
- सूर्यफुलाच्या पिकास रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
- फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
चौकट - compose/8--12-2014/agr- cs6 page 1.
पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पाणी पाळ्यांचे व्यवस्थापन -
पीक संरक्षण
- विषाणूजन्य रोगाचा प्रसार रसशोषक फुलकिड्यांमार्फत होतो. फुलकिडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (200 एस.एल.) 3 ते 5 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात.
- मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी - डायमिथोएट (30 प्रवाही) 20 मि. लि. प्रति 10 लिटर या प्रमाणात फवारावे.
- हेलिकाव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी) नियंत्रणासाठी - प्रोफेनोफॉस (50 ईसी) 20 मिली प्रति 10 लिटर किंवा क्विनॉलफॉस (36 टक्के प्रवाही) 15 मि.लि. प्रति 10 लिटर किंवा थायामेथोक्झाम (25 टक्के डब्ल्यूजी) 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
- केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा किंवा कार्बारिल (10 टक्के भुकटी) 25 किलो प्रति हेक्टरी वारा शांत असताना धुरळावी.
जैविक किड नियंत्रण - सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एचएनपीव्ही या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
काढणी - सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळताना नंतर मळणी करावी.
उत्पादन - बागायती सूर्यफुलापासून प्रतिहेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.
उत्पादनवाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स
- पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा. कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
- सूर्यफुलाच्या फूल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते.
- सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. दर वर्षी एका जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडतो, तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी 3 वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
- परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी 4-5 मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात. पीक फुलोऱ्यात असताना कीटकनाशकांची फवारणी करू नये. त्यामध्ये मधमाश्यांची क्रियाशीलता कमी होते. अगदीच आवश्यक असेल तरच कीटकनाशकांची संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी.
- सूर्यफुलाचे पीक थोड्या क्षेत्रावर अथवा विलग घेतल्याने पक्ष्यांपासून जास्त नुकसान होते. सूर्यफुलाचे पीक शक्यतोवर मोठ्या क्षेत्रात सलग घ्यावे.
- जागतिक पातळीवर खाद्यतेल उत्पादनामध्ये भुईमूगानंतर सूर्यफूल हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- सूर्यफुलाच्या बियांमध्ये 35 ते 45 टक्के तेलाचे प्रमाण असते.
- या तेलामध्ये असलेले 68 टक्के लिनोलीक आम्ल रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून, उत्तम रक्ताभिसरणाकरिता उपयुक्त ठरते. त्यामुळे हृदयरोगी व्यक्तींच्या आहारात सूर्यफुलाचे तेल आवश्यक आहे.
डॉ. अनिल राजगुरू, 9421952324
(विभागीय संशोधन केंद्र, सोलापूर)
स्त्रोत: अग्रोवन