आंतरपीक पद्धतीनुसार करा तूर लागवड
तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. सुधारित अंतराने लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा द्यावी.
विविध पिकांसोबतच्या आंतरपीक पद्धतीत तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी 165 ते 190 दिवस कालावधीत तयार होणाऱ्या आशा, बी.एस.एम.आर. 736, मोराती, बी.एस.एम.आर. 853, पीकेव्ही तारा, एकेरी 8811 आणि विपुला या वाणांची निवड करावी.
1) ऑक्टोबर आणि त्यापुढे पाऊस न आल्यास किंवा कमी आल्यास मध्यम आणि हलक्या जमिनीवर तुरीला फुलोऱ्यानंतर पाण्याचा ताण पडतो. त्याचा उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अशा ठिकाणी 135 ते 150 दिवसांत तयार होणाऱ्या वाणांची लागवड करावी. साधारणपणे आपल्याकडे 125 ते 130 दिवसांत तयार होणारे आय.सी.पी.एल. 87 (प्रगती), टी.एटी.-10 आणि टी विशाखा-1 हे वाण विकसित करण्यात आले आहेत. ए.केटी. 8811 हा वाण पाऊसमानाप्रमाणे 145 ते 165 दिवसांत तयार होतो. कमी पाऊस झाल्यास याचे 135 ते 140 दिवसांत उत्पादन मिळते. असे वाण मध्यम ते हलक्या जमिनीत लागवडीसाठी वापरावेत.
2) यवतमाळ, वर्धा, अमरावती या भागांत पश्चिम विदर्भापेक्षा पाऊसमान जास्त आहे. त्यामुळे येथील भारी पिकाऊ जमिनीत आशा, सी-11, बीएसएमआर 736, तर मध्यम जमिनीत --------मारोती---------, बीडीएन 708 तारा, विपुला या वाणांची लागवड करावी. या भागात लवकर येणारे वाण फुलोऱ्याचे काळात ढगाळ वातावरणाला बळी पडतात.
3) विदर्भातील काळ्या जमिनी जास्त पावसामुळे चिबड बनतात. उताराकडील भागात पाणी साचल्यामुळे पिकाची हानी होते. तूर पिकांत पाणी साचल्यास वाढ खुंटते, पाने गळतात. पर्यायाने वाढीवर परिणाम होऊन उत्पन्न कमी येते. हळव्या वाणांचा फुलोऱ्यावर येण्याचा काळ लवकर असल्यामुळे त्यांच्यामध्ये हा परिणाम जास्त प्रमाणात दिसतो. अशा ठिकाणी जास्त पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित बांध बंदिस्ती होणे गरजेचे आहे.
4) जमिनीचा चिबडपणा कमी होण्यासाठी पेरणीपूर्वी सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. सेंद्रिय खतांची कमतरता लक्षात घेता शेतात निंदणाचा, तसेच इतर काडीकचरा आणि पालापाचोळा जमिनीतच कुजवण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
5) तुरीच्या पेरणीसाठी सरी ओरंबा पद्धतीचा अवलंब करून बी सरीवर टोकल्यास सपाट पेरणीपेक्षा सुमारे 15 टक्के जादा उत्पन्न मिळते असे प्रयोगांत आढळले आहे. चिबड जमिनीत ओरंब्यावर उगवलेल्या रोपांच्या मुळांना अतिपावसामुळे हानी होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ओरंब्यावरची पेरणी जास्त उपयुक्त ठरते.
6) घरचे बियाणे पेरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी. त्यासाठी कुंडीमध्ये 100 किंवा 200 बी मोजून मातीने झाकावे. त्याला चार ते पाच दिवस ओले राहण्याकरिता रोज पाणी घालावे. सहा दिवसांनंतर उगवलेल्या बिया मोजून उगवण्याची टक्केवारी काढावी. अशाचप्रकारे टीपकागदामध्ये (ब्लॉटिंग पेपर) किंवा ओल्या कापडामध्ये उगवणशक्ती मोजता येईल. उगवण शक्ती 80 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात बियाण्याचे प्रमाण पेरताना वाढवावे.
7) बियाणे पेरण्यापूर्वी थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेमुळे रोगाला आळा बसतो आणि उगवण चांगली होऊन रोपांची जोमदार वाढ होते.
8) रासायनिक बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम जिवाणू संवर्धक आणि स्फुरद विरघविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक लावल्यानंतर ते बियाणे त्याच दिवशी थोडे सुकवून पेरणीस वापरावे.
9) तुरीला माती परीक्षणानुसार पेरणीपूर्वी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 40 कि. स्फुरद द्यावे. -----रायझेमीयम-------- आणि पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यास नत्र, स्फुरदाची मात्रा 50 टक्के दिली तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही. असे प्रयोगात दिसून आले आहे. माती परीक्षणात गंधक आणि जस्ताची कमतरता आढळल्यास नत्र आणि स्फुरदयुक्त खतासोबत हेक्टरी 20 किलो गंधक आणि दोन ते पाच किलो झिंक सल्फेट द्यावे. नत्राची मात्रा अमोनिअम सल्फेटद्वारा आणि स्फुरद खताची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दिल्यास गंधकाची मात्रा या दोन्ही खतांद्वारे मिळू शकते. तसे केल्यास वेगळे गंधक देण्याची गरज नाही.
पेरणीचे नियोजन
1) तुरीच्या पिकाची वाढ ही पेरणी केव्हा झाली यावर अवलंबून असते. सर्वसाधारण परिस्थितीत तुरीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी पेरणी जितकी लवकर होईल तितकी तुरीच्या झाडाची वाढ जास्त होते. जून, जुलैच्या पावसावर ते पीक जोरदार वाढते.
2) सलग तूर पेरणीसाठी दोन ओळींतील आणि दोन झाडांतील अंतर ठरविणे गरजेचे आहे. त्यामुळे बियाण्याचे योग्य प्रमाण वापरून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
3) जुलैच्या प्रथम आठवड्यातील पेरणीसाठी लवकर तयार होणाऱ्या आय.सी.पी.एल. 87 किंवा टीएटी-10 सारख्या वाणांची 45 x10 सें.मी. अंतराने पेरणी करावी. एकेटी 8811, बीडीएन 708, पीकेव्ही तारा, विपुला, बीएसएमआर 853 या वाणांची 90x20 किंवा 60x30 सें.मी. अंतराने पेरणी करावी. आशा, सी 11 आणि बीएसएमआर 736 या वाणांची 60 x 60 सें.मी. किंवा 120 x 30 सें.मी.वर पेरण्याची शिफारस आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये जोडीदार पिकांच्या ओळीच्या प्रमाणावर ओळीतील अंतर अवलंबून राहील. दोन झाडांतील अंतर पेरणीची वेळ आणि जमिनीच्या सुपीकतेचा विचार करून ठरवावे.
4) पीक पेरणीपासून सुमारे 90 ते 110 दिवसांपर्यंत तणमुक्त असावे. आंतरमशागतीमुळे जमिनीत हवा खेळती राहते. उपलब्ध पर्जन्यमानाप्रमाणे जलसंवर्धन होते आणि त्याद्वारे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पन्न चांगले येते. विशेषतः मूग, उडीद किंवा सोयाबीनसारख्या अल्पमुदतीच्या आंतरपिकांची कापणी झाल्यावर आंतरमशागत करून तुरीच्या ओळीतील जमीन भुसभुशीत राहील याची काळजी घ्यावी. शक्य तेथे तुरीला मातीची भर देण्यासाठी कोळप्याच्या दात्यांना दोरी बांधून ओळीतील झाडांना भर देता येईल. त्याद्वारे डवरणीनंतर सरी ओरंबा तयार होतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्वचित प्रसंगी पाऊस काही भागात पडण्याची शक्यता असते. त्याचे या सरीमध्ये संवर्धन होईल. जास्त झाल्यास सरीद्वारे निचरा होण्यास मदत होईल. पाऊस नसल्यास या सऱ्या उपलब्ध असल्यास ओलीत करण्यासदेखील उपयोगी असतील.
5) तूर पिकाला फुलोऱ्याच्या काळात जमिनीत योग्य ओलावा असणे फायदेशीर ठरते. पाण्याचा ताण पडल्यास फुलोऱ्यावर आणि शेंगांच्या वाढीच्या अवस्थेत एक किंवा दोन ओळींत केल्यास सुमारे 30 ते 52 टक्के उत्पादन वाढते असे प्रयोगात आढळले आहे.
संपर्क : डॉ. वंजारी : 9921811499
(लेखक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत होते.)
डॉ. केशव वंजारी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन