অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करडई

करडई

करडई ही वर्षायू वनस्पती अ‍ॅस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरथॅमस टिंक्टोरियस असे आहे. या वनस्पतीचे मूलस्थान अ‍ॅबिसिनियाचा डोंगराळ प्रदेश व अफगाणिस्तान असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. फुलांपासून मिळणार्‍या लाल रंगाकरिता बहुतेक पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांत या वनस्पतीची लागवड करतात. भारतात जवळजवळ सर्व राज्यांत करडईची लागवड बियांतील तेलाकरिता केली जाते. या बियांपासून प्रामुख्याने खाद्यतेल मिळवितात. फुलो-यासह करडई वनस्पती करडईचे झुडूप ३०-६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, एकाआड एक, लांबट व बिनदेठाची असून कडांवर मऊ काटे असतात. फुलोरा स्तबक प्रकारचा असतो. तो पिवळा, नारिंगी वा लाल असून तो फांद्यांच्या टोकाशी येतो. एका फुलोर्‍यात १५-२० फुले असतात. फळे मऊ, लांबट व चौधारी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते.

करडईची पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात. प्राचीन काळी करडईची लागवड तिच्या बियांमधील कॅरथॅमीन हा रंजक पदार्थ मिळविण्यासाठी केली जात असे. त्याचा वापर खाद्यपदार्थांना रंग व चव येण्यासाठी करीत असत. प्राचीन ईजिप्शियन राजघराण्यातील ममीवरच्या कपड्यांना हाच रंग दिलेला आहे, हे रासायनिक चाचणीत सिद्ध झाले आहे. हल्ली करडईची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते.

करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन, परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात. करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात. ही आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सूर्यफूल, सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासूनही मार्गारीन (एक प्रकारचे लोणी) तयार करतात.

 

लेखक: मनिषा कुर्‍हाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate