लातूर जिल्ह्यातील चिलवंतवाडी येथील मुकेश मरे यांनी अत्यंत संघर्ष करीत शेतीत आपली वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे. गळीत धान्यापासून तेलप्रक्रियेचा व्यवसाय ते करतात. आपल्या गटातील सदस्यांसह अन्य शेतकऱ्यांनाही ते व्यवसायाचा फायदा करून देतात. शेतीला पूरक ठरलेला हा व्यवसाय
दोन पैसे अधिक मिळवून देणारा ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पूर्वीपासून असेच होत आले आहे. "काखेत कळसा अन् गावाला वळसा'. आमच्यापाशी सर्व काही असते, पण बाहेरचे कोणी तरी आपल्यातील हरवलेला आत्मविश्वास शोधून देतो. "अरे, खरंच तो माझ्याकडे होता की!' असे मग त्या वेळी वाटून जाते. शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे बरेचसे असेच आहे. हा उद्योग करण्याची क्षमता अनेक शेतकऱ्यांत असते. मात्र आत्मविश्वासाचा काही वेळा अभाव असतो. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग मागे पडण्याचे कारण हेच, की जिथे कच्चा माल पिकतो तिथेच त्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केले जात नाही. शेतकऱ्याने कितीही घाम गाळला तरी त्याच्या मालाला योग्य मोबदला मिळत नाही. जर त्याला बाहेरच्या "मार्केट"ची ओळख करून दिली, शेतमाल प्रक्रियेसाठी त्याला प्रोत्साहित केले तर तो उत्तम प्रकारे हा उद्योग करून अधिकचे चार पैसे कमवू शकतो.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जेमतेम हजारएक लोकवस्तीचे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेलगत चिलवंतवाडी गाव आहे. पूर्वी येथे कृषी विभागाच्या मदतीने जागृती कृषी विज्ञान मंडळाची स्थापना झाली. त्यामार्फत गावात समवयस्क युवकांना एकत्र करून शेतीतील विविध गट झाले. गूळ उद्योग, भाजीपाला, दूध डेअरी यातून जेमतेम सातवी ते दहावीपर्यंत शिकलेल्या युवकांना एकत्र आणण्याचे काम कृषी सहायक रणजित राठोड यांनी केले होते. त्यातूनच पुढचा टप्पा म्हणून "आत्मा' योजनेअंतर्गत जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून महाराष्ट्र जलक्षेत्रसुधार प्रकल्पांतर्गत तेल उद्योगाला चालना देण्यात आली.
गटातील सदस्य मुकेश माधव मरे सातवी उत्तीर्ण आहेत. त्यांच्याकडे पूर्वी पिठाची चक्की व छोटा तेलघाणा होता. त्यातून निघणाऱ्या पेंडीत तेलाचे प्रमाण जास्त राहत असल्याने व वेळही फार लागत असल्याने शेतकरी मोठ्या शहरातील "ऑइल मिल'मधून तेल काढून आणीत. त्यामुळे मुकेश यांना हा व्यवसाय परवडत नव्हता. मग चारचाकी घेऊन पंधरा किलोमीटर परिसरात शाळेच्या मुलांना ने-आण करण्याचा व्यवसाय सुरू केला. वडील शेतकरी, मोठा भाऊ भांड्यांचे दुकान पाहायचा. घरची परिस्थिती ओळखून चक्की, कांडप मशिन असे व्यवसाय त्यांनी करून पाहिले. शेतात बोअर घेतले. शेती सुरू होतीच, तरीही बेभरवशाच्या निसर्गामुळे व अनियमित बाजारभावांमुळे फारसे उत्पन्न मागे शिल्लक राहत नव्हते. लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली. एक वेळ परीक्षेसाठी पैसे नसल्याने औरादला पंधरा किलोमीटर पायी जाण्याची वेळही आली. प्रसंगी मजुरीही करावी लागली. पुढे शेतकरी गटात ते सहभागी झाले. समविचारी मित्र एकत्र आले. कृषिप्रदर्शने, शेतकरी सहली, कृषीविषयक साहित्य वाचून शेतीत बदल घडवण्याचा ध्यास घेतला.
चिलवंतवाडी भागात करडई, सूर्यफूल, अंबाडी, मोहरी, तीळ, जवस आदी पिके होतात. जलसुधार प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्र वाढून भुईमुगाचेही क्षेत्र वाढलेले. तेल प्रक्रियेला वाव असल्याचे दिसत होते. राज्यातील लघुउद्योग पाहून उत्साह वाढला होता. अखेर मुकेश मरे, पांडुरंग मरे, किशोर पोतदार व सतीश मरे यांनी पुढाकार घेऊन नऊ अश्वशक्तीची ऑइल मिल व इलेक्ट्रिक मोटर शासनाच्या अर्थसाह्यातून घेण्याचे ठरवले. मुकेश यांना तेल उद्योगातील अनुभव होता. गटातील सुमारे अकरा शेतकऱ्यांकडे मिळून 30 एकर करडई, 25 एकर सूर्यफूल, 10 एकर भुईमूग, तर जवस 10 एकर, तीळ, मोहरी, अंबाडी असे प्रत्येकी चार एकर क्षेत्र होते. अन्य शेतकऱ्यांकडेही ही पिके होतीच. अखेर तेलप्रक्रियेसाठी मशिनरी, मोटरीसाठी चार लाख, बांधकामासाठी दोन लाख व खेळते भांडवल एक लाख, असा सुमारे सात लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्या मोबदल्यात शासनाकडून तीन लाख बासष्ट हजारांचे अनुदान टप्प्याटप्प्याने देण्यात आले. सुरवातीला ही योजना घेण्यास कोणी धजावत नव्हते. गटातील सर्व मित्र मुकेशला म्हणाले, की तुझ्याकडे तेलाची गिरणी आहेच. तुला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तूच हा उद्योग सुरू कर. मात्र मुकेश यांचे वडील सुरवातीपासूनच या निर्णयाविरोधात होते. उगी पोरगा अंगावर बोजा करून घेईल, असे त्यांना वाटत होते. मात्र मुकेश यांनी जिद्दीने हा व्यवसाय एकट्याच्या खांद्यावर पेलला व त्यात आत्मविश्वासपूर्वक पावलेही टाकण्यास सुरवात केली. आज हाच व्यवसाय त्यांचा आर्थिक आधार बनला आहे.
मुकेश आपल्या युनिटमधून दररोज सुमारे तीन ते पाच क्विंटल गळीत धान्यापासून तेल काढून देतात. यात करडई, अंबाडी, सूर्यफूल, कारळे आदी पिके शेतकरी घेऊन येतात. प्रति पोते 160 रुपये दर शेतकऱ्यांकडून आकारला जातो. प्रति तास 17 किलो धान्यापासून तेल काढले जाते. दिवसाला सुमारे 800 ते 900 रुपये उत्पन्न मिळते. वीज, तसेच अन्य खर्च वजा जाता 250 ते 300 रुपयांपर्यंतची अर्थप्राप्ती होते. वर्षात पावसाळ्याचे चार, हिवाळ्याचे दोन महिने व अन्य मोजके
महिने सोडून हा व्यवसाय सुमारे चार महिनेच चालतो. कारण कच्चा माल त्या प्रमाणातच उपलब्ध होतो. मध्यंतरीच्या काळात मुकेश यांनी जान्हवी या ब्रॅंडखाली करडई तेल व अन्य तेल यांची विक्रीही केली. मात्र शेतकऱ्यांकडून करडई खरेदी करून तेल काढावे लागते. त्यादरम्यान तेलाचे दरही घसरले होते. त्यामुळे मुकेश यांना हे आर्थिक गणित काही जमले नाही. तेलप्रक्रियेसाठी वीज मुख्य लागते. "लोडशेडिंग'ची समस्या गावात मोठी आहे. मात्र मुकेश थांबलेले नाहीत. एका व्यवसायावर अवलंबून न बसता त्यांनी उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधून काढले आहेत. त्यांच्याकडे ज्वारीची चक्की आहे. तांदूळ भरडण्याचे यंत्रही ते वापरतात. तेलप्रक्रियेतून शिल्लक राहणाऱ्या पेंडीचा वापर घरच्या जनावरांसाठी करतात. आतापर्यंत सुमारे दोन क्विंटल पेंडीची विक्रीही त्यांनी किलोला 18 रुपये दराने केली आहे.
मुकेश यांची घरची पंधरा एकर शेती आहे. विहिरीलाही जेमतेम पाणी. मध्येच अवर्षणाचे दिवस सुरू होतात. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत हार मानायची नाही, असे त्यांनी ठरवले आहे. व्यवसाय सांभाळत ते शेतीकडेही दुर्लक्ष करीत नाहीत. मागील वर्षी त्यांनी उसाचे दोन एकरांत 75 टन उत्पादनही घेतले आहे. यंदाच्या गारपिटीत मात्र एक एकरवरील करडईचे नुकसान त्यांना सोसावे लागले.
मुकेश जागृती कृषी विज्ञान मंडळातही कार्यरत आहेत. गटामार्फत सेंद्रिय गूळ व डाळींचे एक व अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये उत्पादन करून विक्री केली जाते. गूळ 50 क्विंटल व डाळी 25 क्विंटलचे पहिल्या वर्षी लक्ष्य होते. चालू वर्षी ते वाढवण्यात आले आहे. मंडळाचे कृषी वाचनालय असून, दर आठवड्याला सर्व सदस्यांची सभा होत असते. त्यातून गटाला स्थैर्य प्राप्त होण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षी लातूर येथील कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवातही मुकेश यांनी आपला स्टॉल उभारला होता. कृषी विभागाचे सहसंचालक (आत्मा) राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी विठ्ठलराव लहाने यांचे त्यांना सहकार्य लाभले आहे.
संपर्क - मुकेश माधव मरे - 9049303921
मु. चिलवंतवाडी, पोस्ट कलमुगळी, ता. निलंगा, जि. लातूर.
(लेखक निलंगा, जि. लातूर येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
दुग्ध प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक इमारत ही विवि...
सिंचनाच्या स्वाभाविक मर्यादा विचारात घेऊनही कृषी उ...