एक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून सु. ४,००० वर्षांपूर्वी भारतात तिची लागवड झाली असावी, असे मानतात. उंच प्रदेशातदेखील वाढण्यासाठी तिचे अनुकूलन झालेले असून हिमालयात ती सस. पासून सु. २,३०० मी. उंचीपर्यंत वाढू शकते. दक्षिण भारतात सस.पासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंत तिची लागवड केली जाते. नाचणीचे रोप ६०-१२० सेंमी. उंच व सरळ वाढत असून त्याच्या तळाशी अनेक फुटवे असतात. खोड चपटे व बोटाएवढे जाड असते. पाने अरुंद आणि लांब असून त्यांचा तळाकडील भाग खोडाभोवती आवरणासारखा वेढलेला असतो. खोडाच्या टोकावर ४-६ व जाड कणिशांचा झुबका असतो. कणिशकात कुसळविरहित व ३-६ फुले दाटीवाटीने असतात. प्रत्येक कणिशकात ४-७ गोलसर व चपट बिया असतात. बिया गडद तांबूस लाल रंगापासून पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये असतात.
नाचणी पौष्टिक, शामक व मूत्रल आहे. नाचणीमध्ये जलांश १३.१%, प्रथिने ७.३%, मेद १.४%, खनिजे २.७%, कर्बोदके ७२% असतात; शिवाय जीवनसत्त्वे अ, ब१ आणि निकोटिनिक आम्ल असतात. नाचणीचे बी खाद्य असून दाण्यांपासून भाकरी, आंबिल किंवा लापशी करतात. चव गोड, तुरट किंवा कडवट असते. ती पचायला भरपूर हलकी असते. त्वचेच्या रोगांवर पोटिस बांधण्यासाठी उपयोग होतो. नाचणीत लोह जास्त प्रमाणात असल्यांमुळे रक्तक्षयामध्ये उपयोगी आहे.
लेखक: राजा ढेपे
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
दररोज वापरात येणाऱ्या तृणधान्यांमधून आपणाला एकूण उ...
दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे ब...
गहू पिकाविषयी अधिक माहिती - गहू हे भारतातील महत्...
अनेक ठिकाणी गहू पीक आता फुलोरा ते काढणीच्या स्थिती...