नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. या जातींच्या प्रसारणासाठी नेपाळमधील बियाणे प्रसारण समितीने नुकतीच मान्यता दिली. सुखा धान -१, सुखा धान -२ आणि सुखा धान -३ अशा या जाती आहेत. या जातींचे उत्पादन पारंपरिक जातींपेक्षा प्रति हेक्टरी एक टनाने जास्त आहे. या जातींमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती असल्याने पाऊस कमी झाला तरी त्याचा परिणाम उत्पादनावर होत नाही. या जातींबद्दल माहिती देताना आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील बियाणे पैदासकार डॉ. अरविंद कुमार म्हणाले, की आम्ही हर्दीनाथ, नेपाळगंज, लामगंज भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर सुखा धान - १, सुखा धान - २ आणि सुखा धान - ३ या जातींच्या लागवडीच्या चाचण्या घेतल्या आहेत.
कमी पावसाच्या काळातही या जातींनी इतर जातींपेक्षा चांगले उत्पादन दिले आहे. या जाती कमी पावसाच्या भागातही लागवडीसाठी चांगल्या आहेत. नेपाळचा विचार करता तराई भागात जवळपास ७१ टक्के क्षेत्रावर भात लागवड केली जाते. या क्षेत्रापैकी ४५ टक्के क्षेत्रामध्ये पाऊसमान कमी आहे, त्यामुळे या भागातील भात उत्पादनवाढीसाठी या जाती निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत. नेपाळमध्ये दरवर्षी २.९२ दशलक्ष टन तांदळाची मागणी आहे. त्यामध्ये दरवर्षी ३.५ टक्क्यांनी वाढ होत आहे. भविष्यातील भाताची वाढती मागणी लक्षात घेता या नवीन जातींच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ होणार आहे. या जाती भारत तसेच बांगलादेशातील भात उत्पादकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...