অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तंत्र रब्बी ज्वारी बीजोत्पादनाचे....

तंत्र रब्बी ज्वारी बीजोत्पादनाचे....

अधिक दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाण्याची उत्पादनक्षमता स्थानिक वाणापेक्षा जास्त असते. या जातींचे बीजोत्पादन शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे. 
बीजोत्पादनामध्ये मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे असे चार प्रकार आहेत. मूलभूत बियाणे हे मान्यता असलेल्या रोप पैदासकार यांच्या देखरेखेखाली किंवा जेथे ही जात तयार झाली त्या ठिकाणीच तयार करता येते. पायाभूत बियाणे हे मूलभूत बियाण्यापासून किंवा पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. मात्र त्यासाठी पहिल्या वर्षाचे पायाभूत बियाण्यांपासून केले गेलेले असले पाहिजे. प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्यांची पुढची पिढी आहे. प्रमाणित व सत्यप्रत बियाणे हे अानुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावे लागते व बीज दर्जाच्या किमान कसोटीत उतरले पाहिजे.

बीजोत्पादन घेण्यापूर्वीची काळजी

१. ज्या क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घ्यावयाचे आहे ते क्षेत्र ज्या पिकाचे बीजोत्पादन घ्यावयाचे त्या पिकासाठी प्रमाणित केलेल्या अंतराएवढे इतर जातीपासून विलग असावे. 
२. ज्या क्षेत्रामध्ये बीजोत्पादन घ्यावयाचे आहे ते पीक पूर्वी त्या क्षेत्रात घेतलेले नसावे. 
३. ज्या भागात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या भागात येणाऱ्या पिकांचीच शक्यतो बीजोत्पादनासाठी निवड करावी. 
४. नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ठेवावी.

बीजोत्पादन पद्धती

१) बियाणे कायद्यातील कलम ९ नुसार कोणत्याही शेतकऱ्यांला बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. यासाठी पेरणीनंतर १५ दिवसांत बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक असते. यासाठी विहित नमुन्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांकडे नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये जे बीजोत्पादन होईल त्याची प्रक्रिया, विक्री व्यवस्था, साठवण या सर्व गोष्टीत बीजोत्पादकालाच लक्ष पुरवावे लागते. 
२) ज्या शेतकऱ्यांना प्रक्रिया, विक्री यासारख्या मूलभूत सोई उपलब्ध नसतील अशा शेतकऱ्यांनी राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे मंडळ किंवा खासगी बियाणे कंपन्यांकडे नोंदणी केल्यास कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना बीजोत्पादन करता येऊ शकते. यामध्ये बीजोत्पादनासाठी लागणारे बियाणे, त्यांची नोंदणी, परीक्षण यासारख्या गोष्टीत महामंडळ/ कंपन्या यांची मदत होऊ शकते. 
३) प्रमाणीकरण यंत्रणेकडून सदर बीजोत्पादनाचे परीक्षण करून केल्यास बीजोत्पादन क्षेत्राचे परीक्षण, पिकाची काढणी, तपासणी यासारखी कामे करणे बियाणे महामंडळाला तसेच प्रमाणीकरण यंत्रणेला सोईस्कर होते.

ग्राम बीजोत्पादन योजना

१) या योजनेमध्ये एका किंवा आसपासच्या गावामध्ये पिकाच्या एकाच वाणाचे/ जातीचे बीजोत्पादन घेतात. यामुळे बीजोत्पादनासाठी विलगीकरण, पेरणी, भेसळ झाडे काढणे, प्रमाणीकरण, प्रक्रिया यासारखी कामे खूपच सोपी होतात. २) परागीभवनासाठी विपुल प्रमाणात परागकण उपलब्ध होतात आणि पर्यायाने बीजोत्पादन चांगल्या प्रतीचे आहे. 
३) या योजनेसाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या कृषी खाते, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या साह्याने या प्रकारची योजना राबवून बीजोत्पादन घ्यावे.

बीजोत्पादन करताना

१) बीजोत्पादन करताना त्यांचे वितरण, परीक्षण, प्रक्रिया आणि प्रमाणीकरण या सर्वांसाठी जे नियम तयार केले आहेत ते पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 
२) बियाण्यांच्या निरनिराळ्या बाबींचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये बियाण्याची शुद्धता, तण बियांपासून मुक्तता, बियाण्याची उगवणक्षमता, त्यांचा जोम, आकार, प्रत व शारीरिक शुद्धता या सर्व गोष्टी विचारात घेऊनच शास्त्रीयदृष्ट्या बीजोत्पादन करावे. यासाठी प्रथम बियाण्याची प्रत तपासावी. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध व चांगल्या शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे देणे हा होय.
३) बियाण्याची प्रत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये बियाण्यांची अानुवंशिक शुद्धता आणि बियाण्याचे आरोग्य या प्रमुख बाबींचा समावेश होतो.

बीजोत्पादनासाठी महत्त्वाच्या बाबी

हवामान - 
बीजोत्पादनासाठी समशीतोष्ण व कोरडी हवा चांगली असते. बीज धारणेच्या वेळी हवेमध्ये थोडी आर्द्रता व ऊब असेल तर ती उपयुक्त ठरते. दाणे पक्व होण्याच्या वेळी अगर नंतर हवामान कोरडे असावे लागते. पावसात पीक सापडल्यास दाण्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन उगवण शक्तीवर अनिष्ट परिणाम होतो.
जमीन - 
बीजोत्पादनासाठी मध्यम, खोल व निचऱ्यांची जमीन असावी. जमिनीस आलोताची सोय असणे जरुरीचे आहे. या जमिनीत पूर्वी ज्वारीचे पीक घेतलेले नसावे. जमीन कसदार व सपाट असावी.
पूर्वमशागत - 
खोल नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. पूर्वी ज्वारी घेतली असल्यास शेतीला पाणी देऊन मागील पिकांचे बी उगवल्यावर पूर्ण मोडून घ्यावे. त्यानंतर बीजोत्पादनाचे पीक घ्यावे.

पेरणीसाठी बियाणे

१) सुधारित जातींच्या बीजोत्पादनासाठी हेक्टरी दहा किलो बियाणे वापरावे. 
२) बियाण्याची पावती व प्रमाणपत्र जपून ठेवावे, तपासणी अधिकाऱ्यास दाखवावे. 
३) बियाण्यांच्या प्रकारानुसार त्या बियाण्याच्या पिशवीवर विशिष्ट रंगाची खुणचिठ्ठी (टॅग व लेबल) लावलेली असते. या खुण चिठ्ठीवर बियाण्याचे गुणधर्म दर्शविणारी माहिती असते.

४) बीजोत्पादित केलेल्या बियाण्यांच्या विविध प्रकारांनुसार त्या बियाण्यांच्या पिशवीस पुढील प्रमाणे विशिष्ट रंगाची खुणचिठ्ठी लावलेली असते.
मूलभूत बियाणे (ब्रीडर सीड)- पिवळ्या रंगाची खुणचिठ्ठी. 
पायाभूत बियाणे (फाउंडेशन बियाणे)- पांढऱ्या रंगाची खुणचिठ्ठी. 
प्रमाणित बियाणे (सर्टिफाईड बियाणे) निळ्या रंगाची खुणचिठ्ठी.
सत्यप्रत बियाणे (ट्रुथफुल बियाणे)- हिरव्या रंगांची खुणचिठ्ठी.

विलगीकरण

१) बीजोत्पादन घेण्यात आलेल्या जातीमध्ये त्या पिकांच्या इतर जातीपासून परागीभवन होऊन भेसळ होऊ नये म्हणून योग्य विलगीकरण अंतराद्वारा पीक अलग ठेवावे. 
२) सुधारित जातींच्या पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादनासाठी अनुक्रमे २०० आणि १०० मीटरचे परिसरात बीजोत्पादन पीक फुलोऱ्यात येणारे अन्यथा येण्याची शक्यता असणारे अन्य जातींच्या ज्वारीचे (चाऱ्यासाठी/दाण्यासाठी) ताटे असता कामा नये. शिवाय बीजोत्पादन पिकाच्या ४०० मीटर परिसरात जॉन्सन (जोंधळी) गवत असू नये. 
३) बीजोत्पादन पिकाच्या २५ मीटरच्या परिसरातील त्याच जातीचे बीजोत्पादन पिकात अथवा बीजोत्पादन पिकात वापरलेल्या नर वाण जातीच्या पिकात भेसळ प्रमाणापेक्षा जास्त आढळली तर ते पीक आक्षेपार्ह ठरेल व विलगीकरण असमाधानकारक ठरून त्यापासून २५ मीटर अंतरात येणारे बीजोत्पादन क्षेत्र प्रमाणीकरणास अपात्र ठरेल, तेव्हा आपल्या बीजोत्पादन पिकाबरोबर अशा पिकांतही भेसळ नियमित काळजीपूर्वक काढण्याची दक्षता घ्यावी.

क्षेत्रीय दर्जा - सुधारित वाणांसाठी आवश्यक क्षेत्रीय दर्जा

पीक ---- विलगीकरण अंतर (मीटर) ---- परागकण असलेली झाडे (पोलन शेडर टक्के) ---- भेसळयुक्त झाडांचे प्रमाण (टक्के) ---- रोगट बिजाणू (ज्वारी मधील काणी टक्के) 
पायाभूत बियाणे ---- २००+ ---- + ---- ०.०१ ---- ०.०५ 
- ---- ४००* ---- + 
प्रमाणित बियाणे ---- १००+ ---- + ---- ०.०५ ---- ०.०१ 
- ---- ४००* ---- + ---- 
+ = ज्वारीच्या इतर जातीचे पीक *=जॉन्सन गवत (गोंधळी)
पेरणी पद्धत - 
रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळीमध्ये ४५ सें.मी. व रोपांमध्ये १२ सें.मी. अंतर ठेवावे. पहिली विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी व दुसरी त्यानंतर १० दिवसांनी करावी. रोपांची हेक्टरी संख्या एक लाख ऐंशी हजार असावी.
रासायनिक खते - 
रब्बी ज्वारीचे बीजोत्पादन शक्यतो बागायती खाली मध्यम ते भारी जमिनीतच घ्यावे. त्यासाठी पुढील प्रमाणे उपलब्ध असलेल्या खतांची मात्रा द्यावी.

रासानिक खताचे व्यवस्थापन (हेक्टरी)

अ.नं. ---- खतांचा प्रकार ---- बागायती क्षेत्रासाठी मात्रा/ हेक्टरी 
- ---- - ---- भारी जमीन (नत्र, स्फुरद,पालाश) १००ः५०ः५० ---- मध्यम जमीन(नत्र, स्फुरद,पालाश) ८०ः४०ः४० 
१ ---- सरळ खते ---- - ---- 
- ---- युरिया ---- २१८ किलो सव्वाचार गोण्या ---- १७४ किलो साडे तीन गोण्या 
- ---- सिंगल सुपर फॉस्फेट ---- ३१३ किलो सव्वाहा गोण्या ---- २५० किलो पाच गोण्या 
- ---- म्युरेट ऑफ पोटॅश ---- ८६ किलो पावणेदोन गोण्या ---- ६९ किलो दीड गोण्या 
- ---- किंवा 
२ ---- संयुक्त खते ---- - ---- 
- ---- नायट्रोफॉस्फेट १८ः४६ ---- १०९ किलो सव्वादोन गोण्या ---- ८७ किलो पावणेदोन गोण्या 
- ---- युरिया ---- १७५ किलो साडेतीन गोण्या ---- १४० किलो पावणेतीन गोण्या 
- ---- म्युरेट ऑफ पोटॅश ---- ८६ किलो पावणेदोन गोण्या ---- ६९ किलो दीड गोण्या 
- ---- किंवा 
३ ---- नायट्रोफॉस्फेट २०ः२०ः२० ---- २०५ किलो पाच गोण्या ---- २०० किलो चार गोण्या 
- ---- युरिया ---- १०९ किलो सव्वादोन गोण्या ---- ८७ किलो पावणेदोन गोण्या 
- ---- म्युरेट ऑफ पोटॅश ---- ८६ किलो पावणे दोन गोण्या ---- ६९ किलो दीड गोण्या 
- ---- किंवा 
४ ---- १५-१५-१५ ---- ३३३ किलो साडे सहा गोण्या ---- २६७ किलो साडेपाच गोण्या 
- ---- युरिया ---- १०९ किलो सव्वा दोन गोण्या ---- ८७ किलो पावणे तीन गोण्या
५ ---- १०-२६-२६ ---- १९२ किलो चार गोण्या ---- १५४ किलो तीन गोण्या 
- ---- युरिया ---- १७४ किलो साडेतीन गोण्या ---- १४० किलो पावणेतीन गोण्या
टीप - संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळीस द्यावे. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर एक महिन्यानंतर द्यावे.
आंतर मशागत - 
१) तीन वेळा कोळपणी व गरजेनुसार खुरपणी करावी. खुरपणी करताना खोडमाशी व खोडकिडीमुळे गेलेली झाडे काढून एकत्र करून ती जाळून टाकावीत. साधारणपणे ४० ते ४५ दिवसांनी एक जोमदार फुटवा ठेवून बाकी फुटवे काढून टाकावेत.

पाणी व्यवस्थापन

अ.क्र. ---- पिकांची अवस्था ---- पेरणीनंतर दिवस 
१ ---- पिकांच्या जोमदार वाढीचा काळ (गर्भावस्था) ----२८-३० 
२ ---- पीक पोटरीत असताना ---- ५०-५५ 
३ ---- पीक फुलोऱ्यात असताना ---- ७०-७५ 
४ ---- दाणे भरताना ---- ९०-९५

शिफारशीत जाती

१) भारी जमीन - फुले वसुधा व सी.एस.व्ही. २२ 
२) मध्यम जमीन - फुले चित्रा व सुचित्रा 
३) हलकी जमीन - फुले अनुराधा व फुले माउली 
४) बागायती क्षेत्र - फुले रेवती 
५) हुरड्यासाठी - फुले उत्तरा व फुले मधुर, 
६) लाह्यांसाठी - फुले पंचमी 
७) पापडासाठी - फुले रोहीनी 

संपर्क - ०२४२६-२४३२५३ 
( लेखक ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate