ज्वारी लागवडीसाठी कोणते यंत्र वापरावे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी सुधारित पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे एकाच वेळी आठ ते 10 सें.मी. खोलीवर बियाणे आणि 15 सें.मी. खोलीवर (बियाण्याच्या खाली साधारणपणे पाच सें.मी.) रासायनिक खते जमिनीमध्ये पेरता येतात.
यांत्रिक पेरणी यंत्राचा वापर करून पेरणी केल्यामुळे जमिनीचा वरचा थर (पाच सें.मी.) जरी कोरडा असला, तरी बियाणे खोलवर, ओलसर भागात पेरल्यामुळे उगवण होऊन उत्पादनाची शाश्वती मिळते.
-रासायनिक खते खोलवर ओलाव्यात, पिकाच्या मुळांजवळ दिल्यामुळे या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होते.
-या पद्धतीने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी रासणी करू नये.
-पेरणी यंत्राने जेव्हा ज्वारी पेरणी केली जाते, तेव्हा पेरणी यंत्रामागे जमिनीवर छोट्या उथळ सऱ्या तयार होतात. ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी या छोट्या छोट्या सऱ्यांमध्ये जमा होते. या पाण्याचा पिकाच्या वाढीस फायदा होतो. यासाठी खोलवर पेरणी नंतर रासणी करू नये.
यंत्राने पेरणी करताना
- सुधारित पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्यापूर्वी व अधून मधून बियाणे योग्य खोलीवर (जमिनीच्या ओलसर भागात) आणि योग्य अंतरावर पडते आहे याची खात्री करून घ्यावी.
- पेरतेवेळी बियाणे व रासायनिक खते वेगवेगळ्या खोलीवर पडत असल्याची खात्री करून घ्यावी.
- यंत्राने पेरणी करताना बियाणे व खते यामध्ये पातळ मातीचा थर असावा.
- जिरायती पद्धतीने रब्बी पिकांची पेरणी करताना खताची संपूर्ण मात्रा पेरतेवेळी द्यावी.
- बागायती पिकांसाठी नत्रयुक्त खतांची मात्रा विभागून दोन वेळेस म्हणजेच पेरणीच्यावेळी निम्मे नत्र आणि उरलेले निम्मे नत्र पेरणी नंतर 30 दिवसांनी द्यावे. संपूर्ण - स्फुरदाची मात्रा पेरते वेळी द्यावी.
राज्यातील जमिनीमध्ये पालाश भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पालाश वेगळ्या खतांमधून देण्याची गरज भासत नाही.
माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करावा.
प्रा. पंडित मुंढे - 7588082072
प्रा. मदन पेंडके : 9890433803
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन