उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले. त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले. या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते. पहिली खतमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वाफसा आल्यावर 50 टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यासह) पहारीच्या साह्याने बेटापासून 15 सें. मी. अंतरावर आणि 10 ते 15 सें. मी. खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें. मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी.
खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध कमी येत असल्याने हवेद्वारा फार कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो. खत जमिनीत गाडल्यामुळे वाहून जात नाही. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो आणि खुरपणीवरील खर्चात 50 ते 75 टक्के बचत होते. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन पिकाची जोमदार वाढ होते आणि भरघोस उत्पादन मिळते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारख्या प्रकारचे पीक येते आणि ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. या पद्धतीत आपण एका वेळी एकाच बाजूने खते वापरत असल्याने, तसेच खते खोडापासून दूर असल्याने विरुद्ध बाजूस उपयुक्त जिवाणू नेहमीप्रमाणे वाढत राहतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते.
संपर्क - 02169 - 265333, 265335,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.
स्त्रोत: अग्रोवन-
अंतिम सुधारित : 10/7/2020
दीडशे शेतकऱ्यांकडून मालाचे संकलन दररोज 800 किलो ...
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा...