देशाची कोरडवाहू कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे. ती वाढविण्यासाठी कापसाच्या सरळ वाणांत सघन लागवड पद्धतीचे प्रयोग नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) प्रयोग घेतले. त्याद्वारे उत्पादनात 30 टक्के वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. पुढील वर्षी विदर्भातील प्रमुख सहा कापूस उत्पादक जिल्ह्यांत प्रत्येकी एक हजार प्लॉटमध्ये या पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. "सीआयसीआर' संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी ही माहिती दिली.
"सीआयसीआर'च्या नागपूर येथील प्रक्षेत्रावर कापसाच्या सरळ वाणांत गेल्या तीन वर्षांपासून या पद्धतीचे प्रयोग घेण्यात आले. त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले असल्याचे डॉ. क्रांती यांचे सहकारी व संस्थेचे तज्ज्ञ डॉ. वेणुगोपाल आणि डॉ. अर्जुन तायडे यांनी सांगितले. उत्पादनवाढ तसेच यांत्रिकीकरणाद्वारे कापूस काढणीसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
ब्राझील, चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, उझबेकिस्तान, अर्जेंटिना, ग्रीस येथे मोठ्या प्रमाणावर "सघन पद्धती'ने कापूस लागवड होते. प्रति हेक्टरी झाडांची संख्या एक ते 2.2 लाख ठेवली जाते. पिकातील तण, तसेच रोग - कीड नियंत्रण करण्याबाबतचा आराखडा या देशांनी तयार केला आहे. त्यामुळे कीड - रोगांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. सघन पद्धती यांत्रिक पद्धतीने कापूस काढणीसाठी देखील फायद्याची ठरते. ब्राझील मध्ये 1980 पासून सघन पद्धतीने कापूस लागवड होते. त्यातून प्रति हेक्टरी 40 ते 60 क्विंटल उत्पादन मिळते. तुलनेने भारतात कोरडवाहू कापसाची उत्पादकता कमी असून हेक्टरी 20 क्विंटलपेक्षाही कमी उत्पादन मिळते. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाना या दोन्ही राज्यांत 100 टक्के बागायती कापसाचे क्षेत्र असूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
कपाशीच्या शिफारशीत लागवड पद्धतीत झाडांची संख्या प्रति हेक्टरी 50 ते 55 हजार तर बीटी वा संकरित वाणात हेक्टरी 15 हजार झाडे असतात; मात्र सघन पद्धतीत सरळ वाणांची 45 x 15 सें.मी. अंतरावर लागवड करून प्रति हेक्टरी दीड लाख झाडे बसतात. शिफारशीत पद्धतीपेक्षा या सघन पद्धतीत झाडांची संख्या अधिक असल्याने कोरडवाहू कापूस उत्पादनात मोठी वाढ होते. याबाबत संस्थेच्या नागपूर येथील प्रक्षेत्रामध्ये प्रयोग करण्यात आले आहेत. त्या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले मिळाले आहेत. या पद्धतीने लागवड केलेल्या झाडांची कायिक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडांचा आकार मोठा मिळून उत्तम प्रतीचा कापूस निघतो.
या पूर्वी कापसाची सघन पद्धतीने लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून फारसे संशोधन झाले नव्हते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पद्धतीने लागवड यशस्वी करण्यासाठी "सीआयसीआर' संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. येथे झालेल्या संशोधनातून "गॉसिपीअम हिरसुटम' जातीतील पीकेव्ही 081, एनएच 615, एनएच 630, सूरज, एडीबी -39 या पाच प्रकारच्या सरळ जाती विकसित केल्या आहेत. याच जातींची लागवड सघन पद्धतीने लागवडीच्या प्रयोगात करण्यात आली होती.
विदर्भातील सहा जिल्ह्यांत राबविला जाणार "पायलट प्रोजेक्ट'
विदर्भात कोरडवाहू कापूस शेतीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी ही पद्धती खास करून कोरडवाहू कापूस शेतीला फायद्याची ठरणारी असल्याने या लागवड पद्धतीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी "सीआयसीआर' संस्थेने विदर्भातील प्रमुख सहा कापूस उत्पादक जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांत परिसरातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांचे सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात एक हजार प्लॉटवर प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. संस्थेने सघन पद्धतीने लागवडीसंदर्भात जसे पेरणी, तणनियंत्रण, आंतरमशागत, वाढसंजीवके, कीड व रोग व्यवस्थापनाचे उपयुक्त असे वेळापत्रक तयार केले आहे. अखिल भारतीय कापूस सुधार प्रकल्पांतर्गत अनेक केंद्रांवर या पद्धतीने लागवडीचे प्रयोग घेतले जात आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यास कोरडवाहू कापूस उत्पादनवाढीस मदत होऊ शकते.
"कोरडवाहू क्षेत्र आणि उथळ जमिनीत लागवड होणाऱ्या कापसाच्या उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धती यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. तीन वर्षांत संस्थेने कापसाच्या सरळ वाणांची लागवड करून याचे प्रयोग घेतले. त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले असून थोड्याफार प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भावही दिसला. संस्थेने अमेरिकन, गुलाबी बोंडअळी आणि रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी तीन फवारणींचे वेळापत्रक तयार केले आहे. पुढील वर्षी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या प्लॉटवर या पद्धतीचे फायदे-तोटे लक्षात येतील. प्रयोगात कापूस लागवडीपासून काढणीपर्यंतचे सर्व व्यवस्थापन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. त्यासाठी तांत्रिक सहायकांची मदत घेतली जाणार आहे.'
- डॉ.केशव क्रांती, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...