शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांची रुची वाढविण्यासाठी चिंचेचा प्रामुख्याने वापर केला जातो. पक्व चिंच ही आंबट-गोडसर चवीची, अल्प, उष्णधर्मी, वातपित्तशामक, भूक वाढविणारी, अत्यंत रुची देणारी आहे. चिंचगर, चिंचोका, चिंच पाने, टरफले औषधी म्हणून वापरली जातात.
चिंचेचे लाकूड अत्यंत चिवट असल्याने शेती अवजारे तयार करण्यासाठी ग्रामीण भागात वापरले जाते. तेलघाणा तसेच भात गिरण्यांतील उखळी, बैलगाडी चाके तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. चिंच गरापासून सॉस, सरबत, लोणचे, जेली यांसारखे पदार्थ तयार केले जातात.
चिंचेचे अनेक औद्योगिक वापरही आहेत. चिंचोके भाजून त्यापासून केलेल्या पिठाचा वापर ब्रेड, बिस्किटामध्येही केला जातो. चिंचोक्याचा वापर स्टार्चनिर्मितीसाठी करतात. स्टार्चचा वापर सुती कापड व घोंगड्यांना कडकपणा आणण्यासाठी केला जातो. कातडी कमावण्याच्या उद्योगात चिंचोक्याच्या काळपट - तांबडसर टरफलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच चिंचेचा पाला जनावरे आवडीने खातात. जनावरांचे खाद्य म्हणूनच याचा वापर केला जातो.
चिंचेमध्ये काही प्रमाणात साखर, पेक्टीन, जीवनसत्त्व "अ'ही आढळते.
चिंचेची फुले आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एक थर चिंच फुलांचा, तर एक थर खडी साखरेचा, असे थरावर थर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत दिले जातात. बरणी 10-12 दिवस सूर्यप्रकाशात ठेवावी. दुसऱ्या दिवसानंतर बरणीतील मिश्रण दिवसातून दोनदा हलवावे, जेणेकरून चांगल्या प्रतीचा गुलकंद तयार होईल. हा गुलकंद पित्तनाशक आहे.
चिंचेचे सार तयार करताना चिंचेमध्ये तीनपट पाणी घेऊन मिश्रणाला उष्णता देतात. मलमलच्या कापडाच्या साह्याने गर काढतात. या गरामध्ये चवीप्रमाणे साखर व सैंधव मीठ अथवा साधे मीठ, आवश्यकता भासल्यास पाणी घालतात. शेवटी तुपाची हिंग, जिरे व मोहरीची फोडणी घालतात. या साराचा वापर पाचक म्हणून करतात.
चिंचेपासून बनविलेला ठेचा जेवताना तोंडी लावायला चांगला लागतो. ठेचा बनविण्यासाठी चिंचोका धरलेल्या चिंचा 250 ग्रॅम, हिरव्या मिरच्या 30 ग्रॅम, हिंग पूड दोन ग्रॅम, जिऱ्याची पूड पाच ग्रॅम, मीठ 20 ग्रॅम, हळद तीन ग्रॅम, तेल 30 मि.लि.
प्रथम चिंचा स्वच्छ पाण्याने धुऊन देठे व शिरा काढून टाकाव्यात. एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात तेल तापवा. मिरच्यांची देठे काढून, स्वच्छ पाण्याने धुऊन, ओबडधोबड किंवा जाड वाटा किंवा लहान तुकडे करावेत. ही मिरची तेलात घालून परतावी. नंतर चिंचांचे बारीक तुकडे करून वरील तेलात घालून परतावेत. नंतर हिंग, जिरेपूड, हळद घालून परता व झाकण ठेवून एक वाफ आणावी. सर्व मिश्रण मीठ घालून जाडसर वाटा व घट्ट झाकणाच्या बरणीत (निर्जंतुक केलेल्या) भरून ठेवा. हा ठेचा जेवणात वापरताना आवश्यकतेनुसार घेऊन त्यामध्ये गूळ घालून, तेलात मोहरी, हिंग, हळद यांची फोडणी घालून, ती गार करून गुळाच्या मिश्रणात टाकून जेवणात तोंडी लावायला वापरतात.
चिंचोका पावडर तयार करण्यासाठी चिंचोके गरम पाण्यात भिजवावे किंवा भाजावे. त्याची टरफले काढावीत. टरफले काढल्यानंतर आतील बिया व्यवस्थित वाळवून दळणी यंत्राच्या साह्याने दळतात. दळलेली ही भुकटी प्लॅस्टिक पिशवीत सीलबंद करावी.
सुरवातीला चिंचेचा गर काढून घ्यावा. हा गर घट्ट होईपर्यंत मंद आचेवर किंवा निर्वात पोकळीच्या सान्निध्यात घट्ट करावा. घट्ट झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्राच्या साह्याने वाळवितात. वाळलेला गर दळणीयंत्राच्या साह्याने दळून, गराची भुकटी करतात. तयार झालेली भुकटी प्लॅस्टिकच्या पिशवीत हवाबंद करतात. या पावडरीचा उपयोग शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी करतात.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/9/2023