অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केवडा

केवडा

केवडा

(केतकी ; हिं. केवरा, केटगी; गु. केवडो, क. केदगे, मुंडिगे; सं. केतक, गंध पुष्प; इ. स्क्रू पाइन; लॅ. पँडॅनस ओडोरॅटिसिमस; कुल पँडॅनेसी). बाजारात मिळणाऱ्या एक प्रकारच्या सुवासिक कणसाला केवडा म्हणतात.

केवडा :

(१) झाड,

(२) पुं-फुलोरा,

(३) स्त्री-फुलोरा,

(४) पुं-पुष्प,

(५)संयुक्त फळ.

वास्तविक केवड्याच्या झाडाचा तो पुं – पुष्प बंध (फुलोरा) असतो. हे झुडूप सु. ३ मी. उंच वाढते. अनेक वायवी (हवेतील) व जाड आधारमुळांनी याचे खोड उभे सावरून धरलेले असते. याचा प्रसार भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर, ओरिसा, मध्य प्रदेश, सुंदरबन, ब्रह्मदेश, अंदमान बेटे इ. ठिकाणी असून शोभेकरिता व सुगंधी फुलोऱ्याकरिता बागेतही लावतात.

फांद्या जाडजूड व पाने त्यांच्या टोकाकडे गर्दीने येतात. पर्णतल आवरक (खोडास वेढणारे) व पाने साधी, लांब, खड्गाकृती, एकांतरित (एकाआड एक), प्रकुंचित (टोकदार), हिरवी आनील (निळसर हिरवी), चिवट, वरून गुळगुळीत व खालून फिकट असतात. त्यांच्या कडा व मध्यशिरा काटेरी असतात.

फुले एकलिंगी व त्यांची संरचना आणि इतर सामान्य लक्षणे पँडॅनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पुं पुष्पांची स्थूलकणिशे २५ – ५० सेंमी. लांब असून त्यांत अनेक अवृंत (बिनदेठाची), चित्तीय, ५ – १० सेंमी. लांब कणिशे असतात; त्या प्रत्येकावर एक लांब सुवासिक पांढरा किंवा पिवळा पण पानासारखा महाछद असतो. स्त्री पुष्पांचे कणिश एकटे व ५ सेंमी. व्यासाचे असते  व त्यापासून पिवळट किंवा लालसर लहान फणसासारखे, बोथट काट्यांचे संयुक्त आणि काष्ठमय फळ बनते.

यात अनेक लहान अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे असतात; ती उन्हाळ्यात व पावसाळ्यात येतात. बीजे मोठी व नाभिजातयुक्त (बीजाच्या नाभीजवळील फुगीर भाग असलेली) असतात.

सामान्यतः नद्या, कालवे, तळी व शेते यांच्या कडेने ही झुडपे लावतात; ती जमिनीतील माती एकत्र धरून ठेवतात. यांची नवीन लागवड खोडाच्या आडव्या फांद्यांनी (जमिनीवरच्या व खालच्या) करतात; तीन चार वर्षांनी केवडे येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडास वर्षातून ३० –४० कणसे येतात. या झाडास आल्टर्नेरिया टेन्युई या कवकापासून (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीपासून) टिक्का रोग होतो;त्यामुळे पाने गळतात व कणसे लहान येतात. पिकलेल्या कणसांपासून ऊर्ध्वपातनाने (वाफ थंड करून) तेल मिळते, हे तेल चंदनतेलात किंवा द्रव पॅराफिनात मिसळून केवडा अत्तर बनवितात.

ते फार प्राचीन काळापासून उपयोगात आहे. साबण, सौंदर्यप्रसाधने, तेले, तंबाखू, अगरबत्ती इत्यादींत सुगंधाकरिता ते वापरतात. अन्न, मिठाई, सरबते इत्यादींना स्वाद आणण्यास या सुगंधी द्रव्याचा उपयोग करतात. अत्तराचा मुख्य घटक बीटा फिनिल एथिल अल्कोहॉलाचा मिथिल ईथर (७०%) असतो. पानांचा उपयोग झोपड्यांची छपरे, चटया, दोर, मॅनिला, हॅट, टोपल्या, पिशव्या इत्यादींसाठी करतात. मुळांपासून रंगविण्याचे कुंचले करतात.

पाने स्तंभक (आकुंचन करणारी), उग्र व सुवासिक असून महारोग, देवी, उपदंश, खरूज व श्वेतकुष्ठ (कोड) इत्यादींवर गुणकारी असतात. तेल स्तंभक, उत्तेजक, जंतुनाशक असून डोकेदुखीवर व संधिवातावर उपयुक्त असते. हिंदू लोक श्री गणपतीदेवाच्या पूजेस (विशेषतः गणेश चतुर्थीला) केवडा वापरतात. केवड्याची एक जाती (पँडॅनस अ‍ॅमारिलिफोलियस) बागेत लावतात. या जातीची पाने लहान व कमी काटेरी असतात; पानाचा तुकडा भात शिजवताना घातल्यास भाताला आंबेमोहोरासारखा वास येतो.

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate