অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाढवा वनोपजांचे उत्पादन

जंगले ही मृद्‌संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्काळ आणि पूर नियंत्रणाच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. याचबरोबरीने जंगलांतून मिळणारे लाकूड आणि वन उत्पादनापासून मोठी आर्थिक उलाढाल होते. या वन उपजाचे महत्त्व आपणास नगण्य वाटत असले, तरी त्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे. वनवृक्षांचे संवर्धन केल्यास पर्यावरणाला फायदा होईलच, त्याचबरोबरीने लघु उद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठाही योग्य प्रमाणात होईल.
लाकडाचा उपयोग इमारत, फर्निचर, पेपर, जळण, इंधन, कोळसा, खेळणी इ. अनेक गोष्टींसाठी होतो. लाकडाबरोबर जंगलांमधून आपणास मध, अन्न, फळे, फुले, जनावरांचे खाद्य, तंतू, बांबू, केन, औषधी वनस्पती, सुगंधी द्रव्य देणाऱ्या वनस्पती, टॅनिन, नैसर्गिक रंग, पाने, डिंक, रेझीन, सौंदर्य देणारी काष्ठ शिल्पं, कात, कच, खिरसाल, झाडांच्या साली, मुळे, बिया, लाख, सिल्क, मसाल्याचे पदार्थ, वनस्पतिजन्य कीडनाशके इत्यादी वन उपजे मिळतात.

राज्यातील जंगलांमधून जांभूळ, चिंच, फणस, कोकम, करवंद, अळू, आवळा, ताडगोळे, ताडीमाडी, चारोळी, आंबा, तोरण इत्यादी फळे; कढीपत्ता, टाकळा, भारंगी, चेर, पेव, करांदा, सफेद मुसळी, माठ, घोळ, कुडा इ. भाज्या; सुगंधी वनस्पतींमध्ये केवडा, चंदन, दालचिनी जंगलामधून जमा केल्या जातात. जनावरांच्या खाद्यासाठी शिवण, धामण, कांचन, आपटा, शेवरी, तुती, असाणा, किंजळ, ऐन, बांबू इ. प्रजातींची पाने वापरली जातात. जंगलांमधून मिळणाऱ्या गवतावर एकूण पशुधनापैकी 30 टक्के पशुधन अवलंबून आहे. उन्हाळ्यामध्ये शेळ्या- मेंढ्या, जनावरांना या झाडांची पाने खाद्य म्हणून उपयोगी पडतात.

उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा


जंगल परिसरातील लोक जंगल परिसरातून मध गोळा करणे, साबण उद्योगासाठी रिंगी- रिठा या झाडांची फळे गोळा करणे, शिकेकाई, वावडिंग, बिब्बा, पळस फुले, गुळवेल, अर्जुनसाल, हिरडा, बेहडा, आवळा फळे गोळा करतात. ऐन, खैर, बिवळा, कांडोळ, कडुनिंब, बाभूळ यांपासून डिंक गोळा केला जातो. या डिंकास मागणी परदेशांतून मोठ्या प्रमाणात वाढते आहे. जंगले हा नैसर्गिक रंग देणारा कारखाना आहे. झाडांची पाने, फुले, साल, बिया इ.पासून रंग काढला जातो. पळस फुलांपासून नारंगी रंग, शेंद्रीपासून शेंदरी रंग, निळपासून निळा रंग इ. रंग मिळतात. >या रंगांस मागणी वाढली आहे. झाडांच्या विविध भागांपासून दोरखंड, दोर, धागे काढून विविध वस्तू तयार केल्या जातात. बांबूच्या धाग्यांपासून चटई, मॅट, झाडू, टोपली, पाट्या इ. अनेक वस्तू बनविल्या जातात. बांबूच्या भारतात 145 जाती आढळतात. भारतात दरवर्षी पाच दशलक्ष टन बांबूची काढणी केली जाते. घरबांधणी, शेती, पेपर निर्मिती, चारा इ. अनेक कारणांसाठी बांबूचा वापर केला जातो. तेंदू पाने, पळस, भेरली माड, कांचन, मुचकुंद, केळी, चवई इ.ची पाने द्रोण, पत्रावळी, विडी, बुके, घरे बनविण्यासाठी वापरली जातात. >वन उपजांची साठवणूक वन उपजे जमा करताना, वाळविताना, साठवणूक करत असताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. झाडांची फळे, साली इ. गोळा करताना झाडांवर काही फळे शिल्लक ठेवावीत. साल काढताना एकाच दिशेची साल काढावी. वन उपजे गोळा केल्यानंतर ती चांगली सुकविणे आवश्‍यक असते, अन्यथा त्यावर बुरशी येऊन ती खराब होऊ शकतात. वन उपजे साठवताना ती हवेशीर ठिकाणी, पोत्यात अथवा डब्यात ठेवावी. वन उपजे जमिनीवर ठेवू नयेत. वन उपजे देणाऱ्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्‍यक आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात अनेक उद्योग उभारणे शक्‍य आहे.

रानभाज्यांची उपलब्धता


फळे व रानभाज्या विक्री करून काही आदिवासी आपली गुजराण करतात. जंगली फळे ही अत्यंत औषधी असतात. जीवनसत्त्वे, प्रथिने, नैसर्गिक शर्करा इ. यांनी ती परिपूर्ण असतात. या फळांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आहे. अळू, भेडस, जांभूळ, अटकी, अंजन, करवंद, चिंच, चारोळी, आवळा, देव्हारा, बोर, कोकम, पिवळा कोकम इ. जंगलांत मिळतात. रानभाज्या व काही कंद जंगलांतच मिळतात

या भाज्या व कंदांमध्ये अनेक विकार बरे करणारे घटक असतात. टाकळा भाजी पोट साफ करण्यासाठी, भारंगी भाजी पोटातील वायू काढण्यासाठी वापरली जाते. शेवळ, पेव, शेवगा, कढीपत्ता, पांढरा कुडा, सफेद मुसळी, करांदा, कार्टोली इ. भाजीसाठी आपल्याकडे वापरली जातात. ही वन उपजे निसर्गातील असल्याने, यांत कुठलेही कृत्रिम रसायन नसल्याने ती आरोग्यासाठी फलदायी असतात.

जंगलांची समृद्धी


भारतामध्ये 19.36 टक्के क्षेत्र एकूण भूभागापैकी जंगलांनी व्यापलेले आहे. यापैकी 11.48 टक्के दाट जंगल, 7.76 टक्के विरळ जंगल आणि 0.15 टक्के खारफुटी जंगल आहे. जंगलतोड, चराई, आग, जंगल तोडून शेतीत होणारे रूपांतर, औद्योगीकरण, रस्ते इ. अनेक कारणांमुळे जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. भारतातील जंगलांत सुमारे 45 हजार वनस्पतींचे प्रकार सापडतात. ग्रामीण भागात आजही अनेक लोक आपला उदरनिर्वाह या वन उपजांच्या माध्यमातून करत असतात. अनेक वन उपजांची निर्यात विविध देशांमध्ये होत असते. मध, डिंक, लाख, रेझीन, औषधी इ.ची मोठी निर्यात आपल्या देशातून प्रगत राष्ट्रांमध्ये होते. भारतामधील जंगलांतून 200 वनस्पती सुगंधी द्रव्य देणाऱ्या आहेत, 100 वनस्पती नैसर्गिक रंग देणाऱ्या आणि 120 वनस्पती डिंक व रेझीन देणाऱ्या आहेत. त्याचबरोबरीने सुमारे 3000 वनस्पती औषधी आहेत.

करा वनवृक्षांचे व्यवस्थापन


भारतात जंगलांवर आधारलेल्या रोजगारांपैकी 55 टक्के रोजगार हा वन उपजांच्या माध्यमातून मिळतो. महाराष्ट्रातही खालील वनस्पतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. या झाडांची लागवड, अस्तित्वात असलेल्या झाडांची जपणूक, संवर्धन करणे आवश्‍यक आहे.
1) डिंक ः बाभूळ, खैर, सोनखैर, कांडोळ, पांढरूक, मोई, धावडा, पळस, कवठ, गोगल, वेडीबाभूळ, बिवळा, शिरीष, काजू, कांचन, महोगणी, कडुनिंब, आंबा, इलायती चिंच, हिरडा, बेहडा, ऐन, किंजळ इ.
2) सुगंधी डिंक ः धूप, साल, गुग्गुळ इ.
3) टॅनिन व रंग निर्मिती ः कांदळ व खारफुटी प्रजाती, बाभूळ, मोठी तरवड, बाहवा, अर्जुन, जंगली बदाम, बोर, चारोळी, सुरू, अंबाडा, धावडा, ऐन, देवी-देवी, पळस, मेंदी, रक्तचंदन, कांचन, कुंभा, आवळा, आंबा, नागकेशर, बकुळ, नोनी, काजू, बिब्बा, अंजन, पारिजातक, धायटी, रामफळ, शेंद्री, कुंकूफळ, शेवगा इ.
4) रबर ः हेविया ब्राझेलेसिंस
5) लाख निर्मितीसाठी उपयुक्त झाडे ः पळस, कुसुम, बोर, खैर, शिरीष, उंबर, पिंपळ, वड, घोटीबोर इ.
6) चारा पिके ः आसाणा, उंबर, जांभूळ, वड, पिंपळ, बोर, रेन ट्री, आपटा, कांचन, बाभूळ, शिरीष, फणस, कडुनिंब, तुती, पांगारा, निंबारा, बेहडा, ऐन, बांबू, तिवस, धावडा, शिसम, सुबाभूळ, शेवगा, बिवळा, अंजनी, करंज, आंबा, हादगा, पुसर इ.
7) सुगंधी द्रव्ये ः सिट्रोनेला, लसूण गवत, गवती चहा, पामारोझा, खस गवत, चंदन, केवडा, जायफळ, दालचिनी, निलगिरी, तिसळ इ.
8) औषधी ः सर्पगंधा, वेखंड, कोरफड, सदाफुली, धोतरा, चिराईत, रानकांदा, आवळा, गुळवेल, शतावरी, पांढरी मुसळी, काळी मुसळी, मंडुकपर्णी, ब्राह्मी, हिरडा, बेहडा, काळमेघ, अश्‍वगंधा, गुग्गुळ, सोनामुखी, वावडिंग, चित्रक, मंजिष्ठ, लोध्र, वरुण, टेटू, पाडळ, अग्निमंथ, शिवण, बेल, रिंगणी, काटेरिंगणी, सालवण, पिठवण, गोखरू, नागकेशर, कोलिंजन, कुटकी, कुडा, सीताअशोक, भारंगी, शंखपुष्पी, डुमार, नरक्‍या, जांभूळ, काजरा, अक्कलकाढा, आघाडा, नोनी, बिवळा, रिठा, गोकर्ण, माका इ.
9) फळे व बिया ः बेल, लवफळ, करवंद, भोकर, आवळा, कवठ, चारोळी, जांभूळ, तोरण, ताडगोळे, शिंदी, अटकी, बोर, काजू, कौशी, कोकम, बकुळ, मोह, चिंच, इलायती चिंच, जंगली बदाम, बाहवा, भेरलीमाड, तुती, बेहडा, हरडा इ.
10) पेपर निर्मिती ः बांबू, निलगिरी, जांभा, ऐन, खैर, धावडा, तेंदू, सळई, बिवळा, सुबाभूळ, सुरू, ऑस्ट्रेलियन बाभूळ, बाभूळ, बेल, पळस, शिसम, मोह, तुती, कांडोळ इ.
11) अखाद्य तेल व जैवइंधन ः करंज, उंडी, मोह, कुसुम, कडुनिंब, वनएरंड, नागकेशर, बदाम, खिरनी, कोकम, पिसा, शेवगा, धूप, चंदन, मालकांगणी, रिठा, चारोळी, बेल इ.
12) तंतू व दोर निर्मिती ः पांढरूक, अंजनी, पळस, पळसवेल, आपटा, धामण, सावर, पांढरी सावर, रुई, कुडा, पिंपल, वड, भेरलीमाड, घायपात, रेम्ही, कुंभा, तिवस, भेंड, केवडा, फणस इ.
13) सौंदर्य व रोडच्या कडेने लावण्यासाठी ः कांचन, बकुळ, सुरंगी, कोकम, आंबा, जारू, सावर, वड, उंबर, पिंपळ, उंडी, कॅशिया, पळस, रेन ट्री, भेरलीमाड, बॉटलब्रश, सीताअशोक, कडुनिंब, पिचकारी, चाफा, पेल्टोफोरम, वायावर्ण, करमळ, बाहवा, अशोक, जकांरडा, पोईनशिया, रक्तरोहिडा, चिंच इ.
14) बिडी उद्योग ः आपटा, तेंदू, फणस, पळस, उंबर, केळी, कुंभा, कुडा इ.
15) काडेपेटी उद्योग ः आंबा, कदंब, कळम, महारूख, सातवीन, मोह, अशोक इ.
16) नत्र स्थिर करणाऱ्या प्रजाती ः ऑस्ट्रेलियन बाभूळ, खैर, बाभूळ, सोनखैर, पळस, बाहवा, तरवड, सुरू, शिसम, शिसू, गुलमोहर, गिरिपुष्प, शेवगा, इलायती चिंच, करंज, खेजरी, वेडीबाभूळ, रेन ट्री, सीताअशोक, चिंच, शेवरी, हादगा, पांगारा इ.
17) जळाऊ लाकूड देणाऱ्या प्रजाती ः ऑस्ट्रेलियन बाभूळ, बाभूळ, ऐन, किंजळ, चेर, बेहडा, हिरडा, सुबाभूळ, खैर, शिरीष, नीम, शिसम, आवळा, पांगारा, शिवण, करंज, वेडीबाभूळ, खेजरी, चिंच, बोर, जांभूळ इ.
18) कोळसा तयार करण्यासाठी उपयुक्त प्रजाती ः ऑस्ट्रेलियन बाभूळ, शिरीष, नीम, पळस, सुरू, शिसम, आवळा, निलगिरी, इलायती चिंच, खेजरी, वेडीबाभूळ, बोर इ.
19) फर्निचरसाठी उपयुक्त ः बाभूळ, हळदू, शिरीष, नीम, शिसम, शिसू, शिवण, मोह, साग, अर्जुन, बेहडा इ.
20) प्लायवूड तयार करण्यासाठी उपयुक्त प्रजाती ः हळदू, महारूख, शिरीष, सातवीन, कदंब, सावर, सळई, शिसम, शिसू, शिवण, वावळ, मोह, जांभूळ, साग, बेहडा इ.
21) सूत उद्योगासाठी उपयुक्त प्रजाती ः शिसम, जारूल, मोह, तुती, अर्जुन, बोर इ.
22) कोरीव कामासाठी उपयुक्त प्रजाती ः शिरीष, वायावर्ण, शिसम, शिसू, शिवण, चंदन, साग, काळाकुडा इ.
23) खेळणी तयार करण्यासाठी उपयुक्त ः पांगारा, रानपांगारा, सावर, आंबा, जांभूळ इ.
24) खाजण क्षेत्र, अल्कली धर्मी व टाकाऊ जमिनीसाठी उपयुक्त प्रजाती ः ऑस्ट्रेलियन बाभूळ, बाभूळ, शिरीष, नीम, पळस, बॉटलब्रश, मोठी तरवड, बाहवा, सुरू, आवळा, गिरिपुष्प, ताम्हन, मोह, तुती, शिंदी, करंज, वेडीबाभूळ, उंडी, अर्जुन, भेंड, बोर इ.
25) लाल मुरमाड, दगडगोट्याच्या जमिनीसाठी वनवृक्ष ः ऑस्ट्रेलियन बाभूळ, सातवीन, काजू, धावडा, बांबू, सावर, शिसू, शिसम, अंजनी, वावळा, मोह, बिबळा, चंदन इ.
26) धूप प्रतिबंधक ः बाभूळ, महारूख, शिरीष, काजू, नीम, सुरू, शिसम, खेजरी, वेडीबाभूळ, रक्तरोहिडा, बोर इ.
27) दलदलीच्या जमिनीसाठी प्रजाती ः कांदळ, समुद्रफळ, उंडी, केवडा, भेंड, सुरू, करंज इ.
28) शेताच्या कडेने बांधावर लावण्यासाठी उपयुक्त वृक्ष ः गिरिपुष्प, निंबारा, शेवगा, तुती, इलायती चिंच, जांभूळ, भेंड, ऐन, फणस, ऑस्ट्रेलियन बाभूळ, एरंडी, शेवरी इ.
29) सावली आणि उपयुक्त पाने देणारी प्रजाती ः शिरीष, कदंब, कडुनिंब, बाहवा, सुरू, भोकर, शिसम, आवळा, गिरिपुष्प, शिवण, सिल्व्हरओक, जारूल, बकुळ, अशोक, करंज, पुत्रंजिवा, रेन ट्री, सीताअशोक, चिंच, नागकेशर, अर्जुन, जंगली बदाम, भेंड, ऑस्ट्रेलियन साग, ऑस्ट्रेलियन बाभूळ, आंबा इ.
30) सजीव कुंपणासाठी व गुरांना अडथळा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ः बॉटलब्रश, बाहवा, सुरू, पांगारा, गिरिपुष्प, जारूल, इलायती चिंच, खेजरी, वाकेरीचा भाता, चिलार, सागरगोटा, घायपात, वनएरंड, भेंड इ.
31) रस्त्याच्या दुतर्फा आणि शहरी भागात लागवडीयोग्य प्रजाती ः गोरखचिंच, रतनगुंज, देवी-देवी, हळदू, बेल, महारूख, ऑस्ट्रेलियन बाभूळ, अंकोल, शिरीष, सातवीन, रामफळ, सीताफळ, कदंब, करमळ, कडुनिंब, कांचन, आपटा, शेंद्री, सळई, पळस, बॉटलब्रश, बाहवा, गुलाबी- पिवळा कॅशिया, सुरू, पांढरी सावर, नारळ, भोकर, कैलासपती, वायावर्ण, सायकस, शिसम, शिसू, गुलमोहर, आवळा, आंबा, कवठ, वड, पायर, उंबर, कृष्णवड, पिंपळ, कौशी, कोकम, शिवण, कुडा, कडू कवठ, जाकरंडा, जारूल, मोई, चिकू, खिरणी, निंबारा, कळम, शेवगा, तुती, कढीपत्ता, पारिजातक, कॉपरपॉड ट्री, चाफा, अशोक, करंज, पेरू, पुत्रंजिवा, बॉटल पाम, रेन ट्री, सीताअशोक, पिचकारी, कांडोळ, पाडळ, टेटू, अग्निमंथ, जांभूळ, टॅबोबिया, चिंच, रक्तरोहिडा, अर्जुन, साग, बेहडा, हिरडा, भेंड, निर्गुडी, निलमोहर, काळाकुडा, निलगिरी इ.

स्त्रोत -अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate