एमबीएचे शिक्षण घेतलेल्या राशीन (ता. कर्जत, जि. नगर) येथील बाझील फारुख काझी या ध्येयवेड्या तरुणाने पुणे शहरातील बहुराष्ट्रीय कंपनीतील एचआर विभागातील नोकरी सोडून शिक्षणाचा उपयोग आपली शेती विकसित करण्यासाठी केला. धाडसी निर्णय होता, पण अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि दूरदृष्टी ठेवून काझी प्रयत्नशील राहिले. त्यातून माळरानावर डाळिंब शेतीचे नंदनवन उभारण्याचे प्रयत्न राशीन येथे यशस्वी झाला आहे.
बाझील काझी यांच्या कुटुंबाची एकूण 25 एकर संयुक्त शेती. त्यात दर वर्षी पूर्वीपासून पाच ते सहा एकरांत भगवा जातीच्या डाळिंबाची झाडे लगडलेली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील काझी यांचे वडील कृषी सहायक, परंतु नोकरीमुळे पूर्ण वेळ शेती पाहणे शक्य होत नव्हते. काकाही शेती पाहायचे, परंतु बागेच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे पाच-सहा एकरांतून डाळिंबाचे केवळ 15 ते 20 टन उत्पादन मिळायचे. नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतीत उतरायचा निर्णय बाझील यांनी घेतला. त्यांच्या वडिलांना तो पसंतही पडला. त्यांनी विश्वासाने बाझील यांच्या खांद्यावर डाळिंब शेतीची मदार सोपवली.
व्यवस्थापन सुधारले
यांच्या पाठीशी वडिलांचे अनुभव व मार्गदर्शन होतेच. शेतीचा पहिला अनुभव नसल्याने ज्ञानवृद्धीसाठी त्यांनी तब्बल 60 ते 70 पुस्तके डाळिंब पिकाविषयीची वाचली. त्यातील नोट्स काढल्या. इंटरनेटवरून माहिती घेतली. परिसरातील जाणकार व सल्लागारांची मदत घेतली.
गेल्या तीन वर्षांपासून बाझील आता डाळिंब शेतीत स्थिर होऊ लागले आहेत. व्यवस्थापन विषयातील शिक्षण असल्याने डाळिंब शेतीत त्याचा पुरेपूर वापर करण्यास सुरवात केली.
संरक्षित पाण्याची सोय केली
सुरवातीला रोपवाटिकेतून भगवा डाळिंबाची रोपे आणून 14 बाय 10 फूट अंतरावर लागवड केली. पहिली अडचण आली ती पाण्याची. कारण राशीन हा जिरायती भाग. पाण्यावर मात करण्यासाठी शेतात तीन कूपनलिका घेतल्या. त्यातील पाणी विहिरीत घेऊन बागेला ठिबक सिंचन केले. त्याद्वारा प्रत्येक झाडाला पाणी कसे मिळेल, याचे व्यवस्थापन केले. मात्र गेल्या दोन वर्षांत पडलेल्या दुष्काळाने कूपनलिका कोरड्या पडल्याने बाग जगविण्याचे आव्हान बाझील यांच्यापुढे उभे राहिले. मात्र न डगमगता सहा लाख रुपयांचे विकतचे पाणी टॅंकरने आणून बाग जगवली. त्यावर उत्पादन व उत्पन्न घेतले.
लागवडीनंतर आजूबाजूला तेलकट रोगाचा प्रादुर्भाव असताना त्याची बाधा आपल्या बागेत होऊ नये म्हणून बोर्डो मिश्रणाच्या फवारण्या घेतल्या. जिवाणुनाशकाचाही गरजेनुसार वापर केला. कृषी खात्याच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेतून फळबागेस ठिबक केले असून, त्यास अनुदानही मिळाले आहे.
परागीभवनाचा तालुक्यात पहिला प्रयोग
- पहिली अडचण पाण्याचीच आल्याने फळधारणेसाठी मृग बहार धरावा लागला. त्यातही कळी सेटिंग करण्यात पावसामुळे अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी मधमाश्यांचा परागीभवनासाठी प्रयोग करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. लातूर येथील दिनकर पाटील यांच्याकडून दर वर्षी एक महिन्यासाठी मधमाश्यांच्या 10 पेट्या 15 हजार रुपये भाडेतत्त्वावर आणल्या. दर वर्षी या प्रयोगाचा वापर होतो. परागीभवनातून किमान 30 टक्के उत्पादन वाढते, असे आपण शिकल्याचे बाझील म्हणतात. परागीभवनासाठी काझी यांनी कर्जत तालुक्यात हा पहिलाच प्रयोग केल्यानंतर या भागातील शेतकरीही प्रयोगाचे अनुकरण करीत आहेत.
खत व्यवस्थापन
पूर्वी डाळिंबाच्या झाडांना रासायनिक व सेंद्रिय खते दिली जायची. मात्र गेल्या वर्षापासून सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. प्रत्येक झाडास दोन पाट्या शेणखत ड्रिपखाली, तसेच शेणखतात कोंबडीखत व बाजारातील सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशिअम, बोरॉन, झिंक, फेरस यांचाही वापर होतो.
- छाटणी केल्यानंतर रासायनिक व सेंद्रिय खते दिली जातात. थ्रिप्स, अळी, लाल कोळी, सुरसा, तसेच अन्य किडींवर रासायनिक पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते. पानगळ केल्यानंतर छाटणी करून बहार धरण्याच्या वेळेस पहिले पाणी 10 ते 12 तास दिले जाते. दुसरे पाणी 15 दिवसांनी दररोज एक तास ठिबकद्वारा देण्याचे नियोजन करावे लागते. फळ सेटिंग झाल्यानंतर पाणी वाढवून रोज दोन तास पाणी दिले जाते.
तंत्रज्ञान केले आत्मसात
तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना बाझील यांनी भेटी दिल्या. ऍग्रोवनचे कृषी प्रदर्शनही उपयोगी ठरले. या दैनिकाचे ते नियमित वाचन करीत आहेत. त्यातील यशकथा सर्वांत आधी वाचतो, असे त्यांनी सांगितले. सर्व ज्ञानवृद्धीतून आता शेतीचे यांत्रिकीकरण त्यांनी केले. बागेत ब्लोअरद्वारा फवारणी, रोटावेटरचा वापर ते करतात. काकरी, पाळी घालणे ही कामे यंत्राद्वाराच केली जातात. फर्टिगेशन टॅंकद्वारा खते देत असल्याने वेळेची, श्रमांची बचत होत असल्याचे ते म्हणतात.
दोन एकरांवर शेततळे
पाण्याविषयी सांगताना बाझील म्हणाले, की दुष्काळात विकतच्या पाण्याने शेततळ्याचे महत्त्व अधोरेखित झाल्याने दोन एकरांवर सुमारे 22 लाख रुपये खर्चून तीन कोटी लिटरचे शेततळे तयार केले. आज ते पावसाळ्यात नांदणी नदीवरून पाइपलाइन करून पूर्णत: भरले आहे. त्याचा उपयोग यंदाच्या उन्हाळ्यात फळबागेसाठी निश्चितच होईल.
मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. रघुवंशी, डॉ. विनय तुपे, डॉ. कुलकर्णी, सुनील तक्ते, तसेच राशीन येथील तत्कालीन मंडल कृषी अधिकारी सागर बारवकर, सुरेश जायभाय, सहायक सतीश मोढळे, नानासाहेब शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना मिळते. युनियन बॅंकेने ट्रॅक्टर, ब्लोअर, शेततळे, फळबाग लागवडीसाठी पीक कर्ज दिल्याने डाळिंबाची बाग उभी राहू शकली.
पिकाचा ताळेबंद
डाळिंबाचे पूर्वी पाच ते सहा एकरांत 15 ते 20 टन उत्पादन मिळायचे. आता एकरी नऊ टनांपर्यंत पोचणे शक्य झाले आहे. यापूर्वी पाच एकरांत 41 टन उत्पादन बाझील यांनी घेतले आहे. दर वर्षी एकरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पादन खर्च होतो. डाळिंबास सरासरी प्रति किलो 35 ते 40 रुपयांवरून गेल्या तीन वर्षांत सरासरी 100 रुपये दर मिळाला आहे. सध्या 110 रुपयांनी संगमनेरच्या व्यापाऱ्यांना जागेवर मालाची विक्री केली जात आहे. कोलकता, केरळ येथे हा माल पाठवला जातो. आता नव्याने 14 एकरांत डाळिंब लावण्याचे नियोजन आहे. शेतीत काका सलीम काझी यांनी खांद्याला खांदा लावून त्यांना मदत केली आहे.
शैक्षणिक खर्च शेतीतील उत्पन्नातून
कुटुंबातील राहील संगणकात बी.ई. पूर्ण करून पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरीस लागला. बहीण उंजीला सलीम काझी एमएस्सी करतेय. दुसरा भाऊ दानीश जावेद काझी बी.ई. सिव्हिल करतोय. आवेश फारुख काझी बी.एस्सी. ऍग्री करतोय. या सर्वांच्या उच्च शिक्षणाचा खर्च फळबागेतील उत्पन्नामुळे शक्य होत आहे. शेतीत उतरण्यापूर्वी गवतालाच तण म्हणतात, हेदेखील माहीत नव्हते. मात्र एमबीएचे शिक्षण शेतीत वापरले. कुणाकडून कोणते काम प्रभावी पद्धतीने कसे करून घ्यायचे, आपण व्यवस्थापन कसे करायचे, वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, या सर्व कंपनीतील नोकरीतील अनुभवाच्या गोष्टी शेतीत वापरायला सुरवात केली. आज मी एकरी उत्पादन दुपटीने वाढवले असून, मालाचा दर्जाही सुधारला आहे. 110 रुपये किलोने माझे डाळिंब विकले जात आहे. नोकरीपेक्षा शेतीत अधिक पैसा आहे. केवळ आपला अभ्यास व व्यवस्थापन चोख हवे. लेखक :
दत्ता उकिरडे
माहिती संदर्भ : अग्रोवन