शास्त्रीय नाव - ट्राएन्थेमा पोरच्युलेकास्ट्रम (Trianthema Portulacastrum )
कूळ - आयझोएसी (Aizoaceae )
इंग्रजी - डेझर्ट हॉर्स पर्सलेन व ब्लॅक पीगवीड
- संस्कृत नाव - वसुक
- गुजराती - श्वेत साटोडी
- हिंदी - खाप्रा
- पंजाबी - विशकाप्रा
- वसू ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे.
- ही हुबेहूब घोळ तसेच पुनर्नवा या वनस्पतींसारखी दिसते. वसू ही घोळीप्रमाणे दिसते म्हणूनच प्रजातीचे शास्त्रीय नाव "पोरच्युलेकास्ट्रम' असे आहे.
- ही कोवळेपणी पुनर्नवासारखी दिसते; पण फुले पांढरी असल्याने तिला "श्वेत पुनर्नवा' असेही म्हणतात.
- ही तण म्हणून श्रीलंका, भारत, पाकिस्तान तसेच उष्ण कटिबंधातील देशांत सर्व आढळते. वसू महाराष्ट्रात सर्वत्र ओसाड, पडीक जमिनीवर, शेतात, बागांमध्ये, रस्त्यांच्या कडेने वाढलेली दिसते. पावसाळ्यात हमखास आढळते.
ओळख
ही वनस्पती साधारण मांसल, गुळगुळीत व जमिनीवर पसरत वाढते.
खोड - मांसल, गोलाकार ते चौकोनी, नाजूक, पसरणारे, गुळगुळीत व भरपूर फांद्या असणारे.
पाने - साधी, समोरासमोर, साधारण मांसल, जोडीतील पाने विषम आकाराची, एक आकाराने मोठे 2.00 ते 3.8 सें.मी. लांब व 2.00 ते 3.2 सें.मी. रुंद, तर जोडीतील दुसरे पान 0.7 ते 1.3 सें.मी. लांब व 0.6 ते 0.8 सें.मी. रुंद असते. जोडीतील मोठे पान गोलाकार तर लहान पान लांबट - गोलाकार. पाने गुळगुळीत व फिकट हिरव्या रंगाची. पानांचा देठ 0.9 ते 1.2 सें.मी. लांब. लहान पानांचा देठ तळाकडे फुगीर व साधारण त्रिकोणी आकाराचा असतो.
फुले - लहान, नियमित, द्विलिंगी, देठरहित, त्रिकोणी, फुगीर देठाच्या बेचक्यातून एकांडी येतात. फुले पांढरी किंवा साधारण गुलाबी झाक असणारी. पुष्पकोश 5 दलांचा. पाकळ्या नाहीत. पुंकेसर 10 ते 20, पुष्ककोशनळीच्या टोकांवर तयार होतात. बीजांडकोष एक कप्पी, परागवाहिनी एक.
फळ - बोंडवर्गीय, पूर्णपणे पानाच्या त्रिकोनी फुगीर देठानी झाकलेले.
बिया - 6 ते 8, काळसर, खडबडीत, मूत्रपिंडाच्या आकाराच्या.
वसू पावसाच्या सुरवातीस उगवते व जुलै ते ऑगस्ट महिन्यात फुले येतात.
वसूचे औषधी गुणधर्म
- वसू ही वनस्पती शोथशामक औषधी म्हणून प्रसिद्ध आहे.
- वसूचे मूळ औषधात वापरतात. मूळ फिक्कट रंगाचे व पुष्कळ सुरकुत्या पडलेले असते. मूळ ताजेपणी जरा गोडसर, पण सुकल्यावर कडू आणि किळसवाणे असते. वसू तीव्र रेचन आहे. वसूने आतड्यांत तीव्र दाह निर्माण होतो. गरोदरपणात वसूचे मूळ देऊ नये.
- ज्या रोगात तीव्र जुलाबाची जरुरी असते, त्या रोगात वसू देतात. यकृतांतून रक्ताभिसरणास अडथळा होऊन उत्पन्न झालेल्या विकारात, मलावंष्टभ, त्वचेच्या रोगांत आणि पांडुरोगात वसू गुणकारी आहे.
- रेच जास्त प्रमाणात झाल्यानंतर शरीरातील शोथ कमी होतो म्हणून यकृत आणि प्लिहा यांच्या शोथात वसू ही औषधी उपयुक्त मानतात.
- कुपचनातून निर्माण झालेल्या शोथयुक्त दम्यात आणि गर्भाशयाच्या शोथामुळे तयार होणाऱ्या अनार्तवांत वसूचा उपयोग करतात.
- औषधासाठी वसूच्या मुळाचे चूर्ण सुंठीबरोबर देतात. वसूची मोठी मात्रा न देता थोडी थोडी मात्रा दर तीन तासांनी देतात.
वसूच्या भाजीचे औषधी गुणधर्म
- वसूच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
- वसूची भाजी दीपन, वातहर आणि कफघ्न आहे. वसूची भाजी खोकला व दमा या विकारात उपयुक्त आहे.
- शरीरातील वात कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.
- यकृताचे विकार, त्वचारोग, कुपचन यांमध्ये वसूची भाजी अत्यंत गुणकारी आहे.
पाककृती
भाजी
- साहित्य - वसूची कोवळी पाने देठासहित, चिरलेला कांदा, ठेचलेली लसूण, तेल, हिरवी चिरलेली मिरची, मीठ, हळद इ.
- कृती - भाजी स्वच्छ धुऊन घ्यावी. पाणी निथळल्यानंतर भाजी चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा व ठेचलेला लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. चिरलेली मिरची व भाजी घालून चांगली परतावी. हळद व चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर भाजी शिजवावी.
वसूचे पराठे
- साहित्य - चिरलेली वसूची भाजी एक वाटी, हळद, लसूण, जिरे, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, गव्हाचे पीठ दोन वाट्या, तूप इ.
- कृती - वसूची भाजी स्वच्छ धुऊन निथळत ठेवावी. नंतर बारीक चिरून घ्यावी. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ यांची पेस्ट बनवावी. गव्हाच्या पिठाची कणीक मळताना ही पेस्ट व चिरलेली भाजी, जिरेपूड व हळद टाकावी. मळलेल्या कणकेचे छोटे-छोटे गोळे करून, नंतर लाटून, पराठे तुपावर भाजावेत. गरम गरम पराठे चवदार लागतात.
- वसू-मिश्र भाज्यांचे सूप -
- साहित्य - वसू, चाकवत, चंदनबटवा, चुका, घोळ, पुनर्नवा या रानभाज्यांची पाने, सूप मसाला, पाणी इ. (सूप मसाला तयार करण्यासाठी सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे, धने, लवंग, वेलची, दालचिनी या सर्वांचे समप्रमामात चूर्ण करून एकत्र करावे.)
- कृती - प्रथम सर्व भाज्या नीट निवडून घ्याव्यात. धुऊन स्वच्छ कराव्यात. भाजींच्या चौपट पाणी टाकून पातेल्यात शिजवाव्यात. चांगल्या शिजल्यावर मिक्सरमध्ये सर्व मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर परत एकदा गरम करावे. एका भांड्यात एक चमचा सूप मसाला टाकून चांगले हलवून सूप पिण्यास द्यावे.
- सूप पिण्याने पचनाच्या तक्रारी दूर होतात. मिश्र भाज्यांचे सूप मलावष्टंभ, अपचन यांमध्ये गुणकारी आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन